Mutual funds : ‘स्मार्ट’ म्युच्युअल फंड

फंड मॅनेजरच्या कार्यपद्धतीनुसार म्युच्युअल फंड दोन प्रकारात विभागता येतात. पहिल्या प्रकारामध्ये गुंतवणूक कोठे करायची? याचा निर्णय त्या फंडाचा व्यवस्थापक आणि त्याची टीम घेते. या प्रकाराला ॲक्टिव्ह फंड म्हणतात.
Mutual funds
Mutual fundssakal

फंड मॅनेजरच्या कार्यपद्धतीनुसार म्युच्युअल फंड दोन प्रकारात विभागता येतात. पहिल्या प्रकारामध्ये गुंतवणूक कोठे करायची? याचा निर्णय त्या फंडाचा व्यवस्थापक आणि त्याची टीम घेते. या प्रकाराला ॲक्टिव्ह फंड म्हणतात. दुसऱ्या प्रकारात गुंतवणूक कोठे करायची? याचे नियम आधीच ठरवून दिलेले असतात.

फंड व्यवस्थापक आणि त्याची टीम फक्त त्या नियमांप्रमाणे गुंतवणूक करतात. या प्रकाराला पॅसिव्ह फंड म्हणतात. ॲक्टिव्ह फंडाचा फायदा म्हणजे फंड मॅनेजरला गुंतवणुकीचे निर्णय घेण्याची मुभा असते, ज्याचा फायदा फंडाची कामगिरी सुधारण्यासाठी होतो. परंतु, या फंडाचा तोटा म्हणजे फंड मॅनेजरचा निर्णय चुकला, तर त्याचा विपरीत परिणाम फंडाच्या कामगिरीवर होतो. याउलट पॅसिव्ह फंडाची गुंतवणूक आखून दिलेल्या नियमांनुसार होत असल्याने फंड मॅनेजरच्या हातून चूक होण्याचा संभव नसतो. मात्र, यामुळे फंड मॅनेजरच्या निर्णयक्षमतेवर मर्यादा येतात. म्हणूनच ॲक्टिव्ह फंड आणि पॅसिव्ह फंड यांचे फायदे एकत्रित करून तयार झालेला ‘स्मार्ट बीटा फंड’ हा अधिक आकर्षक ठरतो.

स्मार्ट बीटा फंडांची कार्यपद्धती

स्मार्ट बीटा फंड हा ॲक्टिव्ह फंड आणि पॅसिव्ह फंड यांचे फायदे एकत्रित करतो. उदा. असा फंड इंडेक्स फंडाप्रमाणे गुंतवणुकीसाठी ठरवून दिलेल्या निर्देशांकातील शेअरचा विचार करतो. मात्र, एक पाऊल पुढे जाऊन अशा निर्देशांकातील सर्वच शेअरमध्ये गुंतवणूक न करता काही निकषांच्या आधारे त्यातील काही शेअरची निवड करतो किंवा निर्देशांकातील सर्वच शेअरमध्ये गुंतवणूक करतो. परंतु, त्याची गुंतवणुकीची रक्कम कमी-अधिक असते.

म्हणजेच तो पॅसिव्ह फंडाप्रमाणे ठरवून दिलेल्या शेअरमध्येच गुंतवणूक करतो. मात्र, त्याचवेळी ॲक्टिव्ह फंडाप्रमाणे काही निकष (फॅक्टर) वापरून शेअरची निवडदेखील करतो. या निवडीसाठी प्रामुख्याने सहा निकष (फॅक्टर) लावले जातात. शेअरचे बाजारमूल्य, शेअरच्या बाजारभावात दोलायमानता, नजीकच्या काळातील गुंतवणुकीवर परतावा देण्याची शेअरची ताकद, कंपनीची नफाक्षमता, कंपनीचा आकार, शेअरमधील गुंतवणुकीवर लाभांश मिळण्याची शक्यता असे हे सहा निकष आहेत. यातील सर्व निकष किंवा काही निकष विचारात घेऊन शेअरची निवड केली जाते.

गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे...

याआधी उल्लेख केल्याप्रमाणे ॲक्टिव्ह फंड आणि पॅसिव्ह फंड या दोन्हीचे फायदे स्मार्ट बीटा फंडातील गुंतवणुकीतून मिळतात, त्यामुळे एकाच फंडात गुंतवणूक करून दोन प्रकारचे फायदे मिळू शकतात. स्मार्ट बीटा फंडातील शेअरची निवड वेगवेगळ्या निकषांवर आधारित असल्यामुळे गुंतवणुकीचा ‘डायव्हर्सिफिकेशन’ हा मुख्य उद्देश साध्य केला जातो; तसेच गुंतवणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, अल्प खर्च, गुंतवणुकीची सोपी प्रक्रिया हे अन्य फायदे मिळतातच. अर्थात, अजूनही आपल्या देशात बीटा फंडातील व्यवहारांची संख्या तुलनेने कमी आहे.

अशा फंडांची संकल्पना सर्वसामान्य गुंतवणूकदारापर्यंत पूर्णपणे न पोहोचल्यामुळे अशा फंडांतील गुंतवणूकदारांची संख्या इतर फंडांच्या तुलनेत कमी आहे. म्हणूनच सर्वसामान्य गुंतवणूकदाराने आपल्या पोर्टफोलिओमध्ये एखादा स्मार्ट बीटा फंड ठेवून त्यात नियमितपणे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करत राहावे. सद्यस्थितीत आपल्या देशात स्मार्ट बीटा फंड ही संकल्पना तुलनेने नवी असली, तरी त्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढत आहे आणि सुमारे ३० पेक्षा अधिक स्मार्ट बीटा फंड आता कार्यरत आहेत.

प्रमुख स्मार्ट फंड

आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल

निफ्टी लो व्होलॅटिलिटी ईटीएफ

निप्पॉन इंडिया ईटीएफ

निफ्टी फिफ्टी व्हॅल्यू २०

सुंदरम स्मार्ट निफ्टी

१०० इक्वल वेट फंड

प्रिंसिपल निफ्टी १०० इक्वल वेट फंड

डीएसपी इक्वल निफ्टी फिफ्टी फंड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com