

Stock market investment strategy
esakal
भारतीय शेअर बाजाराने तेजीच्या लाटेवर स्वार होत नोव्हेंबरच्या अखेरीस उच्चांकी पातळी गाठली. नंतर शेअर निर्देशांक सर्वोच्च पातळीपासून मागे फिरले; पण त्याजवळच घोटाळत राहिले. शेअर बाजार जोमात असताना माझा पोर्टफोलिओ कोमात का, असा प्रश्न सर्वसामान्य गुंतवणूकदारांना पडत आहे. का होत असेल असे?... या प्रश्नाच्या अनुषंगाने एक विचार मांडतो. शेअर बाजारात दीर्घकालीन नफा हा तोटा नोंदविल्यानेच होतो. विश्वास बसणार नाही व हे विधान वरवर विरोधाभासी वाटेल, पण लक्षात घ्या, ज्या शेअरमध्ये आपण नफा वसूल करतो तो पुढे अजूनही वर जाऊ शकतो, कदाचित तो तात्पुरता खाली येईलही, पण कंपनीच्या कामगिरीचा आलेख सतत उंचावत असला, नवी क्षमता कार्यान्वित होणार असेल, तर विक्री व नफा वाढू शकतो. मात्र, खाली जाणारा शेअर कोणत्या कारणामुळे खाली जात आहे, हे जाणून न घेता फक्त वाट पाहात राहिलो, तर भांडवल अडकण्याची भीती असते. म्हणूनच वेळोवेळी नफा (किंवा तोटा) वसूल करणे आणि गुंतवणूक वाढती असेल तर संयम दाखवणे हेच खरे मर्म आहे.