
एशियन पेंट्स ही कंपनी पेंट्स, कोटिंग्ज, घराच्या सजावटीशी संबंधित उत्पादने, बाथ फिटिंग्ज आणि संबंधित सेवा पुरवण्याच्या व्यवसायात आहे.
एशियन पेंट्स
भारतात १९४२ मध्ये स्थापित झालेला एशियन पेंट्स समूह हा देशातील सर्वांत मोठा पेंट उत्पादक आहे. एशियन पेंट्स ही कंपनी पेंट्स, कोटिंग्ज, घराच्या सजावटीशी संबंधित उत्पादने, बाथ फिटिंग्ज आणि संबंधित सेवा पुरवण्याच्या व्यवसायात आहे. देशांतर्गत संघटित पेंट मार्केटमध्ये या कंपनीचा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त बाजारहिस्सा आहे.
कंपनीची पेंट्स सेवांसाठी ८३४ शहरांमध्ये उपस्थिती आहे. विक्रीसाठी कंपनीची देशभरात एक लाख पंचावन्न हजार केंद्रे आहेत. सध्या कंपनीचा तिच्या उत्पादन क्षमतेचा वापर सुमारे ७५ टक्के इतका आहे.
कंपनी व्यवस्थापनाने नमूद केल्यानुसार, साधारण ५,४०० कोटी रुपये गुंतवणुकीसह उत्पादन क्षमतेचा विस्तार करणार आहे. पावडर पेंट्स आणि व्हाईट पुट्टी यांच्या निर्मितीत व्हाईट सिमेंट हा एक महत्त्वाचा कच्चा माल आहे. एशियन पेंट्सने यूएईतील फुजैराह येथे रिद्धी सिद्धी कंपनीसोबत भागीदारीत स्वतःची उत्पादन सुविधा उभारून व्हाईट सिमेंट क्षेत्रात प्रवेश केला आहे.
कच्च्या मालाच्या किमतीतील घसरण, कंपनीची पेंट्स उत्पादनासाठी लागणाऱ्या विनाइल अॅसिटेट इथिलीन इमल्शन; तसेच विनाइल अॅसिटेट मोनोमर या घटकांसाठी प्रकल्प स्थापनेची घोषणा, उत्पादन क्षमतेचा विस्तार, व्हाईट सिमेंट क्षेत्रातील प्रेवश आदींमुळे कंपनीला वाढीचा पुढचा टप्पा गाठणे शक्य होईल.
जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ झाली असून, तो १,०९७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील तीन तिमाही निकालानुसार एकूण निव्वळ नफा २,९३७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कर्जाचे प्रमाण कमी ठेऊन धंद्यात गुंतविलेल्या भांडवलावर प्रतिवर्ष सुमारे २५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत आहे.
शेअर बाजारातील चढउतार आणि कंपनीच्या कार्यक्षेत्रातील जोखीम लक्षात घेऊन ‘एशियन पेंट्स’ या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घावधीच्या दृष्टीने गुतवणूकदारांनी गुंतवणूक करण्याचा जरूर विचार करावा.
(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)