
प्रसाद भागवत - भांडवली बाजाराचे अभ्यासक
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीच्या सामन्यांत कर्णधार रोहित शर्मा सलग बाराव्यांदा नाणेफेक हरला. भारतीय कर्णधारांची एका पाठोपाठ एक नाणेफेक हरण्याची ही तब्बल १५वी वेळ! साहजिकच रोहितने ‘शोले’मधील ते प्रसिद्ध नाणे घेऊनच टॉस केला तरच तो जिंकेल, अशा ‘मीम्स’ना समाजमाध्यमांत बहर आला. रोहितच्या नाणेफेक हरण्याच्या ‘कौशल्या’ची (?) चर्चा जोर धरू लागली असतानाच योगायोगाने शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’पण कामकाजाचे सलग दहा दिवस नकारात्मक कल दाखवून खाली बंद झाला.
बाजाराच्या सलग दहावेळा डुबकीची ही गेल्या तीस वर्षांतील पहिलीच वेळ. साहजिकच या विषयावर खट्याळ, खोडकर टिप्पण्यांचीही कमी नव्हती. तत्पूर्वी, फेब्रुवारीतही बाजार खाली गेल्याने सलग पाच महिने बाजाराने मासिक नकारात्मक पातळी गाठण्याची गेल्या २९ वर्षांतील ही पहिली वेळ. हा मुद्दाही वातावरणातील मंदीची काजळी गडद करुन गेला होताच. पाठोपाठ चौदा वेळा नाणेफेक हरणे, सलग दहा दिवस (वा पाच महिने) बाजार खाली जाणे, या घटनांच्या चर्चा रंगण्याचे मूळ कारण हे गणितातील संभाव्यता सिद्धांतात (probability theory) आढळते.