

2026 Union Budget future growth
esakal
भारताच्या आर्थिक इतिहासात पहिल्यांदाच रविवारी आणि सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मिळविला. युवाशक्तीला केंद्रस्थानी ठेवत गरीब, वंचित आणि दुर्बल घटकांवर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प, अमेरिकेच्या ‘टेरिफ युद्धा’चा आपल्यावर फारसा परिणाम होणार नसल्याचे ठळकपणे दाखविणारा आत्मनिर्भर अर्थसंकल्प, तसेच योगशास्त्र, आयुर्वेद, खादी यासारख्या पारंपारिक गोष्टींना प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प अशी अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील.
केंद्रीय अर्थसंकल्प हा सरकारचा ‘पॉलिसी सिग्नल’ आहे, म्हणजे उद्योग, व्यापार, गुंतवणूकदार यांना पुढील धोरणे काय असतील याचा संदेश देण्याचे एक माध्यम. यंदाच्या वर्षी किती उत्पन्न जमा होणार आहे आणि किती खर्च होणार आहे, याचा आढावा हा एक भाग आहे; परंतु सध्याचा अर्थसंकल्प हे अमृतकाळातील विकसित भारताचे चित्र दर्शवणारा आणि ते पूर्ण करण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, हे सांगणारा भविष्यवेधी दस्तावेजदेखील आहे. भविष्यातील युवाशक्तीच्या गरजा आणि त्याची पूर्तता करण्याचे आशादायक चित्र यात आहे. अर्थसंकल्प हा आता पूर्वीइतका ‘इव्हेंट’ राहिलेला नाही. अर्थात हा एक चांगलाच ‘सिग्नल’ आहे. केवळ याच वर्षीच्या अर्थसंकल्पात नव्हे, तर गेल्या काही वर्षांत ‘विकसित भारताच्या’ वाटचालीला दिशा, गती आणि निधी देण्याचे काम या अर्थसंकल्पात अगदी योग्य प्रकारे केले गेले आहे, यात शंका नाही.