
भूषण ओक - शेअर बाजार अभ्यासक, विश्लेषक
‘धन की बात’ या साप्ताहिक पुरवणीत सुरू केलेल्या निवडक कंपन्यांच्या विश्लेषणात्मक लेखमालिकेत आतापर्यंत १३ कंपन्यांचा आपण अभ्यास केला. या कंपन्यांची निवड मूल्याधिष्ठित गुंतवणुकीच्या तत्त्वांवर आधारित आहे. यामध्ये मुख्यत्वेकरून उत्तम व्यवसायवाढ आणि नफावाढ, भविष्यात व्यवसायवृद्धीसाठी पुरेसा वाव आणि संधी, भांडवली गुंतवणुकीचा उत्तम विनियोग दर्शवणारी आरओसीई आणि इतर गुणोत्तरे, उत्तम रोकड आवक, मजबूत ताळेबंद, खेळत्या भांडवलाचे समाधानकारक नियोजन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वाजवी मूल्यांकन हे सर्व घटक किंवा यातील बहुतांश घटक पूरक असलेल्या कंपन्यांचाच विचार केला गेला. मात्र, गुंतवणुकीच्या वेळी केलेली अनुमाने प्रत्यक्षात खरी उतरतात आहेत की नाही, हे वेळोवेळी तपासून बघणे आणि त्यानुसार आवश्यक ते धोरणात्मक बदल करणेही आवश्यक असते.