
विकसित देश होण्याचं भारताचं स्वप्न पूर्ण होणार का?
ई सकाळ
भरत फाटक
bharat@wealthmanagers.co.in
सध्या आपला देश जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून ओळखला जात आहे. एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) आधारे जगातील चौथी अर्थव्यवस्था ठरलेला भारत लवकरच तिसरी अर्थव्यवस्था होईल, असे मानले जात आहे. विकसित देशांच्या यादीतही लवकरच आपलाही समावेश होईल, असा आशावाद बळ धरत आहे. यासाठी आपले बलस्थान आहे ते आपली तरुण लोकसंख्या. विकसित देश म्हणून स्थान मिळवण्यासाठी आपली वाटचाल कशी असावी, याचा घेतलेला हा वेध…
‘विकसित देश’ म्हणजे काय? ज्या देशाने आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि तंत्रज्ञानात एक विशिष्ट टप्पा गाठलेला आहे, त्याला ‘विकसित देश’ म्हटले जाते. यात सर्वसाधारणपणे वापरले जाणारे निकष म्हणजे दरडोई उत्पन्नाची पातळी, उद्योगधंद्यांमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, उच्च दर्जाची शिक्षण व्यवस्था, उत्कृष्ट आरोग्यसुविधा, सुरक्षित सामाजिक रचना आणि उत्तम जीवनमान हे आहेत. अशा देशांमध्ये कृषीपेक्षा उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र, संशोधन आणि तंत्रज्ञानावर अधिक भर दिला जातो. अमेरिका, जपान, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, नॉर्वे, स्वीडन यांसारख्या देशांचा यामध्ये समावेश होतो. संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक यांसारख्या संस्था विकासमान मोजण्यासाठी काही निर्देशांक वापरतात. त्यात आयुर्मान, मनुष्यबळ विकास निर्देशांक, आरोग्य व शिक्षणाची उपलब्धता, साक्षरता दर, बालमृत्यूचे प्रमाण हे महत्त्वाचे आहेत. स्थिर सरकार, कायद्याचे पालन, स्वच्छ व सुरक्षित शहरे, रस्ते, वीज, पाणी, इंटरनेट यांसारख्या पायाभूत सुविधा, पर्यावरण व नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन यांसारख्या बाबीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. विकसित देश ही फक्त आर्थिक समृद्धीची व्याख्या नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या दर्जेदार जीवनमानाची, न्याय संधीची आणि शाश्वत प्रगतीची एकत्रित ओळख आहे.