

War and the Market: Crisis or Opportunity for Smart Investors?
sakal
-गौरव बोरा, शेअर बाजार विश्लेषक
जागतिक भू-राजकीय संघर्ष आणि आर्थिक बदल यांचा शेअर बाजारावर नेहमीच परिणाम होतो. प्रत्येक मोठ्या युद्धानंतर किंवा भू-राजकीय तणावानंतर ऊर्जा, संरक्षण आणि कमोडिटी क्षेत्राची समीकरणे बदलली जातात. सध्या पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या भावांमुळे जागतिक बाजार अस्थिर असले, तरी भारतीय गुंतवणूकदारांसाठी हा काळ संधी म्हणून समोर येत आहे. सध्या भारतीय शेअर बाजार एका ‘रिसेट’ टप्प्यातून जात आहे. ‘निफ्टी’ सध्या २३,१५१ अंशांच्या दरम्यान असून, अलीकडील घसरणीने बाजारातील ‘ओव्हरव्हॅल्युएशन’ कमी करण्यास मदत केली आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, बाजारातील शेअरभाव कमी झाले असले तरी कंपन्यांची आर्थिक स्थिती कमकुवत झालेली नाही. आकडेवारीनुसार, ‘निफ्टी’चा पी/ई रेशो २४ वरून २० वर आला आहे. म्हणजेच, कंपन्यांची कमाई (ईपीएस) वाढत असूनही शेअरचे भाव वाजवी झाले आहेत. मिड व स्मॉल कॅपमध्ये तर ३०-४० टक्क्यांपर्यंतची सुधारणा झाली आहे, ज्यामुळे हे शेअर आता अधिक आकर्षक पातळीवर आले आहेत.