भाष्य : विराटचे गतिशास्त्र नि नीतिशास्त्र

द्वारकानाथ संझगिरी
Wednesday, 9 December 2020

नव्या आक्रमक पिढीसाठी तो नवा आदर्श झालेला आहे. विराटने बारा हजार धावांचा टप्पा ओलांडून विक्रम नोंदविला, त्यानिमित्ताने या ‘विराटपणा’विषयी. विराट कोहलीने वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १२ हजार धावांचा टप्पा ओलांडला.

सचिन तेंडुलकर हा क्रिकेटच्या सनातन नीतिशास्त्राच्या पुस्तकाप्रमाणे आदर्श रोल मॉडेल होता. विराटने आपले नीतिशास्त्रच बदललेय. नव्या आक्रमक पिढीसाठी तो नवा आदर्श झालेला आहे. विराटने बारा हजार धावांचा टप्पा ओलांडून विक्रम नोंदविला, त्यानिमित्ताने या ‘विराटपणा’विषयी.

विराट कोहलीने वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १२ हजार धावांचा टप्पा ओलांडला. अर्थात, ही बातमी नाहीये. बातमी म्हणजे, सर्वांत कमी खेळीत (२४२) ओलांडलाय. सचिनने तो टप्पा ३०० खेळींत, पॉन्टिंगने ३१४, संगकाराने ३३६ आणि जयसूर्याने ३७९ खेळींत पार केला होता. विराटची फलंदाजी ही भरधाव निघालेल्या ट्रेनसारखी असेल, तर हे विक्रम निव्वळ वाटेवरची स्टेशन आहेत. ती गाडी कुठे जाऊन थांबणार, हे फक्त नियतीला ठाऊक आहे. नियती अशी गुपितं आधी फोडत नाही. पण जशी ट्रेन पुढे जाते तसं तसं नियतीच्या मनातले संकेत मिळू शकतात. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विक्रम हे अर्थात मोडण्यासाठीच असतात. आजपर्यंत अनेक मोठ्या विक्रमांचं गर्वहरण झालंय. काही अपवाद सोडा. उदा. ब्रॅंडमनची कसोटीतली ९९.९४ ही सरासरी. किंवा सचिनची १०० आंतरराष्ट्रीय शतकं. पण ते विक्रमसुद्धा अमर नसावेत. सोबर्सने नाबाद ३६५ धावा केल्यावर त्याचा विक्रम मोडला जाईल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं, असं त्याने पुस्तकात नमूद करून ठेवलंय. मग तो लाराने मोडला. मग लाराचा हेडनने मोडला. आणि पुन्हा हेडनचा लाराने मोडला. आणि ४०० धावा केल्या. (त्यादिवशी लाराचे पाय मला क्रिकेटपटूंच्या राखीव देव्हाऱ्यात ठेवावेसे वाटले.) या मोठ्या विक्रमाच्या तुलनेत १२ हजार धावा ओलांडण्याचा विक्रम म्हणजे मैलाचा दगड ओलांडणे आहे.

पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हा मैलाचा दगड त्याने इतरांपेक्षा लवकर ओलांडला, म्हणून विराट गलिव्हर आणि इतर ’बुटके’ होत नाहीत. क्रिकेटमध्ये एका काळातल्या फलंदाजाने केलेल्या विक्रमाची तुलना दुसऱ्या काळातल्या फलंदाजाशी करून लहान, मोठा ठरवता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आकडेवारी ही सुंदर स्त्रीच्या फोटोसारखी असते. तो सौंदर्याबद्दल बरंच काही सांगतोही पण ते सांगणं हे त्या फोटोग्राफरच्या कौशल्यावर अवलंबून असतं.. विराटची आकडेवारी ही तशीच आहे. २४० खेळींमध्ये विराटने १२ हजार धावांचा टप्पा पार केला. पण ती आकडेवारी हे सांगत नाही की वनडेचे नियम गेल्या काही वर्षात बरेच बदललेले गेले. आता १० ते ४० षटकात वर्तुळाबाहेर फक्त ४ क्षेत्ररक्षक असतात. पूर्वी ५ असत. आणि हा १ क्षेत्ररक्षक वर्तुळाबाहेर नसणं हा धावांच्या बाबतीत खूप मोठा फरक करतो.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आकडेवारी हे सांगत नाही, की आता दोन नवे चेंडू घेऊन मॅच खेळली जाते. त्यामुळे फलंदाजाला शेवटपर्यॅंत दोन टणक चेंडू मिळतात. पांढरा चेंडू फारसा स्विंग होत नाही. पूर्वी एका चेंडूच्या वेळी रिव्हर्स स्विंगला संधी होती. आता ती नसते. पूर्वी  तो चेंडू हळू हळू नरम होत जायचा. त्यामुळे फटके मारण्यासाठी जास्त ताकद लागायची. फलंदाजासाठी आज वनडेमध्ये धावा काढणं जास्त सोपं झालंय. आकडेवारी हेदेखील सांगत नाही की आता बॅटचा दर्जा बदलला आहे. सीमारेषा छोट्या झाल्या आहेत. वाढत्या टी-ट्‌वेन्टीच्या अनुभवामुळे आक्रमक वृत्ती वाढली आहे. नवनव्या फटक्‍यांनी जन्म घेतला आहे. खेळपट्या जास्तीत जास्त फलंदाजधार्जिण्या झाल्या आहेत. आणि गोलंदाजीचा दर्जा विशेषतः आंतरराष्ट्रीय गोलंदाजीचा दर्जा प्रचंड खालावलाय. आता खरे खुरे जागतिक गोलंदाज शोधायला प्रचंड विचार करायला लागेल. पूर्वी प्रत्येक संघात दोन - दोन, तीन - तीन जागतिक दर्जाचे गोलंदाज असत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय धावा या अधिक सोप्या झालेल्या आहेत.

फलंदाजांमधला एक्का
याचा अर्थ विराट हा महान फलंदाज नाही का? असं मुळीच नाही. तो नक्कीच महान आहे. ज्यांना ओलांडून तो पुढे जातोय, त्या प्रत्येक फलंदाजाच्या मांडीला मांडी लावून बसायचा दर्जा त्याचा आहे. याचं कारण तो आजच्या जगातल्या फलंदाजांमधला एक्का आहे. पूर्वीच्या काळात त्याला खेळता आलं नाही, ही काही त्याची चूक नाही. आजच्या काळात तो इतरांपेक्षा पुढे आहे ना, हे महत्त्वाचं आहे. वनडेच काय पण तिन्ही फॉरमॅटमध्ये म्हणजे टीट्‌वेन्टी, वनडे आणि टेस्टचा विचार केला, तर तो इतरांच्या प्रचंड पुढे आहे. त्या तुलनेसाठी आपण आजचे आणखी तीन श्रेष्ठ फलंदाज घेऊ. स्मिथ, विल्लियमसन आणि रूट ! स्मिथची कसोटी सरासरी विराटपेक्षा जास्त आहे. पण इतर फॉर्मेटच्या बाबतीत विराट इतरांच्या खूप पुढे आहे. तो खूपच विराट आहे. दुसरी गोष्ट पाठलाग करून मॅच जिंकून देणं ही गोष्ट क्रिक्रेटच्या प्रत्येक युगात कठीण मानली गेलेली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 वनडेत त्याने पाठलाग करून सर्वात जास्त सामने जिंकून दिले आहेत. आणि पाठलाग करताना त्याने आजपर्यंत वनडेत सर्वाधिक २६ शतकं ठोकलेली आहेत. त्याची फटक्‍यांची समृद्धी अशी आहे, की फॅन्सी फटके मारण्याची त्याला गरजच पडत नाही. त्यामुळेच परवा त्याने डिविल्लीयेर्ससारखा फटका मारल्यावर तो स्वतःही खुश होता आणि विराटचं काँट्रिब्युशन हे फक्त त्याच्या फलंदाजीचं नाहीये. त्याच्या पलीकडचं काँट्रिब्युशन  आहे. त्याने फिटनेसची संस्कृती भारतीय संघात आणली. तो कर्णधार आहे आणि संघातला सर्वात फिट खेळाडू आहे.डाएट ह्या शब्दाची व्याख्याच त्याने क्रिकेटपटूंसाठी बदलली आहे.

चेहरा मनाचा आरसा
भारतीय संघाची शरीराची भाषा ही सौरभ गांगुलीने बदलली. विराटने ती अधिक उद्धट केली. ऑस्ट्रेलियासारख्या संघाविरुद्ध खेळताना या उद्धटपणाची गरजच असते. त्याचा चेहरा हा त्याच्या मनाचा आरसा आहे. धोनीप्रमाणे तो मनातल्या भावना लपवून ठेऊन चेहरा निर्विकार ठेऊ शकत नाही. त्याच्या मनात उसळलेला लाव्हा त्याच्या चेहऱ्यावर उमटतो. त्यामुळे एक प्रकारची आक्रमकता ही एकदंर त्याच्या वावरण्यात सातत्याने दिसते. मैदानावरही जाणवत असते. बरं त्यात त्याने सामाजिक बंडखोरीही केली आहे. आजच्या युगामध्ये ‘लिव इन रिलेशनशिप’ ही बातमी नसते. पण मध्यमवर्गीय लोक अजूनही मोठ्या प्रमाणावर याबाबतीत प्रतिगामीच आहेत. आताच्या बायकोबरोबर तो आधी ’लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहिला. मग त्याने लग्न केलं. आणि  ते ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहताना ती त्याच्याबरोबर जगभर फिरत होती. पण कुणीही त्याबद्दल ब्र काढला नाही. कारण पहिल्या बाजीरावाप्रमाणे तो लढाया जिंकून देत होता. अशावेळेला मस्तानी खटकत नाही. आणि मग त्याने लग्नही केलं. आणि आता तर त्याने पॅटर्निटी लिव्ह घेऊन क्रिकेट हा एक इतर व्यवसायांसारखा व्यवसाय आहे आणि मला गरज आहे त्यावेळेला मला रजा मिळायला पाहिजे, हे ठासून सांगितलं. हे तो ठासून सांगू शकला, याचे कारण त्याला माहितेय तो रजेवर गेल्यानंतर त्याची जागा कुणीही घेणार नाहीये. रजेवरून परत आल्यानंतर त्याचं नेतृत्व आणि त्याची फलंदाजीची जागा त्याला मिळणारच आहे. 

सचिन तेंडुलकर हा क्रिकेटच्या सनातन नीतिशास्त्राच्या पुस्तकाप्रमाणे आदर्श रोल मॉडेल होता. विराटने आपलं नीतिशास्त्र बदललंय. पण नव्या आक्रमक पिढीसाठी तो रोल मॉडेल झालेला आहे. त्याच्या दाढीपासून, रोमान्सपासून, बॅटिंगपर्यंत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian captain virat kohli fastest bastman to 12000 runs in ODI