चिंता करते विश्‍वाची!

shahaji more
shahaji more

जागतिक तापमानवाढीच्या विरोधात स्वीडनमध्ये सोळा वर्षांच्या ग्रेटा थुनबर्ग या मुलीने गेल्या वर्षीपासून अभिनव लढा सुरू केला आहे. हा लढा आता तिचा एकटीचा राहिला नसून, जगभरात त्याचे पडसाद उमटत आहेत.

अ नियमित पाऊस, अमर्याद स्वरूपाची वादळे, भीषण दुष्काळ, अंगाची काहीली करणारा उष्मा, वाढत चाललेले वणवे आदी समस्यांनी अक्राळ-विक्राळ रूप धारण केले आहे. यांचे चटके बसायला लागल्यानंतर जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न होत आहेत. तापमानवाढ रोखण्यासाठी प्रत्येक देश काय करू शकतो व काय करू इच्छितो, यांवर चर्चा होत आहेत.

जागतिक तापमानवाढ आता पराकोटीला पोचली आहे व आता ती कमी करणे (जवळजवळ) अशक्‍य आहे; परंतु यापुढे ती आणखी वाढणार नाही, याची दक्षता घेतली तरी ते विश्‍वकल्याणाचे होईल; परंतु तापमानवाढीविरोधात इतके तुटपुंजे उपाय योजले जात आहेत, की तापमानवाढीचा वेग रोखणे दुरापास्तच म्हणावे लागेल. त्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर आपण काय करतो व काय करू शकतो, याचा विचार करावयास हवा. स्वतःमुळे कार्बन डायऑक्‍साईड उत्सर्जनात किती भर पडते व ती कमी कशी करता येईल, यासाठी उपाययोजना केली पाहिजेच, शिवाय यापलीकडे जाऊन व्यापक विचारही केला पाहिजे. असा विचार केला तो एका स्विडीश किशोरीने व आता ती एका जागतिक लढ्याच्या केंद्रस्थानी जाऊन पोचली आहे.सध्या सोळा वर्षांची असलेली ग्रेटा थुनबर्ग या मुलीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये स्वीडनच्या निवडणुकीपर्यंत (९ सप्टेंबर २०१८) शाळेत गैरहजर राहून स्वीडनच्या पार्लमेंटच्या बाहेर एकटीने धरणे आंदोलन सुरू केले. तिच्या हातात ‘स्कूल स्ट्राईक फॉर क्‍लायमेट’ (हवामानासाठी शाळा बंद!) असा फलक होता. आता निवडणुकीनंतर ती फक्त शुक्रवारी शाळेला दांडी मारून धरणे धरते. तिचा लढा आता एकटीचा राहिला नसून, त्याचे जगभर पडसाद उमटत आहेत. पंधरा मार्चला १२० देशांतील सुमारे दोन हजार शहरांत १४ लाख विद्यार्थ्यांनी तापमानवाढीच्या विरोधात सरकारे काहीच करीत नसल्याबद्दल निदर्शने केली.

गेल्या जानेवारीत पोलंडच्या कॅटोवाईस शहरात झालेल्या राष्ट्रसंघाच्या हवामान परिषदेत तापमानवाढ रोखण्यासाठी जगातील सरकारे, प्रौढ व्यक्ती काहीच कसे करीत नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित करून ग्रेटाने सर्वांच्या डोळ्यांत अंजन ठरावे, असे भाषण केले. आपल्या भाषणात ती म्हणते, ‘‘काही मुले शाळेत गेली नाहीत, ही जगभरातील ठळक बातमी ठरते, तर मग कल्पना करा, की तापमानवाढीच्या विरोधात आपणाला खरोखर काही करावेसे वाटत असेल, तर आपण काय काय करू शकतो?’’ ‘‘अमाप पैसा मिळविण्याच्या काही लोकांच्या हव्यासासाठी आपल्याला जीवनाचा त्याग करावा लागत आहे. २०७८ मध्ये मी माझा ७५ वा वाढदिवस साजरा करीन. मला मुले असतील तर ते तो दिवस माझ्यासोबत साजरा करतील. ते मला तुमच्याविषयी विचारतील. कदाचित ते असेही विचारतील, की तुम्ही सर्व जण वेळ असतानासुद्धा तापमानवाढ रोखण्यासाठी, हवामानासाठी काहीच कसे केले नाही? तुम्ही म्हणता, आम्हाला आमची मुले सर्वाधिक प्रिय आहेत, तरीही तुम्ही आमचे भवितव्य आमच्या डोळ्यांसमोर चोरून नेता. आपल्याकडील सांगावयाच्या सबबी संपल्या आहेत; आणि काळही आपल्या हातून निघून चालला आहे.’’ केवळ सोळा वर्षांच्या मुलीचे हे भाषण! या भाषणामुळे या अनोख्या लढ्याला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. आज अनेक शास्त्रज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटाच्या लढ्याला पाठिंबा देत आहेत.

‘जगातील अनेक देश २०१५ च्या पॅरिस करारात ठरल्याप्रमाणे तापमानवाढ दोन अंश सेल्सिअसच्या खाली ठेवण्यासाठी काहीच करीत नाहीत. या तरुण मुलांची चिंता योग्य असून, त्यांना विज्ञानविश्‍वाचा पाठिंबाच असेल,’ असे पत्रक जर्मनी, ऑस्ट्रिया व स्वित्झर्लंडमधील संशोधकांनी काढले असून, त्यावर १२०० हून अधिक शास्त्रज्ञांच्या सह्या आहेत. जगभरातील अनेक देशांतील तरुणांनी असे आंदोलन उभारले आहे. ग्रेटाचे आता शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी नामांकन झाले आहे. नॉर्वेचे खासदार फ्रेडी आंद्रे ओवेस्टेगार्ड म्हणतात, ‘‘आम्ही ग्रेटाचे नाव ‘नोबेल’साठी सुचविले आहे. कारण, हवामानबदलाविषयी आताच आपण काहीच केले नाही, तर ते एक युद्धाचे, शरणार्थी निर्माण होण्याचे कारण होईल!’’ हा लढा सुरू करण्यापूर्वी आपल्या जीवनशैलीमुळे वातावरणात मिसळणारा कार्बन डायऑक्‍साईड वायू (कार्बन फूटप्रिंट्‌स) कमी केला पाहिजे म्हणून ग्रेटाने व तिच्या कुटुंबाने मांसाहार वर्ज्य केला आहे. ‘ऑपेरा सिंगर’ असलेल्या तिच्या आईला वारंवार विमानप्रवास करावा लागतो, तोही त्यांनी बंद केला आहे. आजपर्यंत तरुणांची, विद्यार्थ्यांची जगभरात अनेक आंदोलने झाली आहेत. ती सर्वच यशस्वी झाली असे नव्हे. काही चिरडली गेली, काही दुर्लक्षिली गेली, काही विरून गेली; परंतु हे आंदोलन वेगळे आहे, त्याचे स्वरूप वेगळे आहे. ते जगाच्या भल्यासाठी व उद्याच्या पिढ्यांच्या अस्तित्त्वासाठी आहे. त्याला सुयश चिंतूया!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com