हे चित्र आणि ते चित्र! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

इतिहास म्हटला, की अलीकडे आपल्याकडे अनेकांचे बाहू फुरफुरू लागतात, छाती अभिमानाने फुलून येते वगैरे. परंतु याच इतिहासाच्या, संस्कृतीच्या खुणा जपण्याबाबत मात्र समाजात कमालीची अनास्था दिसते. समाजातच अनास्था असल्यावर सरकारे तरी कशाला हातपाय हलवितील? ही अवस्था देशाच्या विविध भागांतील अनेक ऐतिहासिक गोष्टींबाबत आहे. पण जागतिक आश्‍चर्य मानला जाणारा ताजमहालही त्यातून सुटू नये, ही धक्कादायक बाब आहे. त्यामुळेच ताजमहालच्या जतनाबद्दल सरकार व पुरातत्त्व विभाग यांच्याकडून होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे कान उपटले आहेत.

इतिहास म्हटला, की अलीकडे आपल्याकडे अनेकांचे बाहू फुरफुरू लागतात, छाती अभिमानाने फुलून येते वगैरे. परंतु याच इतिहासाच्या, संस्कृतीच्या खुणा जपण्याबाबत मात्र समाजात कमालीची अनास्था दिसते. समाजातच अनास्था असल्यावर सरकारे तरी कशाला हातपाय हलवितील? ही अवस्था देशाच्या विविध भागांतील अनेक ऐतिहासिक गोष्टींबाबत आहे. पण जागतिक आश्‍चर्य मानला जाणारा ताजमहालही त्यातून सुटू नये, ही धक्कादायक बाब आहे. त्यामुळेच ताजमहालच्या जतनाबद्दल सरकार व पुरातत्त्व विभाग यांच्याकडून होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे कान उपटले आहेत. एकीकडे अकार्यक्षमता किंवा अज्ञानामुळे होणारी ही उपेक्षा, तर दुसरीकडे ताजमहाल हा एका मुघल राज्यकर्त्याने बांधला आहे, म्हणून त्याचा दुःस्वास असाही प्रकार आढळतो. त्यामुळेच इतिहास, स्मारके यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच विकसित होण्याची गरज आहे. ताजमहालबाबत न्यायालयाने ताशेरे ओढल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानातून आलेली एक बातमी लक्षवेधक म्हणावी लागेल. वायव्य सरहद्द प्रांतातील स्वात खोऱ्यात असलेल्या भगवान गौतम बुद्धांचे जे शिल्प ‘तालिबान्यां’नी सात वर्षांपूर्वी धर्मांधतेतून उद्‌ध्वस्त केले होते, त्या शिल्पाची डागडुजी करून त्याला बव्हंशी त्याचे आधीचे रूप देण्यात यश आले आहे. गौतम बुद्धांचे हे शिल्प पाकिस्तानी ‘तालिबान्यां’नी २००७ मध्ये उद्‌ध्वस्त करताना, असहिष्णुतेची परमावधी गाठली होती. त्यांनी हा ‘हिंसाचार’ नेमका कसा घडवून आणला, त्याचे वृत्त पुढे बऱ्याच कालावधीनंतर ‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तसमूहाने दिले होते. ड्रिल मशीनचा वापर करून, या शिल्पात स्फोटके भरून मूर्ती उडवून देण्यात आली. तेव्हा पाकिस्तानातील बौद्ध तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक परवीन शहीन यांनी, ‘हे घडले तेव्हा आपणास आपल्या वडिलांचीच हत्या होत असल्याचे वाटत होते’ अशी प्रतिक्रिया व्यक्‍त केली होती. शिल्प बव्हंशी पूर्ववत करून पाकिस्तानने त्या देशात शहाणपणाचे अवशेष शिल्लक असल्याचा पुरावा दिला आहे. पाकिस्तान आणि भारतातील परिस्थितीत महदंतर आहे, तरीही या घटनांची योग्य ती दखल घ्यायला हवी.
आग्रा परिसरातील रसायनांच्या कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या वायूंमुळे ताजमहाल काळवंडून जात आहे. शाश्‍वत प्रेमाचे प्रतीक असलेल्या या वास्तूची नित्यनेमाची निगराणीही धडपणे होत नव्हती. त्यामुळेच हा विषय न्यायालयाच्या चावडीवर गेला आणि ‘एक तर तुम्ही या वास्तूचे जाणतेपणाने जतन करा किंवा पाडून तरी टाका’ असा थेट इशारा देणे न्यायाधीशांना भाग पडले. पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षाही ताजमहाल देखणा आहे, याची आठवण यावेळी उत्तर प्रदेश सरकारला करून देणे, न्यायालयाला भाग पडावे, यासारखी दुसरी नामुष्कीची बाब नाही. ताजमहालबाबत उत्तर प्रदेश सरकार दाखवत असलेल्या अनास्थेला आणखी काही पदर आहेत आणि त्याची मुळे ही तेथे अलीकडेच आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या दृष्टिकोनात आहेत. योगी आदित्यनाथ यांचे सरकार सत्तारूढ होताच सहा महिन्यांत प्रसिद्ध केलेल्या ‘उत्तर प्रदेश पर्यटन : अपार संभावनायें!’ या चकचकीत पुस्तिकेत ताजमहालचा समावेशच न करण्याचे धारिष्ट योगी सरकारने दाखवले होते! ताजमहालकडे केवळ योगी सरकारच नव्हे, तर भाजपही नेमक्‍या कोणत्या नजरेने बघतो, तेच त्यामुळे स्पष्ट झाले होते. एका मुस्लिम बादशहाने बांधलेली ही अप्रतिम वास्तू सरकारच्या नजरेला खुपत होती. अर्थात नंतर उत्तर प्रदेश सरकारला पडती भूमिका घेऊन ताजमहालचे माहात्म्य कथन करणे भाग पडले होते. एकीकडे ताजमहाल हा भगवान शंकराचा ‘तेजोमहाल’ आहे, अशा कहाण्या प्रसृत करायच्या आणि त्याच वेळी या वास्तूचे जतन करणे आणि तिची निगा राखणे जाणीवपूर्वक टाळायचे, अशी ही दुटप्पी खेळी आहे. अर्थात केवळ ताजमहालच नव्हे, देशातील अजिंठा-वेरूळच्या लेण्यांपासून अनेक ऐतिहासिक पुरातन शिल्पे व कलाकृतींकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष होत आहे आणि त्यात सरकारी अनास्थेइतकाच वाटा हा तेथे येणाऱ्या पर्यंटकांचाही आहे. कोणत्याही पुरातन कलाकृतीवर आपण तेथे येऊन गेल्याची खूण गोंदवण्याचे प्रकार ती कलाकृती विद्रूप करून सोडतात. अनेक गडकिल्ल्यांची दुरवस्था या आणि अशा प्रकारच्या बेजबाबदार वर्तनामुळेही झाली आहे. तेव्हा गरज आहे, ती इतिहास जपण्याची ‘संस्कृती’ रुजविणे हीच.