एक रुपयाचं ओझं (पहाटपावलं)

एक रुपयाचं ओझं (पहाटपावलं)

 मी पाचवी किंवा सहावीत असेन. त्या वेळेस माझे वडील परतूरला मॅजिस्ट्रेट होते. आमचं भाड्याचं घर रेल्वे स्टेशनच्या जवळ होतं. रोज शाळा सुटली, की संध्याकाळी पाच वाजता नांदेडला जाणारी गाडी यायची. ती बघायला मी जायचो. गार्डाच्या डब्यापासून इंजिनापर्यंत बघत बघत जायचो. गावातली पोरं पितळी बादल्यांतून प्रवाशांना पाणी पाजायचे. "पाणी पाणी' ओरडत फिरायचे.


वडिलांनी मला एके दिवशी विचारलं, "तू स्टेशनवर जातोस, प्लॅटफॉर्म तिकीट काढतोस का?' मी "नाही' म्हणालो. प्लॅटफॉर्म तिकीट काढायचं असतं हेच मला माहीत नव्हतं. ते म्हणाले, "आता इथून पुढं तिकीट काढून जात जा.'


माझे वडील घरात थोडेसे, पण बाहेर फारच कडक शिस्तीचे होते. गावातल्या किराणा दुकानांमध्ये, कपड्यांच्या दुकानामध्ये त्यांनी कधी उधारी ठेवली नाही. कुणाचा खटला कोर्टात त्यांच्यासमोर असेल, तर या उधारीचा फायदा घेऊ नये, म्हणून ते काळजी घेत. दिवाळीला गावातले सगळे दुकानदार आम्हा मुलांसाठी टोपली भरून मिठाई आणि फटाके पाठवत. ते आल्या पावली परत पाठवले जात. आम्हा मुलांना त्याचं फार वाईट वाटे आणि वडिलांचा रागही येत असे. त्या वेळेस वडिलांना खूप कमी पगार होता. आईचं आजारपण सतत असल्यामुळं खर्च फार व्हायचा. तरीसुद्धा घरी कामाला जे चपराशी येत, त्यांच्या अडीअडचणीला ते पैसे देत असत.
आमच्या घरी अब्दुल रहमान नावाचा चपराशी घरकामाला येत असे. संध्याकाळी घरातल्या चिमण्या, कंदील आणि पेट्रोमॅक्‍स घासून-पुसून लख्ख करून त्यात रॉकेल भरून ठेवणं, सकाळी भाज्या, दळण आणणं आणि मला सायकलवरून शाळेत सोडणं, अशी त्याची कामं होती. शिवाय कोर्टामध्ये "हाजीर हो'चा पुकारा तो करायचा.
माझी शाळा घरापासून तीन मैलांवर जुन्या गावात होती. एकदा सायकलवर पुढ्यात बसून नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना अचानक मला आठवलं, सहामाही फी एक रुपया भरायचीय. नाही भरली तर परीक्षेला बसू देणार नव्हते. आणि मी तर वडिलांना सांगण्याचंच विसरून गेलो होतो. परीक्षेला बसता येणार नाही, या कल्पनेनंच मला रडायला यायला लागलं.


अब्दुल रहमान मला "बाबा' म्हणायचा. त्यानं विचारलं, "बाबा, क्‍यूँ रो रहे हो?' मी त्याला फीचं सांगितलं. शाळा अगदी जवळ आली होती आणि प्रार्थनेची वेळ झाली होती. पुन्हा घरी जाऊन एक रुपया आणायला वेळ नव्हता. अब्दुल रहमान मला म्हणाला, "बाबा, रो मत. सब ठीक हो जाएगा.'
शाळेच्या फाटकापाशी त्यानं मला सायकलवरून उतरवलं. त्यानं त्याच्या शर्टाच्या खिशात हात घातला आणि एक रुपया काढून दिला. तो हैद्राबादी हाली रुपया होता. (एक कलदार रुपयापण असायचा. तो चांदीचा असायचा.) मला देताना म्हणाला, "बाबा, कल मुझे वापस करना हॉं. घर में चावल नहीं हैं। आज लाना था । कोई बात नहीं, कल लाएँगे।'


मी मानेनंच "हो' म्हणालो. डोळे पुसले आणि फाटकातून आत पळालो.
आणि त्या एक रुपयाचं मी साफ विसरून गेलो. त्यानंसुद्धा मला परत कधी आठवण केली नाही आणि वडिलांनाही सांगितलं नाही. त्या अब्दुल रहमानचं पुढं काय झालं, काही माहीत नाही.
आज पन्नास-साठ वर्षांनंतर ते मला आठवतंय. माझ्या वडिलांनी आयुष्यात कधी एका रुपयाचीसुद्धा उधारी केली नव्हती, आणि मी आयुष्यभर एक रुपयाचं कर्जाचं ओझं मनावर घेऊन वावरतोय. ते मला आता कधीच फेडता येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com