वेगावर स्वार झालेला पुजारी!

केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील पुदुकुलमगारा देवीच्या मंदिरात पुजारी असलेले ३४ वर्षीय उन्नीकृष्णन व्ही. एल. चक्क बाईक रेसर आहेत
34 year-old vl unnikrishnan priest Puthukulangara Devi temple in Kerala bike riders
34 year-old vl unnikrishnan priest Puthukulangara Devi temple in Kerala bike ridersSakal

- किशोर बोकडे

केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील पुदुकुलमगारा देवीच्या मंदिरात पुजारी असलेले ३४ वर्षीय उन्नीकृष्णन व्ही. एल. चक्क बाईक रेसर आहेत. एक संगणक अभियंता अशीही त्यांची ओळख आहे. केवळ छंद म्हणून नव्हे; तर त्यांनी बाईक रेसिंगची राष्ट्रीय चॅम्पियनशिपही जिंकली आहे.

पहाटे मंदिराचा पुजारी आणि दिवसभर रेसर अशी दुहेरी भूमिका जगणारा उन्नीकृष्णन नावाचा अवलिया आता केरळची शान बनला आहे. २०१९ मध्ये उन्नीकृष्णन आपल्या मुलासोबत नेपाळमध्ये बाईक ट्रिपला गेले होते. तेथूनच त्यांच्या आयुष्याने एक वळण घेतले.

उन्नीकृष्णन यांचे वडील नारायणन नंबुद्री पुजारी होते. २०१९ मध्ये त्यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर मंदिराची जबाबदारी त्यांच्यावर आली. पुजारी कुटुंबातील असल्याने उन्नीकृष्णन यांना त्यांच्या वडिलांनी लहानपणापासून मंदिरातील सर्व पूजाविधी शिकवले होते.

डिसेंबर २०२१ पासून पुदुकुलमगारा देवी मंदिरात अधिकृतपणे ते पुजारी म्हणून रुजू झाले. संगणक विज्ञान विषयातून अभियंता असणारे उन्नीकृष्णन केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील वायकोम गावचे रहिवासी. कोचीमधील मोठ्या आयटी कंपनीत नोकरी करत त्यांनी पुजाऱ्याचे काम सुरू केले. पुदुकुलमगारा देवीच्या मंदिरात पहाटे पाच वाजता त्यांचे काम सुरू होते.

मंदिराचे दरवाजे उघडणे, देवीची पूजाअर्चा करणे, भाविकांचे स्वागत करणे, मंदिरात दिवे लावणे, प्रसाद वाटणे हे त्यांचे नित्यकर्म. नोकरी आणि पुजाऱ्याचे काम करत असताना त्यांच्यातील बाईक रेसर त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.

सकाळी पूजापाठ झाल्यानंतर नोकरी, त्यानंतर बाईक रायडिंगचा सराव ते करत असत; मात्र २०१० ते २०१३च्या काळात नोकरीतील रात्रपाळी आणि दिवसपाळीच्या कसरतीमध्ये त्यांच्या बाईक रायडिंगच्या स्वप्नाला ग्रहण लागू लागले. त्यासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे अखेर त्यांनी मोठ्या पगाराच्या नोकरीवर पाणी सोडले.

सकाळी देवीची सेवा झाल्यानंतर पुजाऱ्याच्या पेहरावातले उन्नीकृष्णन वेषांतर करतात. मंदिरात सोबत आणलेल्या बॅगेतील रायडिंगचे जॅकेट, बूट, हेल्मेट आणि पाण्याची बाटली जामानिमा घेऊन ते एका रेसरच्या पोषाखामध्ये बाहेर पडतात आणि त्यांची रायडिंग सुरू होते.

त्यांचा असा अवतार पाहून सुरुवातीला स्थानिकांनी त्यांना नावेही ठेवली; परंतु समाजाचा विचार न करता त्यांनी छंद जोपासणे सुरू ठेवले. खरेतर उन्नीकृष्णन यांना मोटरसायकल आणि रेसिंगची रुची २००७ पासून वाटू लागली. तेव्हा त्यांना दुचाकीचा परवाना मिळाला होता.

कोचीतील व्यावसायिक स्टंट रायडिंग आणि रेसिंग क्लबमध्ये प्रवेश घेतला. २०११च्या सुरुवातीला बाईक रेसिंगसाठी आवश्यक कौशल्य संपादन केले. तेव्हापासून त्यांची घोडदौड सुरूच आहे. २०२१ मध्ये त्यांनी मोटरसायकल रेसिंगसाठी भारतीय मोटार स्पोर्टस् क्लब फेडरेशनचा परवाना मिळवला. त्यानंतर कोईम्बतूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय रॅली चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला.

स्पर्धा आव्हानात्मक होती; परंतु आपल्या ‘एक्सप्लस २०० सीसी’ बाईकवरून त्यांनी ती जिंकली आणि त्यांचा विश्वास दुणावला. येत्या नोव्हेंबरमध्ये बेंगळुरुमध्ये ‘डर्ट ट्रॅक रेस’ होणार आहे. त्यासाठी ते प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे; मात्र जिद्द मोठी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com