गोष्ट तिची, माझी आणि समाजाचीही

Aarti Gadhwe
Aarti Gadhwe

गो ष्ट जेवढी तिची, माझी आहे, तेवढीच ती समाजाची आहे. काल पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महिलादिनी नेहमीचे सोहळे, पुरस्कार, प्रतीकात्मक कार्यक्रमांची रेलचेल होती. समारंभ संपले; पण मनातले काहूर तसेच राहिले. त्या अस्वस्थतेला शब्दरूप देण्याचा केलेला हा प्रयत्न.

समाज मान्य करतो प्रवासाचा प्रत्येक क्षण. जो त्याच्याही प्रगतीचा अविभाज्य भाग; पण नाकारतोदेखील त्याच्याच विकासासाठी पडणारं एखादं पाऊल. त्याच पावलाची घुसमट या संपूर्ण प्रगतीची लयच अस्वस्थ करून सोडते. मग वास्तवाचं स्वरूप नक्की काय आहे, या विचाराने मन संभ्रमित होते. कारण तेव्हा उमगत असतात प्रगतीचे वेगवेगळे अन्वयार्थ आणि गोंधळ उडतो या प्रवासातून. प्रश्‍न येतो वेगळंही काही साध्य करायचं होतं का?
समानतेचं स्वप्नं रुजवू पाहणारा तिचा संघर्ष हा शेवटी तिलाच करायला लावतो एका अटळ संस्कृतीचा स्वीकार. ज्यामध्ये समान संधीच नसते. तेव्हा तोच संघर्ष एका वेगळ्या भूमिकेत उभा राहतो. स्वतःच्या स्वप्नांतील कल्पना आणि वास्तवाचा अप्रिय चेहरा... हळूहळू या सगळ्याकडे आपण तिचा असणारा त्याग या एकाच संकल्पनेतून बघतो, तर काही वेळेस गृहीत धरून टाकतो, हीच आपली परंपरा आहे... पण याही पलीकडे काहीतरी आहे, जे तिने कधी व्यक्त केलंच नाही.

इतक्‍या साऱ्या कौतुक सोहळ्यात कधी कधी हलकेच श्वास सोडत हसते ती. तेव्हा मात्र स्वतःच्याच अपेक्षांचं ओझं सोडल्यावरची खिन्नता दिसते तिच्याकडे. स्वतःचं यशच अपयशाचं कारण ठरेल, असे अनुभव असतात तिच्यासोबत... आपण आजवर फक्त यशाकडे पाहत आलो, त्याचे कौतुक करत आलो. अर्थात ते करायलाही हवंच; पण आपण कधीच शोधत नाही तिच्या जगण्यात आलेल्या अपयशाची कारणे. समस्येची व्यवस्थात्मक उकल करण्यासाठी अद्यापही ओळखदेखील झाली नाही, असं वाटत रहातं, जेव्हा त्याच त्याच घटनांची थोड्याफार फरकाने पुनरावृत्ती होते. बहुतेक वेळा आपण फक्त पुरुषप्रधान संस्कृतीविषयीच बोलत असतो; पण त्याचे आपणही एक असंवेदनशील पाईक आहोत, हे साधं जाणवतही नाही. अर्थात असा विचार करताना काही लोकांना वाटेलही, की इतकी सारी प्रगती करून देखील या स्त्रियांच्या मनात असणारी शोषिततेची भावना काही जात नाहीच.

माझ्या लेखी रचना बदलली आहे; पण स्त्रियांच्या विकासाची मोजपट्टी ही पुरुषांच्या विकासाला प्रमाण मानून उभी राहत आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणजे स्त्रियांची प्रगती हा नात्यांमधला अडथळा ठरतो, असं चित्र तयार केलं जातं आहे. भारतीय समाजातील इतिहासकालीन आणि आधुनिक स्त्री कधी परस्परविरोधी गट म्हणून समोर आणले जातात आणि यामध्ये मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष होतं. त्यातून उपप्रश्नांवरतीच वाद होत राहतात.

आजही स्त्री-स्वातंत्र्य म्हणजे केवळ वेशभूषा, कालबाह्य परंपरांना नकार, संचारस्वातंत्र्य इतकेच मुद्दे सगळीकडे चर्चेला येतात. पण फक्त त्यांना नकार म्हणजे समस्यांमधून मुक्ती नव्हे. भारतीय स्त्रियांसंदर्भात ‘चूल आणि मूल’ ही चौकट मोडून तिने केलेली प्रगती सांगितली जाते. पण हे विधान आजही पूर्णतः लागू होत नाही, याचा पुरावा प्रत्येकाला स्वतःच्याच कुटुंबात मिळेल.

चौकटीतून मुक्त होऊ पहाणारी ती मुक्तीच्याच चौकटीत अडकली आहे. एका खूप वेगळ्या मुक्तीला मर्यादित विचारांमध्ये बद्ध केलं गेलं आणि आपण मात्र अजूनही भ्रमातच आहोत. स्वातंत्र्य दिलं, मिळवलं, मिळालं याहीपेक्षा तिला ते खरंच आत्मिक सुखाने उपभोगता येतं का?  आपल्याला वाटतं की खूप काही बदल झाला; पण तो बदल म्हणजे माहेरच्या लाटण्याऐवजी सासरचं लाटणं. याचा संदर्भ फक्त स्वयंपाकापुरता नाहीच मुळी. तिच्या जगण्याच्या अधिकाराचंच हस्तांतर होत राहतं. जागा बदलल्यावर स्वप्नं बदलायची. यालाच हसून स्वीकारत जगायचं... असंच सुरू आहे कैक वर्षे..

आपण बोलायला हवं आहे त्या वास्तवात न आलेल्या स्वप्नावर आणि तिच्या रोजच्या अस्तित्वावर, कपडे धुण्यावर, भांडी घासण्यावर, त्या चार दिवसांतील भावविश्वावर, जगाच्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्याची एकही संधी न देणाऱ्या व्यवस्थेवर. सर्वांच्या मनात बिंबवलेल्या सौदर्याच्याच कुरूप कल्पनांवर... तिचं काळं सावळं देखणेपण नाकारणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांवर... फक्त शरीरयष्टीवर बोलणाऱ्या मनोरंजन क्षेत्रातील गोष्टींवर...

आपण बोलायला हवं पुनरुत्पादन क्षमतेपेक्षाही तिच्या मनातल्या वात्सल्यावर, तिच्या अविश्रांत कामाला न मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यावर आणि त्याला न मिळणाऱ्या सामाजिक प्रतिष्ठेबद्दलही. स्त्रीने तिचा विचार एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून फार कमी वेळा केला आहे. तिच्या अबोलण्यामुळे ‘ती’ने तिच्याच आत असणाऱ्या ‘ती‘ला गमावू नये यासाठी तरी आपण बोलायला हवं...की ‘तू खरंच बोलत जा गं ....!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com