परिस्थितीचा स्वीकार करा (परिमळ)

नवनाथ रासकर
मंगळवार, 12 जुलै 2016

आपल्या वाट्याला जन्मतः आलेली परिस्थिती खुल्या मनाने स्वीकारली पाहिजे. परिस्थितीला घाबरून आपण हात-पाय गाळून बसलो, तर आपल्या वाट्याला दुःखाशिवाय काहीच येणार नाही. नॉर्मन पीलने म्हटले आहे, ‘‘आयुष्याने तुमच्या हाती लिंबू दिले, तर त्याचे सरबत करा.‘‘ लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षे काढली. तुरुंग ही शिक्षा न समजता तुरुंग हा एकांतवास आहे, असे समजून त्यांनी ‘गीतारहस्य‘ नावाचा अजोड असा ग्रंथ लिहिला.

आपल्या वाट्याला जन्मतः आलेली परिस्थिती खुल्या मनाने स्वीकारली पाहिजे. परिस्थितीला घाबरून आपण हात-पाय गाळून बसलो, तर आपल्या वाट्याला दुःखाशिवाय काहीच येणार नाही. नॉर्मन पीलने म्हटले आहे, ‘‘आयुष्याने तुमच्या हाती लिंबू दिले, तर त्याचे सरबत करा.‘‘ लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षे काढली. तुरुंग ही शिक्षा न समजता तुरुंग हा एकांतवास आहे, असे समजून त्यांनी ‘गीतारहस्य‘ नावाचा अजोड असा ग्रंथ लिहिला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानात तब्बल अकरा वर्षांची तुरुंगाची शिक्षा, शिक्षा न समजता समाजचिंतन आणि राष्ट्रचिंतनासाठी मिळालेली संधी समजून तिचा स्वीकार केला म्हणूनच तेथे त्यांची प्रतिभा फुलली. त्यांना बोटीने अंदमानाकडे नेत असताना ज्या ठिकाणी बसवले होते तेथे त्यांच्या खाली सॅनिटरी टॅंक होता. गोरे लोक त्यांना हसायचे. त्यावर तेही हसायचे तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी विचारले, ‘‘तुम्ही का हसता?‘‘ सावरकर म्हणाले, ‘‘मला टाकीवर बसवले म्हणून तुम्ही हसता; पण प्रत्येकाच्या शरीरात अशीच एक टाकी असते. याचे तुम्हाला अज्ञान असल्याने मला त्याचे हसू आले.‘‘ अधिकारी वरमले.

सावरकरांनी आहे त्या परिस्थितीला सामोरे जाऊन तिचा स्वीकार केला. उलट त्या परिस्थितीत सखोल ‘अर्थ‘ पाहिला. त्यांची ही भूमिकाच त्यांना तुरुंगातही मनोबल देणारी ठरली. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या धर्मपत्नीलाही हीच व्यापक दृष्टी दिली. मुंबईला डोंगरीच्या कारागृहात असताना त्यांना भेटायला त्यांच्या धर्मपत्नी गेल्या, तेव्हा त्यांना पाहून त्या रडू लागल्या. ऐन तारुण्यात दोन जन्मठेपांची शिक्षा म्हणजे कायमची ताटातूट होती, तेव्हा सावरकर जे म्हणाले ते थोडक्‍यात असे, ‘‘चार काटक्‍या गोळा करून खोपट उभे करणे आणि मुलांना जन्म देणे म्हणजे संसार असेल तर तो कावळे आणि चिमण्याही करतात, आपल्याला देशाचा संसार करायचा आहे.‘‘ माणसे मोठी होतात ती अशी, जी परिस्थिती आपल्या वाट्याला आली असेल तिला धीरोदात्तपणे सामोरे जातच मात करता येते. मग ती बाह्य परिस्थिती असो किंवा स्वतःचे एखादे व्यंग किंवा न्यून, त्यालाही हसत खेळत सकारात्मक दृष्टीने सामोरे जाता येते. कविवर्य केशवसुत लिहितात, ‘अमुचा प्याला दुःखाचा । डोळे मिटुनी घ्यायचा ।‘ हे दुःखाचे प्याले अपरिहार्यपणे घ्यावेच लागतात. ते टाळता येत नाहीत. गीतेत म्हटले आहे, ‘सुख दुःख समे कृत्वा‘ या वृत्तीने ज्ञानी माणसे सुख-दुःखाकडे पाहतात. सुखाने हुरळून जात नाहीत आणि दुःखाने उन्मळून जात नाहीत. हीच वृत्ती जीवन जगताना आपल्याला उपयोगी पडू शकते. त्यासाठी अध्यात्माची गरज असते असे नाही. आपला दृष्टिकोन फक्त वास्तव झाला पाहिजे. सुख-दुःख या दोन्ही गोष्टी मानवी जीवनातल्या अपरिहार्य अशा गोष्टी आहेत. हे एकदा स्वीकारले, की मग दुःखांचा डोंगर आपल्या जीवनावर कोसळला तरी त्याला आपण धैर्याने सामोरे जाऊ शकतो.

Web Title: Accept the situation (parimal)