कायद्यावरच क्रूर हल्ला (अग्रलेख)

-
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. मुलकी सरकार आणि लष्कराचे हे मोठे अपयश आहे. त्याच्या कारणांच्या मुळाशी जाण्याची पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांची तयारी आहे का? बलुचिस्तानातील हल्ल्याने तो प्रश्‍न पुन्हा प्रकर्षाने समोर आणला आहे. 

पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. मुलकी सरकार आणि लष्कराचे हे मोठे अपयश आहे. त्याच्या कारणांच्या मुळाशी जाण्याची पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांची तयारी आहे का? बलुचिस्तानातील हल्ल्याने तो प्रश्‍न पुन्हा प्रकर्षाने समोर आणला आहे. 

अफगाणिस्तानच्या सरहद्दीला लागून असलेल्या पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात दहशतवाद्यांनी सोमवारी मोठ्या प्रमाणात वकिलांना लक्ष्य केले आणि त्या आत्मघातकी हल्ल्यात अनेकांना हकनाक प्राण गमवावे लागले. पाकिस्तानात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरू आहे आणि त्यात सातत्याने निरपराध नागरिक बळी जात आहेत. परंतु, बलुचिस्तान हा प्रांत एरवीही धुमसत असतो. तिथे पाकिस्तानच्या शासनव्यवस्थेविरुद्ध असंतोष आहे. पाकिस्तान सरकारच्या सापत्न वागणुकीमुळे हा प्रांत गेली अनेक वर्षे स्वायत्ततेची मागणी करत आहे आणि त्यातूनच तेथे हिंसक कारवायाही सुरू असतात. या मुळातल्या अस्थिरतेत भर पडली आहे ती दहशतवादी संघटनांच्या धुमाकुळामुळे. शेजारच्याच अफगाणिस्तानातून येणारे ‘तालिबानी‘ दहशतवादी आणि आता इसिसचे दहशतवादी यांना आपले उपद्रवक्षेत्र विस्तारण्यासाठी हीलजमीन भुसभुशीत वाटली तर नवल नाही. हिंसाचार काबूत आणण्यात पाकिस्तान सरकार, लष्कर आणि ‘आयएसआय‘ला अजिबात यश आलेले नाही. परिस्थिती आटोक्‍यात येण्याऐवजी चिघळते आहे. सरकारला नव्हे, तर समाजातील एका घटकाला लक्ष्य करून झालेला ताजा हल्ला म्हणजे दहशतवादी संघटनांनी याच परिस्थितीचा फायदा उठविण्याचा केलेला प्रयत्न आहे. एका ज्येष्ठ वकिलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांना रुग्णालयात नेल्यानंतर तेथे जमलेल्या वकील समुदायावरही भीषण असा आत्मघातकी हल्ला झाला. 

या हल्ल्यानंतर काही तासांतच ‘जमात-उद-दवा‘ आणि ‘लष्करे तैयबा‘ या संघटनांनी हा हल्ला भारताने घडवून आणल्याचा हास्यास्पद आरोप केला आणि ‘लष्करे तैयबा‘चा म्होरक्‍या हाफिज सईद याची मजल तर ‘आपण या हल्ल्याचा बदला घेऊ!‘ अशी धमकी देण्यापर्यंत गेली. त्यानंतर बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनीही त्यांचीच री ओढणे हे अपेक्षितच होते; कारण गेले काही महिने बलुचिस्तानातील फुटीरतावाद्यांना भारताची साथ असल्याचा आरोप पाकिस्तान करत आलाच आहे. या आणि अशा प्रकारच्या आरोपांमध्ये कवडीइतके तथ्य नाही. 

स्वायत्ततेसाठीचे वा फुटून निघण्याचे जे आंदोलन बलुचिस्तानात सुरू आहे, त्याच्याशी या हिंसाचाराचा संबंध जोडण्याचा काही जण प्रयत्न करीत आहेत; परंतु अशी आंदोलने काही एक ठोस राजकीय उद्दिष्टासाठी चालविली जातात. केंद्रीय सत्तेला, तिच्या प्रतिनिधींना त्यात लक्ष्य केले जाते. परंतु, क्वेट्टा येथे ज्या क्रूरपणे रुग्णालयातील माणसे मारण्यात आली, समाजातीलच एका घटकाला लक्ष्य करण्यात आले, त्यामागे धर्मांध मूलतत्त्ववादी असण्याची शक्‍यताच जास्त आहे. कुठलेच आधुनिक कायदे आणि त्यावर आधारलेली व्यवस्था या धर्मांधांना मान्य नाही. त्यामुळे मानवी हक्‍कांची भाषा बोलणाऱ्या वकील समुदायाला त्यांनी लक्ष्य केले, यात काही आश्‍चर्य नाही. इसिस ही संघटना अफगाणिस्तान आणि लगतच्या पाकिस्तानाच हातपाय पसरविण्याच्या प्रयत्नात आहे. 

‘तालिबान‘ व ‘इसिस‘ यांच्या आहारी गेलेले दहशतवादी गट गेली काही वर्षे सातत्याने पाकिस्तानात वकिलांना लक्ष्य करत आले आहेत. 2007 मध्ये इस्लामाबादेत वकिलांच्या एका परिषदेत घडवून आणलेल्या बॉंबस्फोटात 16 वकील मृत्युमुखी पडले होते. अगदी अलीकडे बलुचिस्तानात एक जुलै रोजी तेथील विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची हत्या झाली. त्यानंतर एक ऑगस्ट रोजी हजारा समाजाच्या दोन नागरिकांना ठार करण्यात आले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी दिवसाढवळ्या मोटारसायकलवरून आलेल्या मारेकऱ्यांनी एका वकिलावर गोळ्या झाडून त्याचे प्राण घेतले. दहशतवाद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेत वकील सहभागी होतात, हे या हल्ल्यामागील कारण असू शकते. मात्र, बलुचिस्तानचे सरकार आणि इस्लामाबादेतील सरकार यांनी या प्रकारांची ना गंभीर दखल घेतली, ना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी अतिरेक्‍यांच्या कारवायांबाबत काही तपशील आणला. त्याचेच पर्यवसान सोमवारी बलुचिस्तान बार असोसिएशनचे अध्यक्ष बिलाल अन्वर कासी यांच्या निर्घृण हत्येमध्ये झाले. त्यांचे पार्थिव तातडीने क्‍वेट्टाच्या सरकारी रुग्णालयात आणले गेले आणि त्यापाठोपाठ अनेक ज्येष्ठ वकिलांनी तिकडे धाव घेतली. त्यानंतर काही वेळातच एका आत्मघातकी दहशतवाद्याने तेथे घडवून आणलेला स्फोट इतका भयानक होता, की त्यात संपूर्ण रुग्णालयच उद्‌ध्वस्त झाले आणि स्फोटातील जखमींना वैद्यकीय मदतही मिळू शकली नाही. 

वकील, डॉक्‍टर वा प्राध्यापक अशा बुद्धिवादी गटांचे सामूहिक शिरकाण हे संपूर्ण समाजाचे नीतिधैर्य खचवून टाकू शकते. पाकिस्तानातील उरलेसुरले नागरी जीवनही उद्‌ध्वस्त करायचे, हा दहशतवादी संघटनांचा हेतू दिसतो. त्यामुळेच त्यांनी बलुचिस्तानात हा मार्ग अवलंबिला आहे, हे उघड आहे. अर्थात, पाकिस्तानातील मुलकी सरकारचे आणि लष्कराचे दहशतवादाबद्दलचे दुटप्पी आणि सोईस्कर धोरण जोपर्यंत बदलत नाही, शासनयंत्रणेवर लष्करी नव्हे, तर मुलकी सरकारचे नियंत्रण प्रस्थापित होत नाही आणि ‘आयएसआय‘ ही पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा दहशतवाद्यांचे कोडकौतुक थांबवणार नाही तोपावेतो बलुचिस्तानच नव्हे, तर पाकिस्तान अतिरेक्‍यांच्या पकडीतून मुक्‍त होणे कठीण आहे. जसे पेराल, तसेच उगवेल, हा नियमच आहे. बलुचिस्तानातील हल्ल्याचा हाच धडा आहे.

Web Title: Act up brutal attack