प्रदूषणकारक ‘कण’कण!

वायूप्रदूषित झालेला मुंबईतील रस्ता
वायूप्रदूषित झालेला मुंबईतील रस्ता

हवेच्या प्रदूषणास व पर्यायाने मानवी आरोग्यास कारणीभूत असलेला एक घटक अनेकदा दुर्लक्षित राहतो. तो म्हणजे धूळ. हवेतील धूलिकणांचा फटका केवळ महानगरांनाच बसतो, असे नव्हे. ही ग्रामीण भागांचीही समस्या आहे. तिचा नेमका उगम समजून घेणे म्हणूनच आवश्‍यक ठरते.

मुंबई आणि शेजारील ठाणे, नवी मुंबई या महानगरांतील हवा अत्यंत वाईट झाल्याच्या बातम्या सध्या येत आहेत. वाईट म्हणजे श्वसनास अयोग्य अशी. अशा हवेचा अर्थातच थेट परिणाम मानवी आरोग्यावर होत असतो.

लोकांमध्ये विविध प्रकारचे, खासकरून श्वसनाशी संबंधित आजार तर वाढतातच; परंतु त्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होते, त्यांच्या आजारावर खर्च होतो, कुटुंबांवर ताण येतो, परिणामी सामाजिक अर्थआरोग्यही बाधित होते. तेव्हा प्रश्न असा निर्माण होतो, की ही हवा कशामुळे वाईट या श्रेणीत दाखल होते? त्याची विविध कारणे आहेत. कारखान्यांतून बाहेर पडणारे रासायनिक घातक घटक, वाहनांमुळे होणारे प्रदूषण ही त्याची महत्त्वाची कारणे. मात्र हवेच्या प्रदूषणास व पर्यायाने मानवी आरोग्यास कारणीभूत असलेला एक घटक अनेकदा दुर्लक्षित राहतो. तो म्हणजे धूळ. हवेतील धूलिकणांचा फटका केवळ महानगरांनाच बसतो, असे नव्हे. ही ग्रामीण भागांचीही समस्या आहे. तिचा नेमका उगम समजून घेणे म्हणूनच आवश्‍यक ठरते.  

आषाढात आणि श्रावणात पावसाच्या सरींवर सरी कोसळत असताना भूपृष्ठावरील मातीच्या स्तरांवर त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम होत असतात. एकीकडे त्या वेळी हवेमध्ये तरंगत असलेले सूक्ष्म कण बरसणाऱ्या पावसाच्या थेंबांच्या सोबत जमिनीवर येतात; तर त्याच वेळी आकाशातून प्रचंड वेगाने जमिनीवर येऊन आदळलेल्या पाण्याच्या थेंबांच्या आघाताने जमिनीवरील मातीच्या सपाटीवरील थरातील सूक्ष्म धूलिकण मोकळे होत असतात. नागरीकरण झालेल्या भागात असलेल्या रस्त्यांच्या, घरांच्या; तसेच इतर सर्व प्रकारच्या इमारतींच्या छपरांवर, कौलांवर साठून राहिलेले धुळीचे कणदेखील जर ते वजनाने हलके असतील तर अशाच प्रकारे पडत असलेल्या पावसाच्या थेंबांसोबत वाहायला लागतात आणि पावसाच्या पाण्याचा प्रवाह आणि वेग जिथे कमी होईल तिथपर्यंत वाहत जातात. 
पडलेल्या पावसाच्या पाण्याचा प्रवाह आणि वेग कमी झाल्यावर हे कणही स्थिरावतात. त्यांचा वेग कमी होतो, मंदावतो आणि त्या-त्या ठिकाणी हे ओले असलेले कण चिखलाच्या स्वरूपात साठून राहतात किंवा मातीसोबत पडून राहतात. हे वाहत आलेले कण ज्या वेळी स्थिरावतात, त्या वेळी तुलनात्मकरीत्या वजनाने जड असलेले कण म्हणजेच वाळूकणांसारखे जड कण मातीच्या खालच्या थरात; तर धूलिकणांसारखे वजनाने हलके असणारे कण मातीच्या वरच्या थरात स्थिरावतात. 

भारतात पडणारा मुख्य पाऊस हा नैॡत्य मोसमी वारे किंवा ज्याला आपण हल्लीच्या भाषेत मॉन्सूनचे वारे वाहण्याच्या कालावधीत पडत असतो. म्हणजेच आपला पाऊस हा सर्वसाधारणपणे जून ते ऑक्‍टोबर या कालावधीमध्ये पडत असतो. पृथ्वीच्या आसाला असलेल्या साडे-तेवीस अंशाच्या झुकावामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा कोणता भाग सूर्याच्या समक्ष येईल त्याअनुसार आपल्या पृथ्वीवर उन्हाळा आणि हिवाळा हे ऋतू घडत असतात. म्हणजेच आपल्याकडे उत्तर गोलार्धात साधारणपणे मार्च ते सप्टेंबर उन्हाळा आणि सप्टेंबर ते मार्च हिवाळा घडत असतो. 

त्याअर्थी उत्तर गोलार्धात वसलेल्या आणि विषुववृत्तापासून जवळ असलेल्या आपल्या देशात साधारणपणे अडीचपासून ते चार महिन्यांपर्यंत होणारा पडणारा पाउस हा प्रामुख्याने उन्हाळ्याच्या कालावधीदरम्यान पडणारा पाऊस आहे. त्यामुळे जेव्हा आपल्याकडील मोसमी वाऱ्यांचा कालावधी म्हणजेच पावसाळा संपत येत असतो, त्याच वेळी उर्वरित राहिलेला उन्हाळा आपली झलक दाखवितो आणि ज्याला ऑक्‍टोबर हिट (ऑक्‍टोबरमध्ये येणारा उष्णतेचा कालावधी) म्हणतो तो कालावधी सुरू होतो. 

त्या वेळी पावसामुळे ओल्या झालेल्या जमिनी पुन्हा एकदा कोरड्या व्हायला सुरुवात होते आणि त्याचा परिणाम म्हणून ओलाव्यामुळे एकमेकांना चिकटून राहिलेले मातीचे, धुळीचे कण मोकळे व्हायला लागतात. प्रामुख्याने रस्त्यासारख्या जास्त वर्दळीच्या ठिकाणी हे खूपच लवकर घडते आणि वाहनांच्या चाकांच्या घर्षणाने; तसेच वाहनांच्या वेगाने हे मोकळे झालेले धुळीचे कण हवेत उडू लागतात. वजनाने अत्यंत हलके असलेले हे कण हवेत तरंगू लागतात आणि सहजासहजी पुन्हा परत जमिनीवर खाली बसत नाहीत. त्याचसोबत पावसाळ्यात बहरलेल्या एकवर्षीय वनस्पती; उदाहरणार्थ गवत वगैरे फुलोऱ्यावर येऊन त्यातून निघणारे परागकण, पावसाळ्याच्याच साथीने जन्माला आलेल्या कवक आणि त्या प्रकारात मोडणाऱ्या वनस्पतींची परागरज असे अनेक सूक्ष्म कण हवेत तरंगायला लागलेले असतात. मॉन्सूनच्या वाऱ्याचा वेग मंदावायला लागलेला असल्याने हवेत तरंगणारे हे असंख्य प्रकारचे सूक्ष्मकण लक्षात घेता हवेची एकूणच शुद्धता कमी कमी होत जाते. त्यातच भर म्हणून शहरीकरण झालेल्या भागातील मानवनिर्मित सूक्ष्म कण; उदाहरणार्थ वाहनांच्या तसेच घराघरातील वापरल्या जाणाऱ्या इंधनाचे ज्वलन होऊन त्यातून बाहेर पडणारे वायू, औद्योगिक तसेच बांधकामाच्या ठिकाणी बाहेर पडणारे धूलिकण अशा सर्व प्रकारच्या धूलिकणांचा एकत्रित परिणाम आणि हवेचा मंदावलेला वेग आणि त्यासोबत ऑक्‍टोबर हिटच्या परिणामस्वरूप वाढत्या तापमानामुळे हवेत निर्माण होत असलेली अधिकची आर्द्रता या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन आपल्याकडील हवा या कालावधीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेली आढळते. 

त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम म्हणजे या कालावधीमध्ये खासकरून श्वासाचे, श्वसनमार्गाचे विकार अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेले आढळतात. सर्दी, खोकला, फ्लू, डोळ्यांचे विकार, विविध प्रकारचे ताप इत्यादी संसर्गजन्य प्रकारात मोडणाऱ्या आजारांचे प्रमाण खूप वाढलेले आढळून येते. 

या समस्येवर करावयाच्या उपाययोजना या सार्वजनिक आणि वैयक्तिक अशा दोन प्रकारात मोडतात. उदा. हवेत जाणाऱ्या धुळीचे प्रमाण रस्त्यांची झाडलोट करून किंवा रस्त्यावरील मोकळ्या किंवा उडू शकणाऱ्या धुळीचे नियंत्रण करून केले जाऊ शकते. तसेच हवेतून श्वासात किंवा डोळ्यात जाणाऱ्या सूक्ष्म कणांपासून आपले रक्षण करण्यासाठी मास्कसारख्या साधनांचा वापर केला जाऊ शकतो. हवेच्या अशुद्धीमुळे त्याचा होणारा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे माणसाच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये होणारी घट हे आहे. श्वासातून फुप्फुसांमध्ये गेलेल्या अशा सूक्ष्म कणांमुळे फुप्फुसांचे कार्य मंदावते व शरीराच्या प्राणवायू शोषून घेण्याच्या महत्त्वाच्या कार्यावर त्याचा अत्यंत गंभीर परिणाम होतो. झोपेची मात्रा कमी होते; तसेच चयापचय क्रियादेखील मंदावते. अशा वेळी माणूस वेगवेगळ्या आजारांना बळी पडू शकतो आणि हल्ली असे घडताना आपल्याला दिसून येत आहे.

त्यावर उपाय म्हणजे एकूणच हवेतील सूक्ष्म कणांचे प्रमाण कमी करण्याचे उपाय करण्यासाठीची उपाययोजना करणे आणि ती व्यवस्थितरीत्या राबविणे हाच असू शकतो. शहरांमध्ये मोठमोठी बांधकामे सुरू असतात. त्यातून सिमेंटचे कण हवेत जाणार नाहीत, याची काळजी बांधकाम व्यावसायिकांनी घेणे गरजेचे आहे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी वाहनांना पीयूसी प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. कारखानदारांनी पर्यावरणाचे नियम पाळले पाहिजेत. आपल्याकडे नियम आहेत; पण अंमलबजावणीचा अभाव प्रदूषणमुक्त वातावरणासाठी अडथळा ठरतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com