हॅकर्सचा उपद्रव

अजेय लेले
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

सध्या सोशल मीडियावर "किकी चॅलेंज'नेही धुमाकूळ घातलाय. गेल्याच महिन्यात कॅनडाचा संगीतकार-गायक ड्रेकने "इन माय फिलिंग' या गाण्याच्या माध्यमातून हे चॅलेंज इन्स्टाग्रामवर व्हायरल केले. चालत्या वाहनातून उतरत ड्रेकच्या गाण्यावर नृत्य करत हे चॅलेंज पूर्ण करावे लागते. मात्र, त्यासाठी अनेकजण जीव धोक्‍यात घालून चालत्या वाहनातून उड्या घेत आहेत.

सध्या सोशल मीडियावर "किकी चॅलेंज'नेही धुमाकूळ घातलाय. गेल्याच महिन्यात कॅनडाचा संगीतकार-गायक ड्रेकने "इन माय फिलिंग' या गाण्याच्या माध्यमातून हे चॅलेंज इन्स्टाग्रामवर व्हायरल केले. चालत्या वाहनातून उतरत ड्रेकच्या गाण्यावर नृत्य करत हे चॅलेंज पूर्ण करावे लागते. मात्र, त्यासाठी अनेकजण जीव धोक्‍यात घालून चालत्या वाहनातून उड्या घेत आहेत.

सायबर सुरक्षेच्या संदर्भात सर्व जगातच विचार सुरू आहे. त्यावर ठोस तोडगा सापडला आहे, असे नाही; पण तज्ज्ञांच्या प्रयत्नांना माध्यमांच्या विवेकी वापराची जोड असणे आवश्‍यक आहे. इंटरनेटच्या माध्यमातून एखादी संकल्पना लोकप्रिय होते आणि मग तिला आणखी बरीच वाक्‌वळणे मिळतात. "आव्हाने' (चॅलेंज) देणे हा एक असाच प्रकार किंवा संकल्पना. 2014 मध्ये "आइस बकेट चॅलेंज' हा प्रकार अस्तित्वात आला. यात सभोवतालचे तापमान लक्षात न घेता एखाद्या व्यक्तीच्या डोक्‍यावर बर्फ व पाण्याने भरलेली बादली ओतली जाते. या कृतीमागील प्रत्यक्ष हेतू मात्र उदात्त होता आणि आहे. जगभरात "मोटार न्यूरॉन डिसीज'बद्दल जागृती करून या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी निधी जमा करण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. सोशल मीडियाचेही या संकल्पनेच्या प्रसारात मोलाचे योगदान आहे. या संकल्पनेचे यश लक्षात घेऊन खेळाडू, राजकारणी, अभिनेत्यांपासून सर्वसामान्यांनीही वेगवेगळी चॅलेंजेस दिली. अर्थात, त्यामागे प्रसिद्धी आणि निधीची उभारणी हे दोन्ही उद्देश होते. आता आव्हान देण्याच्या या प्रकारालाही वेगवेगळी परिमाणे लाभली आहेत.

काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट. दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात "ट्राय'च्या प्रमुखांची वैयक्तिक माहिती इंटरनेटविश्‍वात उघड झाली. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर स्वतःचा आधार क्रमांक जाणीवपूर्वक जाहीर केला. केवळ आधार क्रमांकाच्या माहितीवरून आपले कुणीही नुकसान करू शकत नाही, हे दाखविण्याचा त्यांचा हेतू होता. मात्र, हा आत्मविश्‍वास फोल ठरला. हॅकर्सनी हे आव्हान यशस्वीपणे पेलत ट्राय प्रमुखांच्या बॅंक खात्याच्या माहितीसह इतरही वैयक्तिक तपशील जाहीर केला. आता, यानंतर हॅकिंगचा हा प्रकार खरा होता, की गुगल वापरून ही माहिती गोळा करण्यात आली, याबद्दल प्रत्येकजण आपापला वेगवेगळा दावा करत आहे. अर्थात, ट्राय प्रमुखांच्या बॅंक खात्यात जमा केलेला एक रुपया ही वस्तुस्थिती हॅकर्स कुठल्या थराला पोचले आहेत, हेच दाखवून देतो. केवळ गुगलच्या माध्यमातून त्यांची माहिती गोळा केली नसल्याचे निदर्शनास येते. हॅकिंग करणाऱ्यांमुळे निर्माण होणाऱ्या प्रश्‍नांकडे डोळेझाक केली जाऊ नये, हॅकर्सना सहजतेने घेऊ नये, हा या प्रसंगातून शिकण्यासारखा सर्वांत मोठा धडा.

अलीकडच्या काही वर्षांत संगणक आणि सोशल मीडियाच्या प्रसारामुळे हॅकिंगची कल्पना सर्वांना माहीत झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात कॉम्प्युटर हॅकिंग 1960 पासून अस्तित्वात आहे. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एमआयटी)मध्ये हॅकिंगचा पहिला प्रयत्न झाला. बेल लॅब्सने साठच्या दशकात विकसित केलेल्या "युनिक्‍स' या ऑपरेटिंग सिस्टिमलाही हॅकर्सनी लक्ष्य केले होते. हॅकिंगच्या सूत्रबद्ध आणि यशस्वी हल्ल्यामध्ये या हल्ल्याचा समावेश केला जातो. अर्थात, संगणकाची ऑपरेटिंग सिस्टिम विस्कळित करणारा हा एकमेव हल्ला नाही. त्यापुढील काळात हॅकिंगची मालिकाच उभी राहिलेली दिसते. या हल्ल्यांतून हॅकर्स काय करू शकतात, याची कल्पनाच जगाला आली. इराण आपल्या उसन्या अवसानाच्या जोरावर करू पाहणारे अणुधाडसही हॅकर्सनी "स्टक्‍सनेट' या कॉम्प्युटर मालवेअरमधून रोखले होते. आजच्या आधुनिक काळाचा विचार केला, तर सायबर सुरक्षा हा अवघ्या जगाच्याच काळजीचा विषय बनला आहे. आज तरी या जगव्यापी समस्येवरचा तोडगा दृष्टिपथात नाही. खरेतर, हॅकिंगचे हेतूनुसार दोन प्रकार पडतात. चांगल्या हेतूने हॅकिंग करणारे हॅकर्स "एथिकल हॅकर्स' म्हणून ओळखले जातात. हे हॅकर्स यंत्रणेतील त्रुटी हेरून त्या दुरुस्त करण्यास मदत करतात. यंत्रणेच्या आराखड्यातील त्रुटींच्या दुरुस्तीमुळे ती मजबूत, विकसित होते. वाईट हेतूने हॅकिंग करणारे मात्र उपद्रव देणारे, नुकसान करणारे असतात.

सध्या विशेषत: आर्थिक क्षेत्रात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेय. जगभरात दिवसभरात कुठेतरी बॅंकांमधील गैरव्यवहारही उघडकीस येत आहेत. खरंतर, विविध सायबर साधने वापरून सर्वच क्षेत्रांमध्ये गैरव्यवहार होताना दिसतात. रशियन नागरिकांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत केलेल्या गैरप्रकारांपासून इतर कुठलीही किंवा जवळपास प्रत्येक गोष्ट सायबर हल्ल्यांच्या टप्प्यात आली आहे. हा धोका लक्षात घेऊनच सायबर सुरक्षेसाठी विविध प्रकारचे उपाय योजले जात आहेत. "क्रिप्टोग्राफी' ही कूटलिपी भाषाही त्यापैकीच एक. सायबर सुरक्षेच्या व्यवस्थापनातील विविध उत्कृष्ट पर्यायांमध्ये क्रिप्टोग्राफीचा समावेश होतो. क्रिप्टोग्राफीमध्ये हॅकर्सकडून होणाऱ्या विविध सायबर हल्ल्यांपासून सुरक्षा करण्यासाठी एनक्रिप्शनच्या प्रक्रियेचा वापर केला आहे. एनक्रिप्नशमध्ये संदेश किंवा माहितीचे सांकेतिक भाषेत (एनकोडिंग) आदान-प्रदान होते. ही सांकेतिक भाषा अशा प्रकारची असते, की अनधिकृत व्यक्तींना या भाषेपर्यंत पोचता येऊ शकत नाही. विविध मेसेजिंग ऍप्सच्या आजच्या जगात प्रत्येक गोष्ट अशा प्रकारे एनक्रिप्ट करता येऊ शकते. दुसऱ्या बाजूला सायबर सुरक्षा हे एक प्रकारचे मिथक असून, शून्य आणि एक या बायनरी कोडच्या भाषेत अस्तित्वात येणारी प्रत्येक गोष्ट हॅक करण्यासारखी असते, असाही एक मतप्रवाह आहे. त्याचप्रमाणे, तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडलेले असाल तर हल्लेखोराला तुम्हाला लक्ष्य करणे आणखी सोपे होते, असेही मानले जाते. अन्यथा, ते अशक्‍यच.

या सर्व विवेचनाचे तात्पर्य एवढेच, की सायबर जगतात तुम्ही वैयक्तिकरीत्या शक्‍य तितके जागरूक राहायला हवे. आपले स्वातंत्र्य, खासगीपणाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी आपणही थोडी काळजी घेतली पाहिजे. एखाद्याने हॅकर्स समुदायाला उघड आव्हान दिलेच, तर उर्वरित यूजर्संनी कुणीतरी हे आव्हान स्वीकारेल, हे ओळखायला हवे. नव्हे तशी खात्रीच बाळगावी. खरंतर, अशा प्रकारे आव्हान देताना तुम्ही अनावश्‍यकरीत्या स्वतःला धोक्‍यात टाकता. आजच्या सोशल मीडियाच्या जगतात समोर आला आहे, तो आयडेंटिटी क्रायसिस. स्वतःच्याच ओळखीला पारखे होण्याच्या संकटातून आपण जात आहोत. एकविसाव्या शतकात "डाटा' ही सर्वांत मौल्यवान अशी गोष्ट असेल. जगभरातच लोक सायबरविश्‍वात प्रस्तुत आणि अप्रस्तुत अशा सर्वच प्रकारच्या "डाटा'ची निर्मिती करत आहेत. सोशल मीडियावर आपले यश, संपत्ती, विचार, दृष्टिकोन आदींबाबत उर्वरित जगाला सांगण्याची एक प्रकारची छुपी स्पर्धाच सुरू झालीय. समाजाने आपली दखल घ्यावी, यासाठीची धडपड फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर दिसून येते.
आज जगभरातील सर्वोत्तम मानवी मेंदू हॅकिंगच्या मोठ्या व्यवसायात गुंतलेले आहेत. जागतिक अँटिसॉफ्टवेअर उद्योग चांगल्या अवस्थेत आहेत. तसे होण्यास बुद्धिमान, पण वाईट हेतूने हॅकिंग करणारे कारणीभूत ठरले आहेत. आपल्यापैकी कोणत्याही सर्वसामान्य भारतीयांसाठी "आधार' क्रमांकाची कल्पना चांगलीच. प्रत्येक भारतीयाला काही प्रमाणात तरी स्वतःची विशिष्ट ओळख प्रदान करणारे "आधार' अनेक बाबतीत उपयुक्त आहे. तथापि, ते "हॅक' होऊ शकत नाही, असा याचा अर्थ नाही. त्याच वेळी, एखाद्याविषयी जाणून घेण्याचा "आधार' हा एकमेव डिजिटल पर्याय आहे, असे समजण्याचेही काहीच कारण नाही. सोशल मीडियातील विविध संकेतस्थळांवर काहीजण स्वत:च्या इच्छेनुसार आपल्या पाऊलखुणा सोडत असतो. खरे तर सायबर जगतात हॅकिंगची टांगती तलवार कायम असते. सोशल मीडियावर मुशाफिरी करतानाच अनावश्‍यकरीत्या स्वतःचे नुकसान होऊ न देण्याचे खरे आव्हान असते. आपण स्वतःच स्वतःच्या नुकसानास कारणीभूत होता कामा नये. आपण स्वत:हून हॅकर्सना आव्हान देत नाही, तोपर्यंत आपल्यापैकी बहुतेकांमध्ये हॅकर्सना कसलाही रस नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. सुरवातीला उल्लेख केलेले "आइस बकेट चॅलेंज' आणि हॅकर्सला आव्हान देणे या दोन गोष्टींमध्ये लक्षणीय फरक आहे.

Web Title: ajey lele write social media hackers article in editorial