बहुरूपी झंझावात निमाला

विजय नाईक
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

श्रीनिवास अय्यर रामस्वामी ऊर्फ चो रामस्वामी यांच्या निधनामुळे हजरजबाबी, निःस्पृह, गैरप्रकार करणाऱ्या राजकीय नेत्यांवर घणाघाती हल्ला करणारा, तीक्ष्ण लेखणीने घटनांची चिरफाड करणारा पत्रकार, नाटककार, कथाकार, व्यंग्यचित्रकार, अभिनेता, दिग्दर्शक व एक झुंजार व्यक्तिमत्त्व हरपले आहे. चो यांचे व्यक्तिमत्त्वच मोठे मजेशीर व विलक्षण. त्यांच्या चेहऱ्यावर सतत मिस्कील हास्य असे. बोलताना ते प्रतिस्पर्ध्याला केव्हा नामोहरम करतील, हे समजत नसे. डोक्‍याचा पूर्ण चकोट, कपाळावर भलेमोठे आडवे भस्म पाहिल्यावर हा कुणीतरी बाबा, बुवा असावा, असे वाटे. हसणाराही खळाळून हसे.

श्रीनिवास अय्यर रामस्वामी ऊर्फ चो रामस्वामी यांच्या निधनामुळे हजरजबाबी, निःस्पृह, गैरप्रकार करणाऱ्या राजकीय नेत्यांवर घणाघाती हल्ला करणारा, तीक्ष्ण लेखणीने घटनांची चिरफाड करणारा पत्रकार, नाटककार, कथाकार, व्यंग्यचित्रकार, अभिनेता, दिग्दर्शक व एक झुंजार व्यक्तिमत्त्व हरपले आहे. चो यांचे व्यक्तिमत्त्वच मोठे मजेशीर व विलक्षण. त्यांच्या चेहऱ्यावर सतत मिस्कील हास्य असे. बोलताना ते प्रतिस्पर्ध्याला केव्हा नामोहरम करतील, हे समजत नसे. डोक्‍याचा पूर्ण चकोट, कपाळावर भलेमोठे आडवे भस्म पाहिल्यावर हा कुणीतरी बाबा, बुवा असावा, असे वाटे. हसणाराही खळाळून हसे. दुसऱ्याची फिरकी घेतल्याचा त्यांना वाटणारा आनंदही निखळ.

चो रामस्वामींची पहिली भेट झाली ती प्रेस कौन्सिल ऑफ इंडियामध्ये. 1982 ते 1985 दरम्यान मी कौन्सिलचा सदस्य होतो. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अन्य सदस्यांत जॉर्ज फर्नांडिस, राम जेठमलानी, पिलू मोदी या दिग्गज संसद सदस्यांचा व "द स्टेट्‌समन"चे अध्यक्ष व मुख्य संपादक सी. आर. इराणी यांचा समावेश होता. कौन्सिलच्या चौकशी समितीच्या बैठकांत रामस्वामी व अन्य सदस्यांबरोबर भेटीगाठी, चर्चा होत असे, ती प्रामुख्याने वृत्तपत्रांविरुद्धच्या तक्रारींबाबत. बातम्या, लेख आदीतील टीका-टिप्पणीने दुखावलेले अनेक जण त्याविरुद्ध दाद मागण्यासाठी कौन्सिलकडे येत; परंतु कौन्सिलला एका मर्यादेपलीकडे कारवाईचे अधिकार नसल्याने अनेक जण नाराज होत.

"कौन्सिलकडे फौजदारी अधिकार असावेत, म्हणजे दोषी व्यक्तीला कैद करता येईल,'' अशी सूचना पुढे आली. त्यावर चो व पिलू मोदी संतापले. उसळून चो म्हणाले,"" कौन्सिलला असे अधिकार कदापि असता कामा नयेत. कौन्सिल हे काय पोलिस ठाणे आहे? या प्रकारचे अधिकार न्यायालयाला आहेत. कौन्सिलचा निकाल तक्रारदाराला मान्य नसेल, तर त्यांनी न्यायालयाकडे जावे. वृतपत्र स्वातंत्र्यावर गदा येणारे कोणतेही पाऊल कौन्सिलने उचलू नये.'' पिलू मोदी, जेठमलानी, फर्नांडिस, पत्रकार डॉ. एन. के. त्रिखा, एस. विश्‍वम व अन्य पत्रकार सदस्यही त्याच मताचे होते. तेव्हापासून, गेल्या तीस वर्षांत संपादकाला ताकीद देण्यापलीकडे कोणतेही टोकाचे पाऊल कौन्सिलने उचललेले नाही.

परिसंवाद, चर्चासत्रे यातूनही चो भेटायचे, दिलखुलास गप्पा मारायचे. नेत्यांच्या नकला करून हसवायचे. त्यांची काटेरी टीका इंदिरा गांधी, चंद्रशेखर, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहनसिंग, सोनिया गांधी, लालकृष्ण अडवानी, एम. जी. रामचंद्रन, जयललिता, रामकृष्ण हेगडे आदींना सहन करावी लागली. चो खिलाडू वृत्तीचे होते. म्हणूनच, स्वसंपादित "तुघलक' या नियतकालिकातून व्यंग्यचित्रासह प्रसिद्ध झालेल्या लेखातून ते काय म्हणताहेत, याकडे वाचक व नेत्यांचे लक्ष लागलेले असे.

चो अव्वल दर्जाचे बहुरूपी होते, असेच म्हणावे लागेल. अभिनय, विनोदप्रचुरता, भेदक विश्‍लेषणचातुर्य, पत्रकार, उत्तम संपादनकला, व्यंग्यशोधक चित्रकार, लेखक, स्तंभकार, भाष्यकार, प्रभावी वक्तृत्व या गुणांचा विलक्षण संगम त्यांच्या ठायी होता. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे निधन झाले. जयललिता चित्रपट क्षेत्रात असताना चो यांनी त्यांच्याबरोबर 19 चित्रपटांत काम केले. ""जयललिता यांचा मी आदर करतो. वाय. जी. पार्थसारथी यांच्या "अंडरसेक्रेटरी" या नाटकात मी त्यांच्याबरोबर काम केले. जयललिता यांच्या विरोधात मी अल्पकाळ होतो. 1998-2002 दरम्यान त्या जनतेच्या हितांविरुद्ध वागत होत्या व त्यांनी सत्तेचा गैरवापर केला, असे माझे मत होते; परंतु अभिनयाव्यतिरिक्त त्या प्रचंड वाचन करीत व उत्तम वक्‍त्या होत्या,'' असे चो यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. तब्बल 190 तमीळ चित्रपटांतून भूमिका करणाऱ्या चो यांनी पडद्यावर व पडद्याबाहेरही आपले व्यक्तिमत्त्व तळपत ठेवले. रंगमचालाही त्यांनी कधी सोडले नाही. त्यांच्या तमीळ कथा, त्यातील पात्रे बॉलिवूडने स्वीकारल्या. त्यावर आधारित चित्रपटही निघाले.
अफलातून गोष्ट म्हणजे, संजय गांधींचा विमान अपघातात मृत्यू झाल्यावर चो यांनी सक्‍सेना नामक एका व्यक्तीच्या नावे टपाल तिकीट जारी केले. त्याचा मृत्यूही विमान अपघातात झाल्याचा त्यांचा दावा होता. वस्तुतः प्रसिद्ध व्यक्तीचे निधनोत्तर टपाल तिकीट जारी करण्याचा टपाल खात्याचा शिरस्ता आहे; परंतु टपाल खात्याने कसलीही चौकशी न करता, चो यांच्या तिकिटावर शिक्कामोर्तब केले होते!

तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी चो यांना 1999 मध्ये राज्यसभेवर नियुक्त केले. 1999 ते 2005 दरम्यान सभागृहात त्यांनी केलेली भाषणे ऐकताना पिलू मोदी यांच्या विनोदप्रचूर; परंतु बोचऱ्या भाषणांची आठवण होई. त्यांच्या निधनाने भारतीय पत्रकारितेत निर्माण झालेली पोकळी भरून येणे अशक्‍य आहे.

Web Title: all rounder ramaswami