"अमेझॉन'चा खोडसाळपणा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

देशोदेशी, प्रांतोप्रांती अस्मितांची ठिकाणे, मानबिंदू, आदराची प्रतीके वेगवेगळी असतात. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात. त्याला धक्का पोचतो, तेव्हा अनर्थ ओढवून घेण्याचा प्रकार होतो. जगप्रसिद्ध ई-टेलर कंपनी "अमेझॉन'ने आपल्या कॅनडातील वेबसाइटवर भारताच्या राष्ट्रध्वजाशी बऱ्यापैकी साधर्म्य असलेल्या पायपुसण्याच्या (डोअरमॅट) विक्रीची जाहिरात केली.

देशोदेशी, प्रांतोप्रांती अस्मितांची ठिकाणे, मानबिंदू, आदराची प्रतीके वेगवेगळी असतात. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात. त्याला धक्का पोचतो, तेव्हा अनर्थ ओढवून घेण्याचा प्रकार होतो. जगप्रसिद्ध ई-टेलर कंपनी "अमेझॉन'ने आपल्या कॅनडातील वेबसाइटवर भारताच्या राष्ट्रध्वजाशी बऱ्यापैकी साधर्म्य असलेल्या पायपुसण्याच्या (डोअरमॅट) विक्रीची जाहिरात केली. या प्रकाराची परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गांभीर्याने दखल घेत "अमेझॉन'ने अशा उत्पादनाची विक्री तातडीने थांबवावी; अन्यथा त्यांच्या अधिकाऱ्यांना व्हिसा देणार नाही, तसेच ज्या अधिकाऱ्यांना व्हिसा दिला असेल तो मागे घेऊ, असा "ट्‌विटर'वरून सज्जड दम दिला. परिणामी, कंपनीने सपशेल माघार घेत या पायपुसण्यांची विक्री थांबविण्याचा निर्णय घेतला. 

"अमेझॉन'कडून घडलेले हे कृत्य गैर आणि निषेधार्हच आहे. यापूर्वीही हिंदू देवदेवता, आदराची प्रतीके यांचा अवमान होईल अशा प्रकारे चुकीच्या ठिकाणी त्यांचा वापर करण्याचे धाडस अमेरिका, युरोपातील कंपन्यांनी किंवा कलावंतांनी केले आहे. त्या त्या वेळी त्यावरून राळ उठल्यानंतर माघार घेतली गेली. विशेषतः पादत्राणे, महिलांची अंगवस्त्रे, जीन्स पॅंट, मद्याच्या बाटल्यांवरील लेबल यांवर अशा प्रतीकांचा किंवा देवदेवतांच्या चित्रांचा वापर करण्याचे अनुचित प्रकार घडले आहेत. भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने वेबसाइटवर प्रसिद्ध करण्याचे प्रकारही वरचेवर घडले आहेत. यातील प्रत्येक वेळी संबंधितांच्या कृत्याविरोधात आवाज उठविल्यावर माघार घेतली गेली. मुळात अशी उत्पादने बाजारात आणताना कोणत्याही कंपनीने आपण ग्राहकांच्या अस्मिता, धार्मिक भावना, आदराची स्थाने यांना धक्का तर लावत नाही ना, याचा आधी विचार केला पाहिजे.

जागतिक बाजारपेठेसाठी उत्पादन करणाऱ्या आणि विकणाऱ्या कंपन्यांनी ग्राहकांशी आपली बांधिलकी व्यक्त करताना त्यांच्याप्रती आदर राखलाच पाहिजे. भारतीय माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात आहे. त्यामुळे जगाला भारतीय अस्मितांची व आदरस्थानांची बऱ्यापैकी माहिती आहे. हे लक्षात घेता अशा घटना वरचेवर घडणे खोडसाळपणाचे वाटते. आपल्या सरकारने ध्वजसंहिता तयार केली आहे आणि नकाशाच्या वापराबाबत कायद्यात आवश्‍यक ते बदलही केले आहेत. अशा स्वरूपाची ठोस पावले उचलून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, हे पाहिले पाहिजे. 
 

 
 

Web Title: "amazon Mischief