भाष्य : मतांच्या लढाईत क्रयशक्ती केंद्रस्थानी

एकमेकांवर आरोपांची राळ उडवणे आणि प्रशासकीय कामकाजातील फटींवर बोट ठेवणे याद्वारे अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष बायडेन व माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्यात शह-काटशह रंगत आहेत.
joe biden and donald trump
joe biden and donald trumpsakal

- डॉ. अनंत लाभसेटवार

एकमेकांवर आरोपांची राळ उडवणे आणि प्रशासकीय कामकाजातील फटींवर बोट ठेवणे याद्वारे अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष बायडेन व माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्यात शह-काटशह रंगत आहेत. जनतेला महत्त्वाचे वाटणारे प्रश्‍न प्रामुख्याने आर्थिक आहेत.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या नोव्हेंबरमध्ये होणार असली तरी त्यांचं वारं २०२३ मध्येच वाहू लागलं. अमेरिकेत पक्षातर्फे नामांकन होऊन त्याचा पाठिंबा मिळवण्यासाठी दावेदारांना ‘प्रायमरिज’ नावाच्या अग्निदिव्यातून जावं लागतं. त्या म्हणजे निवडणुकीची तालीमच. ज्याला राज्यस्तरीय निवडणुकीत सर्वात जास्त ‘इलेक्ट्रोरल व्होटस्’ मिळतात त्याचा पक्षाचा उमेदवार म्हणून अभिषेक केला जातो.

तो प्रसंग सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी येत्या ऑगस्टमध्ये शिकागोमध्ये येईल. विरोधी रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन एक महिना अगोदर जुलैमध्ये मिलवॉकी, विसकॉन्सिन राज्यात होईल. त्यानंतर नोव्हेंबरपर्यंत हे दोघे देशभर चर्चासत्रात भाग घेऊन आपले धोरण व भूमिका जनतेसमोर मांडतील.

डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते व विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या प्रचलित पद्धतीला सुरूंग लावला. यावेळी प्रायमरीजला डच्चू देऊन त्यांचे शिकागोमध्ये बिनविरोध नामांकन करण्याचे ठरले आहे. रिपब्लिकन नॅशनल कमिटीने मात्र अमेरिकाभर चर्चासत्रे घेतली. सुरुवातीच्या डझनभर दावेदारांतले शेवटच्या चर्चासत्रासाठी फक्त चारच उरले. यात नवलाची गोष्ट म्हणजे या चार दावेदारातले दोन भारतीय वंशाचे होते.

एक पंजाबकन्या नम्रदा हिली (सासरचं नाव) आणि दुसरा ३८ वर्षीय अब्जाधीश विवेक रामस्वामी. सर्वेक्षणात ते दोघेही माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागे पडले. अमेरिकेतल्या भारतीयांनी या देशात केवळ आयटी किंवा वैद्यकीय शास्त्रातच नव्हे तर इतर क्षेत्रातही मुसंडी मारल्याचे यावरून सिद्ध होते. अनिवासी चिनी तसे करू शकले नाहीत, हे विशेष.

बायडेन आणि ट्रम्प या दोघांच्याही व्हाईट हाऊस पटकवण्याच्या मार्गावर बरेच काटे आहेत. बहुतांश सर्वेक्षणात ट्रम्प बायडेन यांच्या पुढे आहेत. अमेरिकेतल्या ५० राज्यांपैकी चार-पाच सोडली तर उर्वरित राज्ये निःसंदिग्धपणे डेमोक्रॅटिक किंवा रिपब्लिकन पक्षाच्या पारड्यात कौल टाकतात.

न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कॉनेक्टिकट, मॅसेच्युसेट ही पूर्व किनाऱ्यावरील, इलिनॉयझ हे मध्य भागातील आणि कॅलिफोर्निया, ऑरेगॉन, वॉशिंग्टन हे पश्चिम किनाऱ्यावरील राज्ये डेमोक्रॅटिक पक्षाला मतं देणारी. तिथे कदापिही रिपब्लिकनची डाळ शिजत नाही. उलट टेक्सास, फ्लोरिडा, ओहायो, उत्तर व दक्षिण कॅरोलिना आणि मध्य भागातील जवळजवळ सर्व राज्ये (नेब्रास्का, कॅन्सास, इंडियाना वगैरे) रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले समजतात.

पण विसकॉन्सिन, ॲरिझोना, मिशिगन, नेव्हाडा, आदी राज्ये तळ्यातही नाहीत की मळ्यातही नाहीत. ती कुंपणावर असून जो दावेदार आकृष्ट करेल त्याला मत देतात. तेच अमेरिकेचे अध्यक्ष ठरवतात. त्यामुळे तिथे कोण पुढे आहे, हे महत्त्वाचे ठरतं. प्रांतनिहाय अंदाज डाव्या व डेमोक्रॅटिक पक्षाचं मुखपत्र समजलं जाणाऱ्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’नं नोव्हेंबर २०२३ आणि मार्च २०२४ मध्ये प्रसिद्ध केला. त्यात जे सापडले ते व्हाईट हाऊसला घाम फोडणारे होते. या सर्व संदिग्ध राज्यांत ट्रम्प दोन ते दहा अंशांनी बायडेन यांच्यापुढे होते. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या सर्वेक्षणातही ट्रम्प पाच ते सात अंशांनी बायडेन यांच्यापुढे आढळले.

घुसखोरी वाढली

यावेळी अध्यक्षांच्या कर्तबगारीवर मतदार मतं देतील. आश्वासनांपेक्षा कर्तृत्व महत्त्वाचे असल्यामुळे बायडेन उणे ठरतात. त्यांची लोकप्रियता मोदींपेक्षा निम्मी आहे आणि ७०टक्के लोक देश चुकीच्या मार्गाने जात आहेत, असे मत व्यक्त करतात. बायडेननी पर्यावरण रक्षणार्थ खनिज तेलावर निर्बंध लादून पेट्रोल व ऊर्जेचे भाव वाढवले. जगभर भाववाढीची लाट पसरली, अर्थवाढ खुंटली. त्यांच्या तीन वर्षांच्या सत्ताकाळात अमेरिकेची वाढ भाववाढीपेक्षा कमी होती. त्यामुळे डॉलर कमकुवत झाला, लोकांची क्रयशक्ती घटली. वीजदर २५% व पेट्रोलचे भाव ३७ टक्क्यांनी वाढले.

ट्रम्प यांच्या चार वर्षांतली भाववाढ लक्षात घेता सरासरी उत्पन्न सहा हजार डॉलरने वाढले, तर बायडेनच्या तीन वर्षात ते आठ हजार डॉलरने घटले. पोट भरण्यासाठी ६१% कुटुंबांना एक तारखेची वाट बघावी लागते. म्हणजे कुठल्याही आपत्तीला तोंड देण्याएवढीही शिल्लक त्यांच्याकडे नाही. यामुळे जनता नैराश्यग्रस्त असून, त्याचं खापर बायडेन यांच्या धोरणांवर फुटते. बायडेन यांच्या धोरणामुळे अमेरिकेत अवैध स्थलांतरितांचा मोठा प्रश्न आहे.

गेल्या तीन वर्षांत दीडशेपेक्षा अधिक देशांतून ऐंशी लाखांवर नागरिकांनी उघड व ज्ञात घुसखोरी केली. याशिवाय सुमारे पंधरा लाख लोक सुरक्षा व्यवस्थेला गुंगारा देऊन अमेरिकेत घुसल्याचा अंदाज आहे. त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची, आरोग्यसेवेची आणि लहान मुलांना शिकवण्याची जबाबदारी नगरपालिकांची. म्हणून न्यूयॉर्क, शिकागो, डेनवरसारख्या मोठ्या शहरांचे महापौर बायडेन यांच्या धोरणांवर आगपाखड करतात. अमेरिका अवैध स्थलांतरितांवर दरवर्षी ३५० अब्ज डॉलर खर्च करे. आता तो खर्च ६५० अब्ज डॉलरवर गेला आहे.

अलीकडे बायडेनना भ्रष्टाचाराच्या आरोपाला तोंड द्यावे लागत आहे. प्रतिनिधिगृहाच्या रिपब्लिकन पक्षाच्या चौकशी समितीने बायडेन यांनी उपाध्यक्षाचं पद विकून कोट्यवधीची लाच रशिया, चीन, युक्रेन, कझाकिस्तान व रूमानिया इत्यादी देशांकडून उकळली, हे पुराव्यानिशी उघडकीस आणले आहे. त्यांच्या व्यवहारांचे चेक समितीच्या हाती असून, त्यांना आता महाभियोगाला सामोरे जावे लागत आहे.

ट्रम्प यांच्याविरुद्ध कायद्याचे फास आवळल्याने समितीच्या कर्तृत्वाला जोर व जोम आला आहे. बहुतेक पैसे पुत्र हंटर बायडेननी प्रभावाद्वारे कमावले असले तरी वडील बायडेन हेही दोषी ठरतात. अमेरिकेच्या राज्यघटनेत प्रत्यक्ष अध्यक्ष किंवा त्याच्या नातेवाईकानं केलेला भ्रष्टाचार महाभियोगपात्र ठरतो, असे स्पष्ट नमूद आहे.

कुठल्याही निकषांनी तोललं तरी ट्रम्प यांची कारकीर्द चांगली होती, असे अमेरिकी लोक सर्वेक्षणात म्हणतात. सरहद्द बंद असून अवैधांचा व अंमली पदार्थांचा उपद्रव कमी होता. भाववाढ दोन टक्क्यांपेक्षा कमी व वाढदर त्यापेक्षा जास्त अधिकांशाने राहिला. अमेरिकाभर कायदा व सुव्यवस्था नांदत होती.

महत्त्वाचे म्हणजे, अमेरिका कुठल्याच युद्धात गुंतलेली नव्हती. ट्रम्पनी जागतिक शांतता स्थापन केली. अफगाणिस्तान युद्धाची ज्योत मालवत होती. तुलनेने शांततेचा उदो उदो करणाऱ्या बायडेनच्या माथी दोन युद्धांचे (युक्रेन व इस्राईल) अपश्रेय आहे. त्यामुळे ट्रम्पनी निर्माण केलेली शांतता आणि बायडेननी दाखवलेले दौर्बल्य यातला फरक जनतेच्या नजरेतून सुटलेला नाही.

बायडेन सरकारने माजी अध्यक्षांच्या प्रासादावर छापा घालून इतिहास घडवला. ट्रम्प यांच्याविरुद्ध चार दावे, ९१ आरोप आणि ७५० वर्षांपेक्षा जास्त शिक्षा ठोठावणारं फौजदारी दावे ठोकले. त्याचा निकाल लागेपर्यंत निवडणुका संपतील. ‘‘हे दावे राजकीय सूडबुद्धीतून दाखल केल्यामुळे मला त्यांचं मुळीच भय वाटत नाही,’’ असं ट्रम्प यांनी प्रचारसभेत ठासून सांगितले होते.

ज्या साडेसात कोटी उजव्या विचारांच्या मतदारांनी पाठिंबा दिला त्यांच्या मूल्यांवर हा वार आहे, असे ते सांगतात. परिणामी त्यांची लोकप्रियता वाढलीच; शिवाय देणग्यांतही भर पडली. त्यांच्या प्रचारसभांची गर्दी तुफान वाढली. कोर्टबाजीच्या सापळ्यात ट्रम्प दोषी सापडताच त्यांचे चाहते त्यांना सोडून जातील, या एकमेव आशेवर बायडेन यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

(लेखक अमेरिकेतील ‘फर्स्ट नॅशनल बँकेचे’ माजी चेअरमन ऑफ बोर्ड आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com