तू जपून टाक पाऊल जरा... (अग्रलेख)

Evolution
Evolution

निसर्गाचे चक्र आपल्या गतीने गरगरत असते. मानवाने आपल्या बुद्धिमत्तेचे वंगण घालून त्यास अधिक वेगाने फिरवले, की त्यातून घडते ती विज्ञान-तंत्रज्ञानाधिष्ठित प्रगती. त्यालाच ढोबळमानाने उत्क्रांती वगैरे म्हणायचे. परंतु, निसर्गचक्राच्या अंगभूत लयीत ढवळाढवळ करण्याचा ‘प्रगत’ मानवाचा अट्टहास योग्य नव्हे, हे अनेकविध घटनांतून समोर आलेले सत्य आहे. बुद्धिमत्तांची देवाणघेवाण, त्यांचे एकमेकांत मिसळणे हा उत्क्रांतीचा अविभाज्य भाग असला, तरी चुकीच्या पद्धतीने निसर्गचक्रात हस्तक्षेप करण्याचा हट्ट अखेर जिवावरच्या संघर्षात रूपांतरित होतो, याचे प्रत्यंतर नुकतेच अंदमान-निकोबार बेटांच्या समूहात घडलेल्या एका हत्येच्या निमित्ताने आले. यातील काही बेटांवर भारताचे केंद्रशासित राज्य आहे. यातील काही बेटांवर मानवी वस्तीच नाही, तर काहींच्या कुशीत आदिम टोळ्यांचा रहिवास आहे. या असंख्य बेटांच्या समूहामधले उत्तरेला आहे सेंटिनल बेट. इथल्या जेमतेम साठ चौरस किमी भूभागावर सेंटिनलीज ही आदिम जमात राहाते. या उग्र, आदिम जमातीला आपली लोकशाही, विकास, धर्म, जाती, परंपरा, पोशाख असले काहीही नको आहे. गेली तब्बल साठ हजार वर्षे ही जमात आदिम स्वरूपातच जगत असावी, असा मानववंशशास्त्रज्ञांचा कयास आहे. सुमारे ५० ते १५० इतकीच त्यांची संख्या असावी, असे २०११ची जनगणना अंदाजानेच सांगते. कालौघात नष्ट होत चाललेली ही जमात निसर्गाच्याच स्वाधीन ठेवावी, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा अट्टहास न धरता त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्यावे, अशा विचाराने भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने सेंटिनलांचे उरलेसुरले स्वातंत्र्य अबाधित राखले आहे.-निदान आजवर तरी! अशा या काहीशा कुप्रसिद्ध बेटावर जॉन ॲलन चाऊ नामक २७ वर्षांचा तरुण अमेरिकन पर्यटक हट्टाने पोचला, त्याची सेंटिनलांनी हत्या केली. या हत्येने पुन्हा एकवार आदिम जमातीच्या टोळ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

सेंटिनल बेटाच्या बाजूस फिरकण्यास मज्जाव असताना हा पर्यटक तेथे गेलाच कसा? आणि का? असे अनेक प्रश्‍न सध्या उपस्थित झाले आहेत. अलाबामाहून आलेला हा पर्यटक ख्रिस्ती धर्मोपदेशक होता, असे सांगितले जाते. सेंटिनल बेटावर पोचण्यासाठी त्याने स्थानिक मच्छिमारांची मदत घेतली आणि सरकारी व्यवस्थेचा डोळा चुकवून त्याने त्या निषिद्ध बेटावर पाऊल ठेवले, असाही दावा केला जातो. अंदमान-निकोबार द्वीपसमूहात आजही काही रानटी टोळ्या आढळतात. त्यातील बहुतेक जमाती आता विकासाच्या मुख्य प्रवाहात बिचकत का होईना सहभागी होत आहेत. जारवा ही तिथली एक जमात एव्हाना बऱ्यापैकी ‘माणसाळलेली’ आहे. म्हणजेच पर्यटकांनी दिलेले गॉगल, टी-शर्ट, खाद्यपदार्थ अशा वस्तू ते आनंदाने स्वीकारतात. सेंटिनल बेटावरील जमात मात्र अपवाद आहे. किंबहुना, जगातील सर्वाधिक रानटी असा शिक्‍का त्यांच्यावर आहे. त्यांची जनगणनाही हेलिकॉप्टरने हवाई पाहणी करून मगच नोंदली गेली. २००४मधील भयंकर त्सुनामीच्या काळात या बेटावरील हानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या नौदलाच्या हेलिकॉप्टरवर त्यांनी विषारी बाण मारले होते. तथापि, ही जमात हिंस्त्र आणि नरभक्षक असल्याच्या मात्र निव्वळ अफवा आहेत, असा निर्वाळा भारतीय पुरामानवशास्त्र विभागाचे निवृत्त संचालक त्रिलोकनाथ पंडित यांनी दिला आहे. अर्थात, तेथे जाताना सावध राहावे लागते, हेही पंडित यांनी नमूद केले आहे. अमेरिकन पर्यटकाने योग्य ती सावधगिरी बाळगून वेळीच काढता पाय घेतला असता, तर त्याचा जीव गेला नसता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. विकासाचा स्पर्शही न झालेल्या काही मानवी जमाती जगाच्या पाठीवर अजूनही टिकाव धरून आहेत. ब्राझीलच्या पेंटानल या दलदलीच्या भागात पेरू, पराग्वे, कोलंबिया अशा देशांत अशा काही जमाती आढळतात. तथापि, त्यांच्या अस्तित्वाला धक्‍का लावू नये, अशीच आंतरराष्ट्रीय मानसिकता आहे. सेंटिनलांपर्यंत आजवर भारतीय दंड संविधान पोहोचलेलेच नाही, हे एका अर्थाने बरेच आहे, असे म्हणायचे. कारण ज्या दिवशी ते तिथे पोहोचेल, त्या दिवशी निसर्गचक्राच्या गतीला आणखी एक झटका मिळेल. त्याला प्रगती म्हणायचे की अधोगती, हे येणारा काळच ठरवेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com