प्रगतीचा ‘पॅशन’मार्ग!

अनघा सदावर्ते
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

तुमची आवड, जिद्द किंवा ‘पॅशन’ तुमचा शोध घेत आहे, असं जर मी तुम्हाला म्हटलं तर कदाचित तुम्हाला पटणार नाही. पण हे खरं असतं.

#यूथटॉक  
तुमची आवड, जिद्द किंवा ‘पॅशन’ तुमचा शोध घेत आहे, असं जर मी तुम्हाला म्हटलं तर कदाचित तुम्हाला पटणार नाही. पण हे खरं असतं. आपली करिअर आपल्या आतच सुप्तावस्थेत असते. तिला जागृत करावं लागतं एवढंच. मी माझं उदाहरण देते. बारावी परीक्षा झाल्यानंतर नेमकं काय करावं, असा प्रश्न मला नेहमीच पडत होता. माझ्या पुढं काही पर्याय होते. अखेरीस मी इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंग विषय निवडून डिप्लोमा मिळवण्यासाठी एका सरकारी कॉलेजात प्रवेश मिळवला. अर्थात घरचे सगळेच खूष झाले. माझा इंजिनिअरिंगचा प्रयास आणि प्रवास मजेत होता. पण मनात प्रश्नांचं काहूर माजायला लागलं- हे काम एक कायमचे करिअर म्हणून मला करायला आवडेल का? चार भिंतीच्या आड मी जी तांत्रिक डिझाइन्स बनवीन ती माझी मलाच आवडतील का? ग्राहक त्याचा स्वीकार करून उपयोग करतील का?  माझं काम माझ्यासमोर राहील का? वगैरे. आपलं काम, कला आणि कौशल्य ग्राहकाला मनपसंत व्हावं, असं मला प्रकर्षानं वाटू लागलं. डिप्लोमा मिळवल्यानंतर माझी खरी आवड काय आहे, त्याचा शोध मला सुदैवाने लागला. नवीन करिअरचं माझा शोध घेत होती म्हणा ना! माझ्या हातून रचनात्मक काही तरी घडावं, ही माझी इच्छा होती. माझ्या प्रवासाची दिशा बदलली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

माझ्या आवडीने आणि जिद्दीने मला वास्तुविशारद (आर्किटेक्‍ट) होण्याच्या मार्गावरून वाटचाल करायला लावली. ही वाटचाल सुलभ होती. नोकरी करता करता अनुभव घ्यायचा आणि मग स्वतंत्र व्यावसायिक व्हायचं मी ठरवलं. माझा प्लॅन आकार घेऊ लागला. वास्तुविशारद विषयाकडे छंद किंवा ‘पॅशन’ म्हणून मी पाहू लागले. यातूनच मला माझी ओळख मिळाली. माझी आवड जपली गेली, त्यातून मला ऊर्जा मिळाली. साहाजिकच प्रगतीचा मार्ग खुला होत गेला. हिला हे कसं जमतंय, असं नातेवाईक मंडळींना वाटलं. आज असं वाटतंय की केवळ छंद जपण्याची जिद्द होती आणि आहे, म्हणून माझी वाटचाल समाधानकारक होत आहे. ‘डू व्हॉट यू लव्ह, अँड लव्ह व्हॉट यू डू’ अशा अर्थाचा स्टीव्ह जॉब्ज यांचा एक सुविचार खरा असल्याची प्रचिती आली.

शाळा-कॉलेजच्या दिवसात आपण काय करायला पाहिजे, त्याबाबतीत आपण अनभिज्ञ असतो. कदाचित विचारच करत नाही. भावी काळातील आपले खरे करिअर आपल्यातच असते; पण छुप्या स्वरूपात. आपली आवड, छंद, कला, ‘पॅशन’ आपल्यात उपजत असल्यामुळे ती आपल्या लक्षात येतेच असं नाही. ‘तुझे आहे तुजपाशी, परी जागा चुकलाशी ...’ अशी अवस्था. या बाबतीत कबीरांचा एक दोहा आठवतो- ‘जैसेतील में तेल हो, ज्यूं चकमक (गारगोटी) में आग, तेरा साई तुझं में है, तू जाग साके तो जाग!’ सुदैवाने आपले जवळचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक आपल्यातले सुप्त गुण ओळखतात. ते बोलून दाखवतात, असं माझ्या लक्षात आलं. त्यातच आपण पुढे काहीतरी भरीव करावं, असं वाटू लागतं. प्रत्येकालाच आजूबाजूची प्रलोभने खुणावत असतात. यामुळे कुणाचही मन गोंधळून जाणे साहजिक आहे. पण आपली खरी आवड ओळखायला पाहिजे. त्यासाठी अंधानुकरण करणं सोडलं पाहिजे. कुणी डॉक्‍टर, इंजिनिअर तर कुणी सीए  होतो. कुणी डिजिटल मार्केटिंग करून किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत काम करून लठ्ठ पगार मिळवतो. अशी काही उदाहरणे आपण पाहतो. आपणही असंच काहीतरी चाकोरीबद्ध करावं, असं बहुतेकांना वाटतं. याला जाणकार लोक ‘कळप मानसिकता’ म्हणतात. त्याचा अनुनय करताना आपण आपला आतला आवाज काय सांगतो, तिकडे दुर्लक्ष करतो. खरं तर प्रलोभनाकडे पाठ फिरवून आपल्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या करिअरकडे वळायला पाहिजे. परीक्षांमध्ये कुणाला मार्क कमी पडतात म्हणून अनेक जण निराश होताना दिसतात. मला वाटतं, की ‘मार्कवादी’ होण्यापेक्षा आपण ‘गुणवादी’ व्हायला हवंय. आपल्यातील कौशल्य ओळखायला शिकलं पाहिजे. प्रत्येक व्यक्ती विशिष्ट कामात वाकबगार असते. टाकाऊ कोणी नसते. प्रयत्न केला तर आवडीचं क्षेत्र सापडतं. तेच त्याचे करिअर.               

एखाद्या गोष्टीबद्दलची तीव्र आवड आणि ओढ म्हणजे पॅशन. आर्किटेक्‍चर हा विषय माझ्यात सुप्तपणे संचारलेला होता. तो मला लवकरच गवसला. अर्थातच ती माझ्या करिअरमधील सुखद किल्ली होती. तुम्हालाही अशी किल्ली नक्कीच सापडेल. शोधा म्हणजे सापडेल म्हणतात तसं!

(लेखिका पुण्यातील आर्किटेक्ट आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anagha Sadavarte article