फुगावादन

आनंद अंतरकर
सोमवार, 16 जानेवारी 2017

पुण्यातल्या नारायण पेठेतल्या आमच्या आळीत अनेक प्रकारचे फेरीवाले आणि विक्रेते यायचे. विशिष्ट वेळेला विशिष्ट माणूस येणार म्हणजे येणार. त्या प्रत्येकाची ललकारी देण्याची खास शैली. ‘लाडाच्या... मोडाचीऽऽऽ’ असा सानुनासिक हाकारा देत ढकलगाडीवरून भिजवलेली कडधान्यं विकणारा एक मरकाड्या विक्रेता येई. शाळेच्या ‘तासा’वर आघात केल्यावर त्याचा कंप निनादत हळूहळू विरून जावा, तशी त्याच्या गुंजणाऱ्या आवाजाची जात होती.

पुण्यातल्या नारायण पेठेतल्या आमच्या आळीत अनेक प्रकारचे फेरीवाले आणि विक्रेते यायचे. विशिष्ट वेळेला विशिष्ट माणूस येणार म्हणजे येणार. त्या प्रत्येकाची ललकारी देण्याची खास शैली. ‘लाडाच्या... मोडाचीऽऽऽ’ असा सानुनासिक हाकारा देत ढकलगाडीवरून भिजवलेली कडधान्यं विकणारा एक मरकाड्या विक्रेता येई. शाळेच्या ‘तासा’वर आघात केल्यावर त्याचा कंप निनादत हळूहळू विरून जावा, तशी त्याच्या गुंजणाऱ्या आवाजाची जात होती.

खाऽऽरं वाटानं... आलं खाऽऽरं वाटानं’ असं ओरडत एक ग्रामीण ढंगाची नि ढगळ कपड्यांतली स्थूल व्यक्ती भाजलेले हिरवे वाटाणे घेऊन यायची. डोक्‍यावरचं वाटाण्याचं घमेलं डोक्‍यावरून उतरवून तो रस्त्याच्या कडेला फतकल मारून बसला, की लहान मुलांचं कोंडाळं त्याच्याभोवती जमत असे.

मग तो तोंडानं अखंडितपणे पुटपुटत राहायचा, ‘‘वाटानं वाटानं खायाचं... खायाचं... दादा मला शाळेत जायाचं...’’ मुलांमध्ये तो छान रमून जायचा. आपल्या चढ-उतार आवाजाच्या तो खूप गमतीजमती करायचा. त्याचं ते मुलांमध्ये विरघळून जाणारं रूप खरोखरच लोभस दिसायचं.

आणखी एक तरुण फुगेवाला असाच मुलांमध्ये विलक्षण रमून जायचा. साधारण दुधी भोपळ्याच्या आकाराचा फुगा वाजवत त्याची ‘एंट्री’ व्हायची. त्याच्या हातांत विलक्षण कला होती फुगावादनाची. फुग्यावर ताल धरणारा फुगेवाला मी प्रथमच पाहात होतो. लांबवरून येताना त्याच्या फुग्याचा ‘चर्र चटक्‌... किर्र फटक्‌’ असा चरचरणारा आवाज कानी पडे. मग हळूहळू चालत आळीच्या मध्यावर आला, की त्याचे हात भारल्यासारखे व्हायचे आणि ओल्या कपड्याचा पिळा पिळल्यासारखा तो दोन्ही हात चालवत त्या फुग्यातून ध्वनी काढू लागे. एखादं तालवाद्य वाजवावं तशा गतीनं एका लयीत त्याचं हे फुगावादन चाले. जन्मतःच त्या फुगेवाल्याचा एक डोळा बंद होता. विशिष्ट ठिकाणी तो येऊन थांबला, की पोराटोरांचा त्याच्याभोवती गराडा पडे. त्यातली काही बालकं तर उत्स्फूर्तपणे आनंदानं नर्तन करू लागत. या बालकांत चिमुरडा पांडू अग्रभागी असे. त्याचा एक पाय तळाशी तिरपा झालेला होता, त्यामुळे तो लंगडत चाले; पण त्याचं नाचणं फार गोड असे.

त्या दिवशी मी असाच इतिहासात पास झाल्याच्या आनंदात दिंडी दरवाजात बसून होतो. तोंडात उसाचा करवा चघळत असल्यासारखं ओ. पी. नय्यरचं ‘ये लो मैं हारी पिया’ हे गाणं घोळत होतं. कानांत गीता दत्तचा मदभरा स्वर आणि नजरेसमोर मदालसा शामा’. फुगेवाला ताल धरत आला, तो अगदी नजीक आला आणि माझ्या एकदम लक्षात आलं, की आजचा त्याचा ताल माझ्या मनातल्या गाण्याशी पूर्णपणे जुळून येतोय. काय मस्त योगायोग! आता ओपी, गीता आणि शामा त्या फुग्यातून एकाच वेळी नजरेसमोर व्यक्त होऊ लागले. योग असे विनामुहूर्त माणसाच्या जीवनात साधून आले, की किती नवलाई होऊन जाते! त्या दिवशी आमच्या आळीतला एकाक्ष फुगेवाला आणि पांडू नावाचा पंगुचरण ‘मायकेल जॅक्‍सन’ यांचा द्वयावतारी खेळही चांगलाच रंगला. अशी निरागस झिंग आणणारे क्षण आयुष्यात वारंवार थोडेच लाभत असतात?

Web Title: anand antarkar articles