प्राधान्य पक्षाला की परिवाराला?

अनंत बागाईतकर
सोमवार, 8 मे 2017

राहुल गांधी अध्यक्ष होणार की नाही, हा प्रश्‍न त्यांच्या राजकारण प्रवेशापासूनच सुरू झालेला होता आणि अद्याप त्याचे खात्रीशीर उत्तर मिळालेले नाही. सोनिया गांधी यांनी त्यांना अध्यक्ष करण्यासाठी सर्व तयारी केलेली असूनही अद्याप त्याला मुहूर्त मिळत नाही. बहुधा संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताना हा मुहूर्त मिळेल.

सर्वसाधारणपणे पक्षात संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया चालू असताना नव्याने नेमणुका केल्या जात नाहीत. केवळ राजकीय पक्षातच नव्हे, तर कुठल्याही संस्थेत निवडणुकांच्या प्रक्रियेदरम्यान नव्या नेमणुका करण्याची प्रथा-पद्धत अवलंबिली जात नाही. काँग्रेसचे वर्तमान नेतृत्व याला अपवाद आहे, असेच म्हणावे लागेल. कारण निवडणुकांची प्रक्रिया चालू असतानाच भराभर नव्या नेमणुका होऊ लागल्या आहेत. त्यामुळे पक्षात गोंधळाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांत म्हणजे पंधरा दिवसांच्या कालावधीत सतरा नव्या नेमणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या अधिकृत नेमणुका असल्याने त्या काँग्रेस अध्यक्षांच्या सही शिक्‍क्‍यानेच झाल्या आहेत. याचा अर्थ काय? अनेकांनी अनेक अर्थ लावायला सुरवात केली. त्यातला सर्वांत सोपा आणि काँग्रेस नेतृत्वाला आवडणारा अर्थ म्हणजे, राहुल गांधींच्या टीमने आता संघटनेवर ताबा मिळविण्यास सुरवात केली. या सर्वांचा खरा अर्थ हा आहे, की राहुल गांधी यांनी काँग्रेस संघटना काबीज किंवा ‘हायजॅक’ करायला सुरवात केली. ही टिप्पणी खुद्द काँग्रेसजनांचीच आहे. त्यांचे म्हणणे असे, की पक्षसंघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली असताना या अचानक नेमणुकांचे प्रयोजन काय?
राहुल गांधी हे पक्षांतर्गत लोकशाही प्रक्रियेचे मोठे समर्थक मानले जातात. त्यांनी माजी निवडणूक आयुक्त लिंगडोह यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या युवक व विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकादेखील पूर्वी करविल्या होत्या. मग अचानक हा बदल होऊन काँग्रेसमध्ये पुन्हा ‘नेमणुका-नियुक्‍त्यांचे राज्य’ सुरू होण्याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच, की निवडणुकांपूर्वीच संघटनेवर कब्जा करणे आणि आपल्या माणसांची हवी तेथे वर्णी लावून टाकणे. निवडणुकीच्या मार्गाने आपली माणसे निवडून येण्याची शाश्‍वती नसते तेव्हा सर्वसंमती, सहमती अशा गोंडस संज्ञा वापरून नियुक्‍त्या आणि नेमणुकांच्या अस्थायीपणाची मालिका सुरू केली जाते. सर्व राजकीय पक्षांमध्ये या रोगाची लागण आहे. राहुल गांधी अध्यक्ष होणार की नाही, हा प्रश्‍न त्यांच्या राजकारण प्रवेशापासूनच सुरू झालेला होता आणि अद्याप त्याचे खात्रीशीर उत्तर मिळालेले नाही. सोनिया गांधी यांनी त्यांना अध्यक्ष करण्यासाठी सर्व तयारी केलेली असूनही अद्याप त्याला मुहूर्त मिळत नाही. बहुधा संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताना हा मुहूर्त मिळेल. यातून साधणार काय? पक्षातल्या विचारी मंडळींना तर एकंदर भवितव्याचीच चिंता वाटू लागली आहे. केवळ आपल्याच भाट-भक्तांची भरती करून पक्ष पुढे चालणार कसा, हा प्रश्‍न सर्वांनाच भेडसावत आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसची पुरती वाट लागली. हरीश रावत यांनी राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव कसा होईल याचा आदर्शच निर्माण केला. तेथे प्रदेश काँग्रेसचे नवे अध्यक्ष नेमण्यात आले. विधानसभा निवडणुकीत चांगले काम केले नाही त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. उत्तर प्रदेशात प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राज बब्बर यांना कायम ठेवण्याचे कारण काय? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तेथील अध्यक्ष संजय निरुपम यांनी पक्षाला असे कोणते चमकदार यश मिळवून दिले, की त्यांना अद्याप अध्यक्षपदावर कायम ठेवण्यात आले आहे? दिल्ली महापालिकांतील अपयशाचे जबाबदार प्रदेश अध्यक्ष अजय माकन यांनाही धरायला हवे. म्हणजेच या नियुक्‍त्यादेखील संघटनेच्या भल्यासाठी नसून केवळ भाट-भक्तांसाठी आहेत असा अर्थ लावला गेला नाही तरच नवल!
काँग्रेस पक्षात आता वर्तमान नेतृत्वाच्या क्षमतेबाबत प्रश्‍न उपस्थित होऊ लागले आहेत. अद्याप काँग्रेसजनांमध्ये आपसांतच ही चर्चा आहे. यामध्ये मुख्य प्रश्‍न हाच विचारला जातो की प्राधान्य कुणाला? पक्षाला की परिवाराला? परिवारही पक्षाला विजय मिळवून देऊ शकत नसेल तर पुढे काय? ‘राहुल टीम’ म्हणून जी मंडळी पुढे येऊ पाहत आहेत त्यांच्याबद्दलही तक्रारी आहेत. राजस्थानचे तरुण प्रदेश अध्यक्ष सचिन पायलट यांचा मार्ग निर्वेध व्हावा यासाठी अशोक गेहलोत यांना राज्यातून बाजूला करून सरचिटणीस करण्यात आले. परंतु पायलट हे राजस्थानात कमी लक्ष घालतात आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क नाही अशा तक्रारी आहेत. ज्योतिरादित्य शिंदे हे तर त्यांच्या ‘राजेशाही मूड’मध्येच असतात आणि कार्यकर्त्यांशी त्यांचाही संपर्क नसल्याचे सांगितले जाते. हे काँग्रेसचे पुढच्या पिढीतले नेते मानले जातात. आता तर पक्ष त्यांच्याच ताब्यात जाण्याच्या अवस्थेत असताना फक्त ‘अर्धवेळ पक्षकार्य’ करणारे हे नेते पक्षाला ‘पूर्ण यश’ कसे मिळवून देणार हा प्रश्‍न विचारला जात आहे.
राहुल गांधी यांना भेटणे ही जगातली सर्वाधिक दुरापास्त गोष्ट असल्याचे कार्यकर्ते सांगतात. कारण त्यांचे कार्यालय कोण चालवते, भेटीच्या वेळा कोण ठरवते हेच लोकांना माहिती नसते. राहुल गांधी लोकप्रतिनिधी आहेत, परंतु त्यांच्या निवासस्थानी सरळ जाऊन कुणालाच भेटणे अशक्‍यप्राय आहे. सुरक्षा कर्मचारीच बाहेरच्याबाहेर हाकलून लावतात. याउलट त्यांच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या स्मृती इराणी यांना भाजपने अमेठीची जवळपास पूर्ण जबाबदारी दिल्यासारखी आहे. त्यांनी अमेठीच्या लोकांना भेटण्यासाठी महिन्यातून दोन दिवस राखून ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे काही सहायक स्वतंत्रपणे केवळ अमेठीतल्या लोकांच्या तक्रारी व गाऱ्हाण्यांच्या सोडवणुकीसाठी ठेवले आहेत. यामध्ये शाळा प्रवेशापासून सर्व कामांचा समावेश असतो. दुसरीकडे नेहरू-गांधी परिवाराची कौटुंबिक ‘जहागिर’ असल्याचा आव आणणाऱ्या राहुल गांधींना अमेठीतल्या लोकांसाठी वेळ नसतो. त्यामुळे अमेठीतही पुढच्या निवडणुकीत त्यांचे काय होईल हे सांगण्यास भविष्यवेत्त्याची गरज नाही. परंतु जाग येणार कधी? ती येण्याची शक्‍यता कमी आहे. अर्धवेळ राजकारण करणाऱ्यांमुळे काँग्रेसपुढे अस्तित्वाचे संकट उभे आहे.

Web Title: Anant Bagaitdar article about family politics