बदलती गावे : कलेढोण : गावाला सावरणारा द्राक्ष निर्यातीचा गोडवा

सुमारे 600 ते 650 एकर द्राक्षबागायती क्षेत्राचे कलेढोण हे सातारा जिल्ह्याच्या सीमेवरचे गाव. दहा वर्षापूर्वी कायम दुष्काळी ओळख असलेल्या खटाव तालुक्यातील कलेढोणला पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची कमतरता होती.
Grapes
GrapesSakal

सातारा जिल्ह्यातील द्राक्षांचे आगार म्हणून ओळखले जाणारे खटाव तालुक्यातील कलेढोण हे गाव. खटाव तालुक्यात दुष्काळी पट्टयात खडकाळ माळावरच्या पाण्यावर आंबट द्राक्षे गोड करून संसार गोड करणारे ग्रामस्थ निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेतात, ती युरोपला पाठवून देशाला परकी चलनही मिळवून देतात. द्राक्षबागायतीच्या जोडीला येथील गलाई व्यावसायिक भारतभर पसरले आहेत. द्राक्षशेती, गलाई व्यवसाय यांच्यामुळे गावात वाड्या-वस्तीवर टुमदार घरे, बंगले रस्त्याच्या दुतर्फा दिसतात.

सुमारे 600 ते 650 एकर द्राक्षबागायती क्षेत्राचे कलेढोण हे सातारा जिल्ह्याच्या सीमेवरचे गाव. दहा वर्षापूर्वी कायम दुष्काळी ओळख असलेल्या खटाव तालुक्यातील कलेढोणला पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची कमतरता होती. मात्र अलीकडच्या काळात गावात झालेले सिमेंट बंधारे, पाणी फाउंडेशन व नाम फाउंडेशन आणि जलसंधारणाच्या अन्य कामांमुळे गावठाणातील भूजल पातळी वाढली आहे. त्याचा फायदा गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी व द्राक्षांसह अन्य पिकाला होत आहे. द्राक्षपिकांसह ग्रामस्थ अलीकडे तरकारी मालाचेही उत्पादन घेत आहेत. त्यात कारली, दोडक्याचे प्रमाण अधिक आहे. येथील द्राक्षबागातयदार शेततळी, स्वमालकीचा टॅंकर, विहिरी, बोअरवेल यांच्या माध्यमातून शेतीस पाणीपुरवठा करतात. ऐन उन्हाळात द्राक्षबागांना पाण्याची कमतरता भासते. अशावेळी शेजारच्या सांगली जिल्ह्यातून टॅंकरने पाणी विकत घेऊन बागा फुलविताना शेतकरी दिसतात.

पाण्याचे योग्य नियोजन, द्राक्षांतील साखरेचे प्रमाण, औषधांची योग्य मात्रा, द्राक्षांवरील नाजूक साल व तिची जाडी यांची अभ्यासपूर्ण माहिती येथील शेतकऱ्यांना आहे. निर्यातक्षम उत्पादनांमुळे येथील द्राक्षास दुबई, ब्रिटनसह युरोपीय महासंघांतून मोठी मागणी आहे. निर्यातक्षम द्राक्षे तासगावच्या (जि. सांगली) शितगृहात साठवून तेथून परदेशात निर्यात करतात. निर्यात करून राहिलेला द्राक्षमाल दिल्ली, मुंबई आणि पुणे बाजारपेठेत पाठविला जातो. कष्टाचे पीक म्हणून द्राक्षांची ओळख असल्याने शेतकरी मुलाप्रमाणे बागांना जपतात. द्राक्षबागेसाठी ट्रॅक्टर, फवारणी यंत्रे, शेतीची अवजारे लागतात. त्यामुळे गावाची अर्थिक उलाढालही मोठी होते. कलेढोण हे गलाई व्यवसायामुळेही भारतभर प्रसिद्ध आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात येथील गलाई बांधव आहेत. वेगवेगळ्या राज्यांत जाऊन येथील व्यावसायिकांनी पंचतारांकित ज्वेलर्स, मोठे व्यवसाय, दुकाने थाटली आहेत. कुटुंबातील एक सदस्य व्यवसायानिमित्ताने बाहेर, तर दुसरा गावाकडे द्राक्ष बागायतीत गुंतलेला अशी अनेक कुटूंबे गावात हमखास आढळतात. गावातील ठराविक भाग मळे, वाड्या-वस्त्या या काही व्यवसायिकांच्या नावानेच प्रसिद्ध आहेत. गावातील सुमारे 25 टक्के ग्रामस्थ गलाईत, तर 30 ते 40 टक्के द्राक्षबागायतीत गुंतले आहेत. गावात अनेक कामगारांच्या द्राक्ष छाटणीच्या टोळ्या, महिला बचत गट आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com