रशियात पुन्हा एकतर्फी निवडणूक

रशियाच्या अध्यक्षपदी राहण्याचा उच्‍चांक विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतीन करतील, असे चित्र आहे. त्यांची लोकप्रियता टिकून असल्याचे विविध अहवाल सांगतात.
Russia president vladimir putin
Russia president vladimir putinsakal

- निलोवा रॉय चौधरी

रशियाच्या अध्यक्षपदी राहण्याचा उच्‍चांक विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतीन करतील, असे चित्र आहे. त्यांची लोकप्रियता टिकून असल्याचे विविध अहवाल सांगतात. तरीही आपल्याविषयीच्या विरोधाला धारच येता कामा नये, असा त्यांचा खाक्या कायम आहे. त्यांचे कट्टर विरोधक नवाल्नी यांच्या अकाली मृत्यूने काहीशी अस्वस्थता मात्र निर्माण झाली आहे.

रशियामध्ये १५ ते १७ मार्च २०२४ या कालावधीमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर तेथील सर्व घडामोडी पाहता रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडे सत्ता राहील, अशा पद्धतीने सर्व रचना करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुका घेण्यामागील नेमके कारण काय? असा प्रश्न पडत आहे.

युक्रेन आणि त्याला पाठबळ देणाऱ्या पाश्चिमात्य देशांशी दोन वर्षांहून अधिक काळ युद्ध सुरू असून, पाश्चात्त्य देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध घातले आहेत. तरीसुद्धा रशियाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा विशेष फटका बसलेला नाही. त्याचप्रमाणे पुतीन यांच्या लोकप्रियतेलासुद्धा कोणताच धक्का बसलेला नाही. उलट त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता प्राप्त होत आहे, असे काही अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे पुतीन यांचा पाचव्यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग निर्धोक असूनसुद्धा रशियामध्ये कोणताही आश्वासक विरोधक उरू नये, यासाठी अथक प्रयत्न का केले जात आहेत? हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. कारण या दृष्टीने काही टोकाची पावले उचलली जात असल्याची उदाहरणे आपल्यासमोर आहेत.

रशियाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने आठ फेब्रुवारी रोजी रशिया-युक्रेन युद्धावर कठोर टीका करणारे बोरिस नादेझदिन यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले. दुसरीकडे पुतीन आणि त्यांच्या नेतृत्वाखालील रशियन सरकारच्या धोरणाचे कठोर टीकाकार अलेक्सी नवाल्नी यांचा आर्क्टिक प्रदेशाजवळ असणाऱ्या रशियाच्या भूभागावरील तुरुंगात अचानक मृत्यू झाला. या घटनेने साऱ्या जगाला धक्का बसला होता.

अलेक्सी हे गेल्या कित्येक वर्षांपासून पुतीन यांचे कट्टर विरोधक आणि टीकाकार मानले जात होते. नवाल्नी हे काही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नव्हते. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतर तेथील सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. सरकारने निर्बंध घालून देखील नवाल्नी यांच्या अंत्ययात्रेसाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला होता, हे देखील तेथील सरकारला फारसे रुचलेले नाही.

राजकीय विश्लेषकांच्या मते जरी नवाल्नी यांना तुरुंगात पाठवण्यात आले होते, तरीदेखील रशियाचे राजकारण हे पुतिन आणि नवाल्नी या दोन ध्रुवांभोवतीच फिरत होते. मात्र, आता नवाल्नी यांचा झालेला मृत्यू आणि नादेझदिन यांची अपात्रता यामुळे पुतीन आणि युक्रेनविरुद्धचे युद्ध यांना होणारा विरोध आता पूर्णपणे मावळला आहे. त्यामुळेच २०२० मधील घटनात्मक दुरुस्तीने पुतीन यांच्या कार्यकाळात केलेल्या वाढीनंतर सुरू झालेल्या ‘पुतिन युगा’वर या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा लोकमान्यतेची मोहोर उमटणार आहे.

अडीच दशके सत्ताधीश

गेल्या २४ वर्षांपासून रशियाची सत्ता एक हाती सांभाळणाऱ्या पुतिन यांच्या सत्तेला नवाल्नी यांच्याकडून तसा कोणताच राजकीय धोका आता उरलेला नव्हता. याउलट रशियामधील काही खासगी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये पुतिन यांची लोकप्रियता सर्वाधिक असल्याचेच उघड झाले होते. तरीदेखील या निवडणुकीत विरोधकांना निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. इतकेच नाही तर रशियामधील खासगी माध्यमांवरही अनेक निर्बंध लादण्यात आलेले आहेत.

रशिया आर्थिक सहाय्य देत असलेल्या वॅग्नर या खासगी लष्कराने जून २०२३ मध्ये रशियाचे सैन्य आणि वॅग्नर लष्कराचे प्रमुख येव्हगिनी प्रिगोझीन यांच्यातील मतभेदानंतर बंडाचे निशाण फडकविले होते. अर्थात, २४ तासांच्या आतच प्रिगोझीन यांच्याशी झालेल्या करारानंतर हे बंड शमले. त्यानंतर पुढे काही महिन्यांतच एका विमान अपघातात प्रिगोझीन यांचा मृत्यू झाला.

१९९१ मध्ये तत्कालीन सोव्हिएत संघराज्याचे (यूएसएसआर) विभाजन झाल्यानंतर रशियामध्ये अध्यक्षपदासाठी सात आणि रशियन संसदेतील लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी सात सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत. यातील १९९१ आणि १९९६ मध्ये बोरिस येलत्सिन, २०००, २००४, २०१२ आणि २०१८ मध्ये व्लादिमीर पुतीन; तर २००८ मध्ये दिमित्री मेदवेदेव असे एकूण तिघे अध्यक्षपदी निवडून आलेले आहेत. २०२० मध्ये रशियाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ चार वर्षांवरून वाढवून सहा वर्षे करण्यात आला.

रशियात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कायमच दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. याचे सर्वात अलीकडील उदाहरण म्हणजे २०१८च्या सार्वत्रिक निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले रशियन फेडरेशन कम्युनिस्ट पक्षाचे पावेल ग्रुडिनिन.

आता चौरंगी लढत

यावेळच्या निवडणुकीत देखील पुतीन यांच्याशिवाय कम्युनिस्ट पक्षाचे निकोले खारीटोनोव्ह, नॅशनल लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे लिओनीद स्लुत्स्की आणि न्यू पीपल पार्टीचे व्लादिस्लाव डवान्कोव्ह हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याशिवाय निवडणुकीत उतरू इच्छिणाऱ्या अनेकांना विविध कारणांनी रोखण्यात आले आहे. ७१ वर्षीय पुतिन यांना पर्याय म्हणून ४० वर्षीय डवान्कोव्ह यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांनी युक्रेनबरोबर शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

२०१४ मध्ये क्रिमियाचे रशियामध्ये विलिनीकरण करून घेतल्यानंतर जी-८ या जगातील महासत्तांच्या संघटनेतून रशियाला अनिश्चित काळासाठी काढून टाकण्यात आले. तेव्हाच पुतीन यांनी सांगितले होते की, पाश्चात्त्य देशांबरोबर आमचे कायमचे युद्ध सुरू झाले आहे. यामुळेच रशियामधील त्यांच्या सत्तेला एक वैचारिक पाठबळ देखील मिळाले आहे.

चिंताजनक चीनशी जवळीक

भारतासाठी पुतीन यांचे पुन्हा सत्तेत येणे अपेक्षित असून, त्यातून भारताला कोणतेही नुकसान होणारे नाही. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर ‘हा काळ युद्धाचा नाही’ असा सावधगिरीचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना दिला होता. तरीही या दोन्ही नेत्यांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध असून ते परस्परांशी नियमितपणे संपर्कात आहेत, असे मानले जाते.

त्याचप्रमाणे या दोन्ही नेत्यांकडून द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर देखील सातत्याने भर दिला जात आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतेच भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांचे सार अगदी थोडक्यात पण नेमकेपणाने मांडले आहे. ते म्हणाले होते की, रशियाने भारताच्या हितसंबंधांना कधीही धक्का लावलेला नाही. त्यामुळेच काळाच्या कसोटीवर भारत-रशिया यांच्यातले सौहार्द आणि द्विपक्षीय संबंध टिकून आहेत.

मात्र, भूराजकीय परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय धोरणात्मक समीकरणे यांचा भारत आणि रशिया संबंधांवर प्रभाव जाणवतो. पाश्चात्त्य देशांनी घातलेल्या निर्बंधांनंतर रशिया हा चीनच्या अधिकच जवळ जात असल्याचे दिसून येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, चीन रशियातील कच्च्या तेलासाठी आणि संरक्षण साहित्यासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे भारताच्या चिंतेमध्ये वाढ होणे स्वाभाविक आहे.

कोणताही प्रबळ विरोधक नसल्यामुळे पुतीन हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी होतील असे मानले जाते. या पुढील कार्यकाळात त्यांचा भर युक्रेन युद्ध जिंकण्यावर असणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय, भौगोलिक आणि आर्थिक परिस्थितीवर अनिश्चिततेचे सावट राहणार आहे. अमेरिकेमधील राजकारणात निर्माण होऊ शकणारी अनिश्चितता देखील पुतिन यांना अधिक सामर्थ्यवान बनविणार असल्याचे मानले जात आहे.

(अनुवाद - रोहित वाळिंबे)

(लेखिका दिल्लीस्थित रशियन राजकारणाच्या विश्‍लेषक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com