नवे सूर, पण जुने तराणे...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

अनुपम खेर यांच्या पात्रतेबद्दल मात्र कुणीही शंका घेण्याचे कारण नाही. या अत्यंत अस्सल आणि मुरब्बी अभिनेत्याने आजमितीस पाचशेहून अधिक चित्रपटांत काम केले असून, अनेक मानसन्मान मिळविले आहेत. खेर यांची उजवी राजकीय विचारसरणी मात्र अनेकांना खटकते.

पुण्याच्या प्रतिष्ठित फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची नियुक्‍ती करून माहिती-प्रसारण मंत्रालयाने एका दगडात दोन पक्षी मारले असेच म्हणावे लागेल. गेल्या वर्षी गजेंद्र चौहान यांची निवड करून सरकारने कलाक्षेत्राचा रोष ओढवून घेतला होता. दुय्यम-तिय्यम दर्जाच्या कलावंताचा केवळ पक्षनिष्ठा आणि विचारसरणीच्या निकषावर कलेच्या प्रांतात जीर्णोद्धार करण्याचे धोरण बऱ्यापैकी अंगलट आल्याने यंदा नवा अध्यक्ष निवडताना एवढी काळजी घेतली गेली, की निदान नव्या अध्यक्षांच्या पात्रतेबद्दल कोणीही शंका घेऊ नये. अर्थात, विचारसरणीचा निकष सरकारने सोडलेला नाही, हेही उघडच दिसते आहे. गजेंद्र चौहान यांच्या "स्वागता'पोटी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेला संप 149 दिवस चालला, तर अनेक कलावंतांनी या "राजकीय' नियुक्‍तीचा निषेध म्हणून आपापले सरकारी पुरस्कार परत करून टाकले. चौहान यांना संस्थेत फार काही करता आले नाही. "मी केलेल्या चांगल्या कामाचे प्रशस्तिपत्र महालेखापालांच्या (कॅग) अहवालात नोंद झाले आहे,' असे लंगडे स्पष्टीकरण त्यांनी केले आहे तेवढेच.

अनुपम खेर यांच्या पात्रतेबद्दल मात्र कुणीही शंका घेण्याचे कारण नाही. या अत्यंत अस्सल आणि मुरब्बी अभिनेत्याने आजमितीस पाचशेहून अधिक चित्रपटांत काम केले असून, अनेक मानसन्मान मिळविले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले अनेक चित्रपट कलावंत आज आघाडीला आहेत. खेर यांची उजवी राजकीय विचारसरणी मात्र अनेकांना खटकते. एकेकाळी याच चित्रपटसृष्टीत डाव्यांचा दबदबा होता. देशाच्या फाळणीनंतर तर हा विचारसरणीचा रंग गडद होत गेला. अर्थात, तेव्हा परस्परांच्या विचारधारांचा आदर करत कलाक्षेत्रातील आपापला वाटा उचलण्याकडे कलावंतांचा कल दिसून येत असे. अनुपम खेर हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी भाजपचे उघड समर्थक. त्यांच्या कलावंत पत्नी किरण खेर या भाजपच्या खासदार. स्वत: खेर यांनी "पुरस्कारवापसी'च्या प्रकरणात सरकारची बाजू लावून धरत बरीच टीका ओढवून घेतली होती. त्यांच्या नियुक्‍तीची बातमी येऊन काही तास उलटण्याच्या आतच फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या संघटनेने त्यांना खुले पत्र लिहून संस्थेतील उणीवांचा लेखाजोखा मांडला आहे. या पत्रात त्यांच्या नियुक्‍तीबद्दलच्या अभिनंदनाचा शिष्टाचार म्हणूनसुद्धा उल्लेख नाही. यावरूनच खेर यांची कारकीर्दही वाटते तितकी सहजसोपी नसणार हे दिसतेच आहे.

Web Title: anupam kher ftii