विधानसभा निवडणुकीत नव्या समीकरणांची चिन्हे

दयानंद माने
शुक्रवार, 7 जून 2019

लोकसभा निवडणुकीत आठपैकी तब्बल सात खासदार, इतके घसघशीत माप मराठवाड्याने भाजप-शिवसेना युतीच्या पदरात टाकले.

लोकसभा निवडणुकीत आठपैकी तब्बल सात खासदार, इतके घसघशीत माप मराठवाड्याने भाजप-शिवसेना युतीच्या पदरात टाकले. या निवडणुकीने मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली आहे. जिल्ह्याजिल्ह्यांतील राजकारण नव्या समीकरणांच्या वळणावर येऊन ठेपले आहे. अर्थातच, या साऱ्या बदलाला आगामी विधानसभा निवडणुकीचा संदर्भ आहे. त्यामुळे पुढच्या काही महिन्यांत राजकीय घडामोडी वेगाने होतील, अशी अपेक्षा आहे. 

औरंगाबाद मतदारसंघात "एमआयएम'चे इम्तियाज जलील यांच्या विजयाने भाजप-शिवसेना युतीचा वारू किमान एका मतदारसंघात रोखला गेला. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरून राज्यभर चर्चित राहिलेल्या वंचित बहुजन आघाडीला विजय मिळवून देणारा हा एकमेव मतदारसंघ. हिंदू- मुस्लिम धार्मिक ध्रुवीकरणासाठी ओळख असलेल्या या मतदारसंघात तब्बल वीस वर्षे खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे यांचा पराभव शिवसेनेला जिव्हारी लागला आहे. "एमआयएम'च्या विजयानंतरचा उन्माद व दगडफेकीच्या घटनेमुळे खैरे यांनी "हा उन्माद सहन केला जाणार नाही,' अशी भाषा वापरत आपले इरादे स्पष्ट केले, तर इम्तियाज जलील यांनी "मी केवळ दलित- मुस्लिमांचा खासदार नाही, तर सर्व औरंगाबादकरांचा खासदार असून, हिंदूंची सुरक्षा ही माझी जबाबदारी आहे,' असे नमूद केले. या खडाखडीनंतर औरंगाबाद या मराठवाड्याच्या राजधानीचे राजरंग पुढील काळात पाहणे रंजक ठरेल. 

बीडच्या विजयाने मुंडे यांचे वर्चस्व सिद्ध 
बीड मतदारसंघातही महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांची बहीण डॉ. प्रीतम मुंडे यांच्या सलग दुसऱ्या विजयानंतर केवळ बीडच नव्हे, तर मराठवाडा व मराठवाड्याबाहेरच्या जिल्ह्यांवरही आपले वर्चस्व असल्याचे सिद्ध केले. गोपीनाथगडावर मराठवाडा, नगर, सोलापूर जिल्ह्यातील नवनिर्वार्चित खासदारांना त्यांनी नुकतेच आमंत्रित करून गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. तसेच या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना बोलावून पुढील मुख्यमंत्री तुम्हीच राहणार, अशी ग्वाही देत आपली राजकीय उंची वाढवून घेतली. 

आणखी एका मतदारसंघातील राजकीय कूस बदलाची दखल घेणे क्रमप्राप्त आहे, तो म्हणजे नांदेड जिल्हा. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पराभवाने येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील राजकारणात चव्हाण विरोधकांचे नेते ठरलेले प्रताप पाटील- चिखलीकर यांनी चव्हाणांना पराभूत केले. त्यामुळे "जायंट किलर' अशी त्यांची प्रतिमा झाली आहे. या कट्टर विरोधकांतील खडाखडी आता बघायला मिळत आहे. विजयानंतर सत्कार सोहळ्याबरोबरच दुष्काळ, पाणीटंचाई आदी विषयांवरच्या बैठकांचा धडाका लावत चिखलीकरांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. गलितगात्र झालेल्या कॉंग्रेसने आपल्या परीने या डावाला प्रतिडाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सहापैकी तीन आमदार असलेल्या कॉंग्रेसला भोकर मतदारसंघात मिळालेली पिछाडी सलणारी आहे. चव्हाणांच्या पत्नी अमिता चव्हाण तेथे आमदार आहेत. दुसरीकडे शिवसेना व पालकमंत्री रामदास कदम आणि नवनिर्वाचित खासदार चिखलीकर यांच्यात सारेकाही आलबेल नसल्याने भाजपच्या या खासदाराबाबत शिवसेनेची भूमिका काय राहील, यावरही बरेच काही अवलंबून आहे. 

जालना मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या देदिप्यमान विजयानंतर बोलण्यासारखे काही राहिलेले नाही. एकहाती म्हणता येईल असा व प्रचंड मताधिक्‍क्‍याचा विजय त्यांना मिळाला. मात्र, त्यांच्या विजयापेक्षा औरंगाबाद मतदारसंघात युतीच्या पराभवातील त्यांच्या भूमिकेची व त्यांच्या वक्तव्याचीच चर्चा जास्त झाली; पण दानवे यांच्याबद्दल कुणाची काहीही मते असली तरी, त्यांच्या कार्यकाळात भाजपला राज्यात चांगले दिवस आले, हे कुणीही मान्य करेल. 

"राष्ट्रवादी'ची परभणीत चांगली लढत शिवसेनेच्या दृष्टीने आव्हान असलेले उस्मानाबाद, परभणी मतदारसंघ प्रखर विरोधानंतरही कायम राहिले. औरंगाबाद हा शीर्ष मतदारसंघ त्यांना गमवावा लागला. मात्र, हिंगोलीत हेमंत पाटील यांच्या रूपाने त्यांना देदिप्यमान विजय मिळाला. "राष्ट्रवादी'ने परभणीत चांगली लढत दिली, उस्मानाबादेत मात्र त्यांची कमालीची निराशा झाली. नांदेड व हिंगोलीतील पराभवाने कॉंग्रेसचा सफाया झाला. आता आगामी विधानसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणे लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर अवलंबून असतील. त्या दृष्टीने मराठवाड्यात नेपथ्यरचना सुरू झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about the new equations in assembly elections