No Mobile In Theater: मोबाईलची 'चौथी' घंटा !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जून 2019

'नॉक नॉक सेलिब्रेटी' या नाटकाचा प्रयोग नाशिकमध्ये सुरू असताना एका प्रेक्षकाच्या मोबाईलची रिंग जोरात वाजल्याने कलाकारांसह अन्य प्रेक्षकांचाही रसभंग झाला. त्यामुळे नाटकातील प्रमुख कलाकार सुमीत राघवन यांनी प्रयोगच थांबविला.

'नॉक नॉक सेलिब्रेटी' या नाटकाचा प्रयोग नाशिकमध्ये सुरू असताना एका प्रेक्षकाच्या मोबाईलची रिंग जोरात वाजल्याने कलाकारांसह अन्य प्रेक्षकांचाही रसभंग झाला. त्यामुळे नाटकातील प्रमुख कलाकार सुमीत राघवन यांनी प्रयोगच थांबविला. नाट्यगृहात मोबाईलच्या वापरामुळे कलाकार व प्रेक्षकांचा रसभंग होण्याच्या अशा घटना नित्याच्याच झाल्या आहेत. त्यातून कसा मार्ग काढता येईल, याबाबत कलाकारांची भूमिका. 

बेशिस्तीकडे दुर्लक्ष नको : सुमीत राघवन 
नाशिक येथे नाट्यप्रयोगादरम्यान घडलेला प्रकार पुन्हा उद्‌भवू नये, यासाठी प्रेक्षकांना कसे साक्षर करावे, हेच मला समजत नाही. यावर नाट्यगृहामध्ये जॅमर बसवणे हा जो उपाय पुढे येत आहे, तो किती योग्य आहे, हे आता सांगता येत नाही. नाट्यगृह किंवा चित्रपटगृहाबाहेर "नो स्मोकिंग'चे बोर्ड असतात, तसे मोबाईल सायलेंटवर असल्याचेही बोर्ड लावावेत. या समस्येवर सरकारने तोडगा काढला पाहिजे. एखाद्या प्रेक्षकाच्या बेशिस्तीमुळे अन्य प्रेक्षकांना, तसेच कलाकारांना सादरीकरणात त्रास झाल्यास त्या प्रेक्षकाला दंड ठोठावण्यात यावा. असा नियम केल्यास प्रेक्षक आपल्या वागणुकीबाबत दक्ष राहतील, असे वाटते. 

सुमीतने घेतलेली भूमिका योग्यच; कलाकारांचा पाठिंबा

नाशिकमधील प्रयोगादरम्यान खूप त्रास झाल्यामुळे मी प्रयोग थांबवला. प्रत्येक कलाकाराने अशा त्रासाबद्दल जाहीरपणे बोलले पाहिजे. प्रेक्षकांच्या या बेशिस्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नाटकादरम्यान मोबाईल वाजला, तर कलाकारांनी नाटक थांबवून त्या प्रेक्षकाला बाहेर जाण्यास सांगावे. ही भूमिका प्रत्येक कलाकाराने घ्यावी. हे मान्य आहे, की काही ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल लगेच सायलेंट करता येत नाही. आम्ही नाटकाच्या सुरवातीलाच प्रेक्षकांना सूचना करतो, की तुमच्या बाजूला असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा मोबाईल सायलेंटवर करण्यास मदत करावी. नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या डोअरकीपरने प्रेक्षक नाट्यगृहात येत असतानाच त्यांना विचारावे, की तुमचा मोबाईल सायलेंटवर आहे काय? 

नाटक चालू आहे, पण शांतता कुठंय?

वाढत जाणाऱ्या अशा बेशिस्तीबद्दल काय करता येईल, यावर तोडगा काढण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याकडे मी एक प्रस्ताव मांडणार आहे. कलाकारांबरोबरच रसिक प्रेक्षकांनाही या बेशिस्तीचा त्रास होतोच. नाट्यसृष्टीतील प्रत्येक मोठ्या कलाकाराने मोबाईल वापराच्या बेशिस्तीबाबत स्पष्ट भूमिका घेऊन प्रेक्षकांमध्ये शिस्तीची जाणीव निर्माण केली पाहिजे. 
 

या प्रकरणात पाठिंबा देणाऱ्या सर्व "नेटकऱ्यां'चा मी आभारी आहे. मला वाटते, नाटकच नव्हे तर गाण्याचा, नृत्याचा कार्यक्रम किंवा चित्रपट सुरू असताना मोबाईल वाजताच कामा नये. एवढेच नव्हे, तर भर प्रयोगात लोक मोबाईलवर बोलतात. असे वागणे अत्यंत चुकीचे आहे. हा मुद्दा अत्यंत संवेदनशील असल्याने त्यावर लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. 

जॅमर बसविणे हाच पर्याय : चिन्मय मांडलेकर 
नाटक सुरू असताना प्रेक्षकांनी मोबाईल वापरल्यास त्याचा त्रास प्रत्येक कलाकाराला होतोच. सुमीतने याबाबत घेतलेली भूमिका ही केवळ त्या दिवसापुरती मर्यादित नाही. हा त्रास सर्वच कलाकारांना सातत्याने होत आहे. नाटक पाहायला येणारे प्रेक्षक स्वतःला शिस्त कधी लावून घेणार, हा कळीचा मुद्दा आहे. प्रयोगादरम्यान वाजणारे मोबाईल, बेशिस्त पद्धतीने प्रेक्षकांचे फोनवरील बोलणे आणि प्रेक्षकांसोबत आलेल्या लहान मुलांचा रडण्याचा आवाज या सर्वांचा त्रास नाटकातील कलाकारांना होत असतो. या त्रासाबद्दल कलाकारांमध्ये दुमत नाही. यावर काही उर्मट प्रेक्षक "आम्ही तिकीट काढून नाटक बघायला येतो,' असे म्हणून कलाकारांवर हक्क गाजवायला बघतात. तिकीट हा प्रेक्षकांचा मालकी हक्क नव्हे, त्या तिकिटाबरोबर प्रेक्षकांवर जबाबदारीही येते. नाटकाचे तिकीट काढल्यावर प्रेक्षकांनी तो प्रयोग समंजसपणे पाहिला पाहिजे. मोबाईलचे सायलेंटचे बटण दाबायला प्रेक्षक उच्चशिक्षित असण्याची गरज नाही. ते कोणालाही करता येते. ते जमत नसेल, तर प्रेक्षकांनी नाटक बघायला येऊ नये

हल्ली नाटकाच्या प्रयोगादरम्यान मोबाईल वाजला नाही, तर ती खूप दुर्मीळ घटना ठरते. मी शंभर प्रयोग करतो, तेव्हा केवळ दोन प्रयोगांत मोबाईल फोन अजिबात वाजत नाही, असा अनुभव आहे. हा अनुभव कमी- अधिक प्रमाणात प्रत्येक नाटकाच्या प्रयोगादरम्यान येतो. नाटक सुरू होण्यापूर्वी प्रेक्षकांना नम्रपणे मोबाईल बंद किंवा सायलेंटवर ठेवण्यासंदर्भात आम्ही कलाकार सूचना देतो. आता प्रेक्षकांना याबाबतीत साक्षर करून, विनवणी करून काही उपयोग होईल, अशी परिस्थिती राहिलेली नाही. तेव्हा यावर नाट्यगृहामध्ये मोबाईल जॅमर बसविणे, हा एकच उपाय दिसतो. हेच प्रेक्षक न्यायालयात जातात, तेव्हा मोबाईल न चुकता बंद ठेवतात, कारण तिथे कायद्याचा बडगा असतो. मग नाट्यगृहातच बेशिस्तपणा का?

प्रेक्षक म्हणतात, की आम्हाला इमर्जन्सी येऊ शकते. इमर्जन्सी असल्यास प्रत्येक नाट्यगृहाच्या कार्यालयात दूरध्वनी आहेत. तेथे फोन करून निरोप देता येईल. तो निरोप नाट्यगृहाचे कर्मचारी त्या प्रेक्षकांपर्यंत पोचवतील. नाटक मुळात दोन तासांचे असते, त्यातही 10-15 मिनिटांचा मध्यंतर असते. त्या वेळेत प्रेक्षक फोनवर बोलू शकतात. मध्यंतरात मोबाईल जॅमर "ऑफ' करता येतील. या दोन तासांत मोबाईलवर बोललो नाही, तर आपल्यावर फार मोठी आपत्ती कोसळेल, अशी परिस्थिती नक्कीच नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी आपले मोबाईल बंद किंवा सायलेंटवर ठेवावेत, हीच आम्हा कलाकारांची नम्र अपेक्षा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about the problem of ringing mobiles in theatre