नाममुद्रा : गरुडझेप 

गोपाळ कुलकर्णी 
Saturday, 26 September 2020

वाराणसीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीनं घेतलेली ही गरुडझेप आहे. तिचं हे यश "राफेल'ची पहिली महिला "फायटर पायलट' म्हणून तर आहेच; पण अनेक मुलींना प्रेरणा देणारेही आहे.

भारताच्या पाकिस्तान आणि चीनला लागून असणाऱ्या सीमांवर अभूतपूर्व असा तणाव निर्माण झाला असताना "राफेल' या लढाऊ विमानांचं झालेलं आगमन आणि त्यातही एका महिला वैमानिकाच्या हाती या विमानाच्या कॉकपीटची सूत्रे यावीत, ही घटना नोंद घ्यावी अशाच. कधी काळी आकाशात मुक्त भरारी घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या वाराणसीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीनं घेतलेली ही गरुडझेप आहे. तिचं हे यश "राफेल'ची पहिली महिला "फायटर पायलट' म्हणून तर आहेच; पण अनेक मुलींना प्रेरणा देणारेही आहे. शालेय जीवनापासूनच भव्यदिव्य स्वप्न पाहणाऱ्या शिवांगी सिंहच्या या भरारीमागं तितकीच कठोर मेहनतदेखील दडली आहे. वाराणसीमध्येच शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिनं नंतर बनारस हिंदू विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. महाविद्यालयात शिकत असतानाच ती "नॅशनल कॅडेट कोअर'ची (एनसीसी) सदस्य बनली. याचा मोठा फायदा तिला पुढे लष्करी प्रशिक्षणादरम्यान झाला.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सेव्हन यूपी एअर स्क्वाड्रनचा घटक बनल्यानंतर 2016मध्ये तिच्या एअरफोर्स अकॅडमीतील अधिकृत प्रशिक्षणाला सुरवात झाली. सध्या फ्लाईट लेफ्टनंट बनलेल्या शिवांगीला मिग- बायसनसारख्या लढाऊ विमानांच्या उड्डाणाचा अनुभव आहे. आता "राफेल'सारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानाचे उड्डाण करताना तिचे कौशल्य आणि प्रशिक्षणाचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. विशेष म्हणजे शिवांगीचीच वर्गमैत्रिण असणारी प्रतिभा सध्या सुखोई 30- एमकेआय या विमानाची सूत्रे सांभाळते आहे. सध्या शिवांगीचे अंबालातील हवाई तळावर प्रशिक्षण सुरू आहे. अर्थात राफेलची सूत्रे हातात घेणं ही कोणत्याही नवख्या वैमानिकासाठी वाटती तितकी सोपी गोष्ट नाही, यासाठी त्यांना आधी "कन्व्हर्जन ट्रेनिंग' पूर्ण करावं लागतं. जगातील सर्वाधिक वेगानं लॅंडिंग आणि टेकऑफ करणारं "राफेल' हाताळण्यापूर्वी तिला खडतर प्रशिक्षणाला सामोरं जावं लागेल. शिवांगीची नियुक्ती या आधी राजस्थानातील हवाई तळावर होती, येथे तिनं विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलं होतं. आता अंबालाच्या एअरबेसवर तिला पूर्णपणे वेगळ्या तंत्रज्ञानाने सुसज्ज असणाऱ्या "राफेल'ला हाताळावं लागेल. अर्थात एखाद्या महिलेने लढाऊ विमानांची सूत्रे हाती घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. फ्लाईट लेफ्टनंट अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंह या रणरागिनींच्या पहिल्या फायटर तुकडीने "हम भी किसीसे कम नहीं' हे याआधीच दाखवून दिलं आहे. आता शिवांगीच्या हाती आलेलं "राफेल' याचा पुढचा टप्पा म्हणावा लागेल. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about Raphael first female fighter pilot

Tags
टॉपिकस
Topic Tags: