या जगण्यावर - स्पर्शाची अमर्याद शक्ती!

hands
hands
Updated on

नसिरुद्दीन शाह आणि शबाना आझमी यांचा एक सिनेमा होता, ‘स्पर्श’. आपल्या सभोवतालचं अवकाश अनुभवण्यासाठी आपल्याला दिलेली पंच ज्ञानेंद्रिये समसमान क्षमतेची आहेत, असं हळुवारपणे सांगणारी कविताच होती ती. डोळ्यांनी दिसतं म्हणून तेच आणि फक्त तेच अनुभवण्याचा अट्टाहास डोळसांना जरा जास्तच असतो. म्हणून सौंदर्याचा उल्लेख आला की त्यामागून आपसूकच दिसण्याचे संदर्भ येतात. पण दिसणं एक पंचमांश असतं. आपल्या भोवतीचं अवकाश आपल्याकडे असणाऱ्या पंच ज्ञानेंद्रियांद्वारे आपल्यामध्ये झिरपण्याचा प्रयत्न करत असतं. आपले डोळे म्हणजे प्रकाशाला, म्हणजे विद्युत चुंबकीय लहरीना नोंदवणारे सेन्सर आहेत. ते सेन्सर प्रतिसाद देतात फक्त तांबड्यापासून जांभळ्यापर्यंतच्या विद्युत चुंबकीय लहरींना. पण त्याच्या अलीकडे आणि पलीकडे असंख्य विद्युत चुंबकीय लहरी पसरलेल्या आहेत. तोदेखील प्रकाशच. पण आपल्या अनुभवापलीकडचा. आपल्याला मात्र आपल्या या तोकड्या दृष्टीचं किती कौतुक? 

आपलं इंद्रधनुष्य जेमतेम सात रंगांचं. आपलं सेन्सर आणखी ‘सेन्सिटिव्ह’ झालं तर तांबड्याच्या अलीकडे आणि जांभळ्याच्या पलीकडे कितीतरी रंग इंद्रधनुष्यात मिसळले जातील. किती सुंदर असेल नाही ती कमान? पण आपण आनंदी असतो सात रंगाच्या इंद्रधनुष्यावर. खरं तर दिसणं म्हणजे फसणंच असतं. प्रकाशाचा उद्गम बदलला की वस्तूंचा रंग बदलतो. मग रंग वस्तूमध्ये असतो की प्रकाशात? आपण नेमका कोणता रंग, कोणतं सौंदर्य पाहतो? सकाळी बागेतल्या झाडांवर रेंगाळणाऱ्या उन्हाच्या कितीतरी रंगछटा मोहून टाकतात, मग त्या छटा रात्री कुठे जातात? झाड सुंदर दिसणं किंवा न दिसणं प्रकाशावर अवलंबून असतं. म्हणजे मुळात ‘दिसणारं’ असं सौंदर्य नसतंच. आपल्याला प्रकाश दिसतो, वस्तू दिसतच नाहीत. हा सगळा छाया- प्रकाशाचा खेळ असतो.

स्वरदेखील एका विशिष्ट वारंवारतेच्या अलीकडे आणि पलीकडे गेले की ऐकू येत नाहीत. तिथेदेखील या सेन्सरच्या मर्यादा जाणवतात. वाटवाघळाला जे ऐकू येतं ते आपण ऐकू शकत नाही. आपण ऐकतो ते फक्त सात स्वर. म्हणजे सात स्वर, सात रंग याच आपल्या अवकाशाला ओळखण्याच्या, जाणवण्याच्या खिडक्‍या आहेत. त्या तेवढ्याच उघडाव्यात अशी व्यवस्था निसर्गानेच केली आहे. चव जाणवायची असेल तर ती जिभेपर्यंत न्यावी लागते. चव आपणहून दरवळत आली आणि जिभेला जाणवली असं होत नाही. म्हणजे कोणती चव घ्यायची हे आपल्यावर अवलंबून. चवीला मर्यादा आवडीच्या, भूप्रदेशाच्या, संस्कारांच्या. चव आणि गंध नाही म्हटले तरी अनुमतीनेच अनुभूती देतात.

दृष्य, चव, गंध, स्वर या सगळ्या चेतनेन्द्रियांची मर्यादा वैज्ञानिकदृष्ट्या अधोरेखित झाली की स्पर्शाची अमर्याद शक्ती जाणवू लागते. स्पर्श सत्य असतो. पण ही स्पर्शाची खिडकीच आपण किलकिली केलेली असते. अवकाशाच्या अनुभूतीसाठी एक पंचमांश भाग्य या स्पर्शाच्या खिडकीला मिळतच नाही. इतर इंद्रियांसारख्या स्पर्शाला मर्यादा नसतात. पण आपण ही स्पर्शाची भाषा, अनुभूती फार काटकसरीने वापरतो. स्पर्श लाजरे, बुजरे असतात. मायेनं ओथंबलेले असतात. कधी धीट, तर कधी आक्रमक. पण ते बोलतात. स्पर्श रेशमी, जाडेभरडे असतात. स्पर्शांना धर्म, जात, देश कसलंच बंधन नसतं. ईदच्या दिवशी एकमेकांना आलिंगन देऊन मुबारकबात दिली जाते, तशीच दसऱ्यालासुद्धा गळाभेट असते. पाश्‍चात्य संस्कृतीत शेकहॅंड करतात. फ्रेंच लोक गालाला गाल लावतात. इथेही स्पर्श महत्त्वाचा. का असेल स्पर्श महत्त्वाचा? मला वाटतं इतर ज्ञानेंद्रियं खोटं बोलू शकतात, पण स्पर्श फक्त खरं बोलतात, हे प्रत्येक संस्कृतीला माहिती असतं. वारंवारता, म्हणजे फ्रिक्वेन्सी बदलली की इतर ज्ञानेंद्रियांच्या अनुभूतीत फरक पडतो. पण स्पर्शाचं तसं नसतं. म्हणूनच एक पंचमांश स्पर्शात पंचमहाभूतांना कवटाळण्याची शक्ती असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com