कुंपणानेच खाल्ले शेत...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

एकीकडे पोलिसांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते; पण त्या आघाडीवर काही होण्याऐवजी प्रत्यक्षात आपली ‘किंमत’ वाढावी यासाठी या दलातील काही अपप्रवृत्ती कशा प्रयत्न करीत असतात, याचे ढळढळीत उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील चोरीची घटना आणि पोलिसांनी त्यात बजावलेली ‘अर्थपूर्ण’ भूमिका यावरून समोर आले आहे. वारणानगरमधील एका फ्लॅटमधून कोल्हापुरातील एका बांधकाम व्यावसायिकाचे तीन कोटी रुपये गेल्या वर्षी मार्चमध्ये चोरीस गेले. मोहिद्दीन मुल्ला या संशयिताला त्या संदर्भात अटकही झाली आणि त्याने मिरजेतील एका घरात ठेवलेली ती रक्कमही जप्त करण्यात आली; पण प्रकरण तेथेच संपले नाही.

एकीकडे पोलिसांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते; पण त्या आघाडीवर काही होण्याऐवजी प्रत्यक्षात आपली ‘किंमत’ वाढावी यासाठी या दलातील काही अपप्रवृत्ती कशा प्रयत्न करीत असतात, याचे ढळढळीत उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील चोरीची घटना आणि पोलिसांनी त्यात बजावलेली ‘अर्थपूर्ण’ भूमिका यावरून समोर आले आहे. वारणानगरमधील एका फ्लॅटमधून कोल्हापुरातील एका बांधकाम व्यावसायिकाचे तीन कोटी रुपये गेल्या वर्षी मार्चमध्ये चोरीस गेले. मोहिद्दीन मुल्ला या संशयिताला त्या संदर्भात अटकही झाली आणि त्याने मिरजेतील एका घरात ठेवलेली ती रक्कमही जप्त करण्यात आली; पण प्रकरण तेथेच संपले नाही. ‘कुंपणानेच शेत खाल्ले’ किंवा ‘चोरावर मोर’ या म्हणींचा प्रचिती देणारा पुढचा सारा घटनाक्रम आहे. या चोरीच्या तपासाच्या निमित्ताने सांगलीतील काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच जप्त रकमेवर डल्ला मारला आणि त्यासाठी फिर्यादीलाच मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. ही रक्कम तब्बल सव्वानऊ कोटी रुपये आहे. एक निरीक्षक, सहायक निरीक्षक, फौजदार, हवालदार आणि बाकीचे कॉन्स्टेबल या प्रकरणात आरोपी आहेत. 

अशा प्रकारे कायद्याचे रक्षकच भक्षक बनणार असतील, तर सर्वसामान्यांनी कोणावर भरवसा ठेवायचा, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतो. खरे तर वर्दीचा एक धाक असतो. त्या धाकाचा वापर समाजाच्या भल्यासाठी व्हायला हवा; पण समाजाचे काय व्हायचे ते होवो, ‘मी, मला, माझे’ याचसाठी ‘त्या’ अधिकारांचा वापर करणारे कोणत्या थराला जाऊ शकतात याचा हा नमुना म्हणता येईल. पोलिसांची प्रतिमा हाही नेहमीच सार्वत्रिक चर्चेचा विषय असतो. अर्थात काहींच्या दुष्कृत्यामुळे सरसकट सर्व खात्याची बदनामी होणे हेही योग्य नाही. कर्तव्यनिष्ठ व जबाबदार पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्याचा किती नाहक त्रास होत असेल याचीही कल्पना करायला हवी. संशयित पोलिसांचे कारनामे उघड करणारी यंत्रणाही पोलिसांचीच आहे हे लक्षात घेतले, तर साराच काही अंधार नाही हेही स्पष्ट होते. या दुष्कृत्यात हात असलेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही, हे कठोर कारवाईतून स्पष्ट व्हावे.

Web Title: article on police