प्रकाश पेरणारा विज्ञानयात्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

द्यापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्ष म्हणून केलेले काम असो, की विज्ञान-तंत्रज्ञान खात्याचे सचिव म्हणून केलेले काम असो, तेथे यशपाल यांच्या कामाचा स्वतंत्र ठसा उमटल्याशिवाय राहिला नाही. "इस्रो'चे माजी संचालक यू. आर. राव यांच्या पाठोपाठ देशाच्या विज्ञान क्षेत्रातील आणखी एक "तारा' यशपाल यांच्या निधनाने निखळला आहे

शास्त्रज्ञांबद्दल जनसामान्यांच्या मनात आदर असतो, मात्र फार जवळीक असते, असे म्हणता येणार नाही. याचे कारण विज्ञान आणि त्यातील संशोधन हा काही आपला विषय नाही, किंवा आपल्या आवाक्‍यातील बाब नाही, असे बऱ्याच जणांना वाटत असते. पण हा दुरावा कमी करण्यात ज्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात मोलाचा वाटा उचलला आणि विज्ञानाची महती लोकांना पटवून दिली, त्यात प्रा. यशपाल यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ग्रहण हा भीतीचा नव्हे तर कुतूहलाचा विषय आहे, हे मनावर बिंबविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. "कंट्रीवाइड क्‍लासरूम' या दूरदर्शनवरील गाजलेल्या शैक्षणिक कार्यक्रमामागे त्यांचीच दृष्टी होती. कार्यक्रमाचे हे नावच त्यांच्या कामाची व्याप्ती आणि स्वरूप स्पष्ट करण्यास पुरेसे आहे.

पदार्थविज्ञानात पीएच.डी. केलेल्या यशपाल यांनी खगोल विज्ञान, अवकाश तंत्रज्ञान या क्षेत्रांत काम केले. "वैश्‍विक किरणे' हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय. "इस्रो'अंतर्गत "स्पेस ऍप्लिकेशन सेंटर'चे संचालक म्हणून काम करताना त्यांनी तरुण संशोधकांची टीम तयार करून दूरनियंत्रित तंत्रज्ञानाचा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यांनी कामाला सुरवात केली तेव्हा त्यात सहभागी असलेल्यांना अमेरिकेला प्रशिक्षणासाठी पाठविण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली. त्यावर त्यांनी तत्काळ दिलेले प्रत्युत्तर मार्मिक होते. ते म्हणाले, "अमेरिकेने गेल्याच वर्षी दूरनियंत्रित उपग्रह अवकाशात पाठविला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या संशोधकांना प्रशिक्षणासाठी कोणत्या देशात पाठविले होते?' या त्यांच्या उत्तरातून भारतीयांविषयीचा आत्मविश्‍वासच प्रकट झाला.

विज्ञानाचा प्रसार, शिक्षणव्यवस्था या विषयांत त्यांनी केलेल्या कामाला देशप्रेम आणि ध्येयवादाची बैठक होती. त्यामुळेच या क्षेत्रांत काही गैरव्यवहार निदर्शनास आले तर ते अस्वस्थ होत. छत्तीसगडमध्ये खासगी विद्यापीठांनी अक्षरशः बाजार मांडला, त्यावेळी त्यांनी न्यायालयात जाऊन त्याविरुद्ध संघर्ष केला. शिक्षणाच्या कप्पेबंद रचनेला विरोध करून समग्र आणि समावेशक शिक्षणपद्धतीचा पुरस्कार त्यांनी केला. विद्यापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्ष म्हणून केलेले काम असो, की विज्ञान-तंत्रज्ञान खात्याचे सचिव म्हणून केलेले काम असो, तेथे यशपाल यांच्या कामाचा स्वतंत्र ठसा उमटल्याशिवाय राहिला नाही. "इस्रो'चे माजी संचालक यू. आर. राव यांच्या पाठोपाठ देशाच्या विज्ञान क्षेत्रातील आणखी एक "तारा' यशपाल यांच्या निधनाने निखळला आहे. समाजात विज्ञानवृत्ती रुजविणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.

Web Title: article regarding professor yashpal