आठवणी 'त्या' क्षणांच्या

डॉ. सपना शर्मा
मंगळवार, 2 मे 2017

पहिल्यांदा तुमच्या जोडीदारानं तुमचा हात हातात घेतला, तो क्षण आठवतो? पहिल्यांदा सायकल विकत घेतली तो क्षण? तुमच्या पहिल्या अपत्याच्या येण्याची चाहूल लागली तो? बाळाला पहिल्यांदा हातात घेतलं, त्याच्या शाळेचा पहिला गणवेश घातला, पहिली नोकरी ते प्रमोशन, मित्रांसोबत विनाकारण खळाळून हसलात, एखाद्या समारंभात नकळत तुम्ही तिच्या खांद्यावर हात ठेवलात... ते सारे क्षण आठवतात? थोडावेळ त्या आठवणींमध्ये रमून जा. कसं वाटलं? ओठांच्या कोपऱ्यावर थोडसं तरी हसू उमटलं ना? एक हलकासा रोमांचक क्षण तुम्ही आत्ताही अनुभवला असेल. नकळत कुठेतरी सुखावला असाल.

पहिल्यांदा तुमच्या जोडीदारानं तुमचा हात हातात घेतला, तो क्षण आठवतो? पहिल्यांदा सायकल विकत घेतली तो क्षण? तुमच्या पहिल्या अपत्याच्या येण्याची चाहूल लागली तो? बाळाला पहिल्यांदा हातात घेतलं, त्याच्या शाळेचा पहिला गणवेश घातला, पहिली नोकरी ते प्रमोशन, मित्रांसोबत विनाकारण खळाळून हसलात, एखाद्या समारंभात नकळत तुम्ही तिच्या खांद्यावर हात ठेवलात... ते सारे क्षण आठवतात? थोडावेळ त्या आठवणींमध्ये रमून जा. कसं वाटलं? ओठांच्या कोपऱ्यावर थोडसं तरी हसू उमटलं ना? एक हलकासा रोमांचक क्षण तुम्ही आत्ताही अनुभवला असेल. नकळत कुठेतरी सुखावला असाल. हीच किमया आहे सुंदर आठवणींची; परंतु बहुतांश वेळा आपण नकारात्मक बाबींमध्ये अडकलेलो असतो. कुणी आपल्याला कसं दुखावलं, आपल्या कुठल्या इच्छा अपूर्ण राहिल्या, दुसऱ्याचं आयुष्य आपल्यापेक्षा किती चांगलं आहे, पैसे नेहमीच कमी पडतात, नवरा वेळ देत नाही, मुलं ऐकत नाहीत, दुसऱ्या मुलांसारखे मार्क आपल्या मुलांना पडत नाहीत... एक ना अनेक.

दुःख आहे ना? नक्कीच आहे; पण आपल्याला चांगले दिवस, सुंदर क्षणही मिळाले आहेत हे आपण हमखास विसरून जातो. कुणी आवर्जून विचारपूस केली, तरी आपली उत्तरे बऱ्याचदा अशी असतात, "ठीक आहे', "चाललंय आयुष्य बस्स... बाकी काय...', "जगतोय बाकी काय...'

आयुष्यातल्या सुंदर क्षणांना आपण इतक्‍या सहजपणे कसे विसरून जातो? त्यांचं काहीच महत्त्व नाही काय? आपण सुखाच्या गोष्टी करतो... आपल्याला दुःख असलं की हमखास आपल्याला सुख नाही म्हणून वाईट वाटतं; परंतु इतके सुंदर क्षण जे आपल्याला जगायला मिळाले, त्यांना काहीच महत्त्व नसल्यासारखे आपण वाळीत टाकतो आणि वाईट आठवणींना उगाळत राहतो, याचं आश्‍चर्य वाटतं.

आठवणींच्या साठ्यांमधून सुंदर, रोमांचक क्षण शोधून काढा. तुम्हाला आश्‍चर्य वाटेल की, जितक्‍या वाईट आठवणी तुमच्याकडे असतील, त्यापेक्षा जास्त सुंदर आठवणी तुमच्याकडे असतील. थोडी मेहनत करावी लागेल. बालपणी शाळेतल्या बागेत खाल्लेला मित्राचा डब्बा आठवा, पहिल्यांदा कुणी आवडलं होतं तो नितांतसुंदर क्षण आठवा, अगदी एकच मिळणारा आईच्या हातच्या बेसनाच्या लाडवाचा गंध आठवा, घरात कुलर नसताना पाण्यात टाकून थंड केलेले चोखायचे आंबेही आठवा...
आयुष्याचे सौंदर्य अनुभवायला खूप पैसा किंवा प्रत्येक बाबतीत उत्कृष्ट दर्जाचे जीवन असणे गरजेचे नाही. कालच्यापेक्षा आज आपल्याकडे सगळेच जास्त आहे, तरीसुद्धा आठवणी नेहमी वाईट अनुभवांवरच जाऊन थांबतात. आपल्याला फक्त मनाच्या या सवयींवर कडक लक्ष ठेवण्याची गरज आहे. कठीण काळ असेल, तरी वाईट अनुभव उगाळून उत्तरे सापडत नाहीत. मग कशीही वेळ असली, तरी एकमेकांसोबतचे चांगले क्षण आठवून, मन ताजेतवाने ठेऊन आयुष्याला सामोरे का जाऊ नये?

Web Title: Article of Sapna Sarma about memories