हौस ऑफ बांबू : आगामी साहित्यातील प्रवाह!

नअस्कार! या असल्या वातावरणात मराठी साहित्याचे भवितव्य काय? या महाचिंतेने मन अगदी काळवंडून गेले आहे. पाहावे तिथे सगळे कसे थंड थंड पडले आहे. ना वाद, ना संमेलनं, ना भांडणं, ना काव्यवाचनाचे कार्यक्रम!
Sahitya Sammelan
Sahitya SammelanSakal

नअस्कार! या असल्या वातावरणात मराठी साहित्याचे भवितव्य काय? या महाचिंतेने मन अगदी काळवंडून गेले आहे. पाहावे तिथे सगळे कसे थंड थंड पडले आहे. ना वाद, ना संमेलनं, ना भांडणं, ना काव्यवाचनाचे कार्यक्रम!

‘मराठी साहित्याचे काय होणार अं?’ हा प्रश्न आम्ही एका सुप्रसिद्ध प्राध्यापक-कम- समीक्षकांना विचारला. ते हल्ली घरीच असतात. (प्राध्यापक आणि त्यातही समीक्षक!)

काही कामच नाही. साहित्य निर्मितीच थंडावल्यावर समीक्षा कशी आणि कशाची करणार? शेतात ऊसच नाही तर गुऱ्हाळ कशाचे लावणार? आलेलिंबूयुक्त उसाचा रस कसा पिणार? पण त्या समीक्षकांची तऱ्हाच वेगळी. त्यांनी उलट विचारले की, ‘का? मराठी साहित्य कुठे अडमिट आहे का?’ मी फोनच ठेवला.

मराठी साहित्याने आजवर अनेक रोगांच्या साथी पाहिल्या आणि पचवल्या आहेत. प्लेग, देवी, कॉलरा, कांजिण्या…कितीतरी साथींनी मराठी साहित्याला आजवर साथ केली. पण सध्याची साथ मात्र काहीच्या काहीच जीवघेणी आहे. यात माझे मराठी साहित्य कसा तग धरणार? हा प्रश्नच आहे. पण… दुनिया भग्न झाली तरी आशेचे पाखरु घिरट्या घालत उडत राहाते, अशी एक इतालियन भाषेतली म्हण आहे. (ती मी मराठीतच वाचली आहे. असो.) त्या म्हणीनुसार माझ्या मनाच्या भग्न अवशेषांवर आशेचा पक्षी हिंडतो आहे. कारण आमचे मराठी साहित्य चिरंजीव आहे, याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही. कुठल्याही व्याधीला आमचे मराठी साहित्य आजवर पुरुन उरले आहे. (पुरुन म्हंजे अक्षरश: पुरुन!) आणि यापुढेही पुरुन उरेल.

उदाहरणार्थ, काही वर्षांपूर्वी ह्रद्रोगावरल्या साहित्याची साथ आली होती, हे आठवतं का? आठवूनही छातीत धडधडतं! हरेक दहा पुस्तकांमागे एक पुस्तक ह्रद्रोगाबद्दल किंवा हृदयविकाराच्या अनुभवाबद्दल असायचे. ‘सेंड मी नो फ्लावर्स’ या नाटकाचे विश्राम बेडेकरांनी ‘वाजे पाऊल अपुले’ हे सुंदर मराठी रुपांतर केले होते, त्याला खूप वर्षं झाली. हे नाटक ‘अंजायना पेक्टोरिस’ या ह्रद्रोगाच्या भोवतीच फिरणारे होते. नंतर काही वर्षे गेली, हृद्रोग अगदीच साक्षात्कारी ठरला. बायपास शस्त्रक्रियेच्या अनुभवावर तर इतकी पुस्तके आली की डॉक्टर आणि पेशंट या दोघांनीही आप्रेशनगणिक एकेक अनुभवाधारित पुस्तक लिहायचा संकल्प सोडला की काय, अशी शंका यावी! इतक्या सटासट पुस्तके आली की विचारु नका. असो. याच सुमारास हृद्रोगासोबत कर्करोगावरले साहित्यदेखील आपली बाजू भक्कमपणाने मांडत होते. पण त्याची आत्ता चर्चा नको.

आता ही कोरोनाची साथ…देवा! मला खात्री आहे, ही मेली कोरोनाची साथ जशी आली तशी तोंड काळं करुन जाणारच! जाणार म्हंजे आपण घालवणारच! पण त्यानंतरचा मराठी साहित्याचा सीन काय असेल? कल्पनेनेदेखील अंगावर काटा येतो. पुढली काही वर्षं ही कोरोनासाहित्याला वाहिलेली असणार, ही काळ्या दगडावरची रेघ! लौकरच कोरोनाकथांचे पीक येणार आहे, हा वैधानिक इशारा इथे आधीच देऊन ठेवत्ये. कोरानाकथा, कोरोना कादंबऱ्या, कोरानाच्या कविता अशा अनेक आकृतीबंधातून आपल्याला बरेच काही वाचायला लागणार आहे. एकंदरित कोरोनासाहित्याचा एक मोठा प्रवाह लौकरच वाहू लागणार आहे. मराठी साहित्याचा पोस्ट कोविड सिंड्रोम म्हंटात तो हाच. त्यासाठी आपणही मन घट्ट केले पाहिजे.

इडा टळो, पीडा टळो, कोरोनाचं तोंड काळं होवो! या महासाथीच्या अनुभवातून मराठी साहित्य तावून सुलाखून सुखरुप बाहेर पडले, म्हंजे मिळवली!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com