भुलनवेल

भुलनवेल

महाराष्ट्रातील ४२ अभयारण्ये बघून त्यावर एक वर्षभरासाठीची मालिका लिहिण्याची जबाबदारी मुंबई आकाशवाणीनं माझ्यावर सोपवली होती. त्यानिमित्तानं आकाशवाणीचे सहकारी आणि मी असे चौघेजण गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागडच्या अभयारण्यात फिरत होतो. आम्ही बांडिया नदी ओलांडली आणि भामरागडचं दाट अभयारण्य सुरू झालं. आतापर्यंत आम्हाला फक्त सागाचं बन दिसलं होतं. पण इथून पुढं छत्तीसगडपर्यंत मिश्र वन आहे. ऐन, अर्जुन, हिरडा, हळदू, तेंदू, गोखरू, कुडा अशी झाडं दिसू लागली. सर्वांत जास्त होती बांबूची बेटं. या बेटांना इकडं रांझी म्हणतात. एका रांझीमध्ये साठ ते सत्तर बांबू असतात. पहिल्या वर्षीचा बांबू कोवळा, बारीक आणि हिरवागार असतो. लवचिक असल्यानं वाकतो. दुसऱ्या वर्षीचा बांबू थोडा जाड असतो. तिसऱ्या वर्षी बांबू तोडतात. आमच्या सोबत गाडीत भामरागडचे फॉरेस्ट अधिकारी आणि फॉरेस्ट गार्ड होता. सगळा कच्चा रस्ता होता. कुठून कुठं जात होतो कळत नव्हतं. एके ठिकाणी खडकाळ रस्ता असल्यामुळं खाली उतरून पायी जावं लागलं. वेळूबनातून जाताना एक नवल दिसलं. बांबूच्या पेरांवर फिकट पिवळसर काटेरी झुबक्‍यासारखी फुलं होती. बांबूची फुलं दिसणं दुर्मिळ गोष्ट आहे. कारण हा फुलोरा दर तीस वर्षांनी येतो. फुलोरा आल्यावर बांबूचं सारं बन मरून जातं. जमिनीवर पडलेल्या बियांतून पुन्हा नवीन बांबू येतो.

आमच्या पुढं वाट दाखवायला फॉरेस्ट गार्ड होता. त्यानं आम्हाला थांबवलं आणि जमिनीवर पसरलेल्या वेलीकडे बोट दाखवून म्हणाला, ‘या वेलीवर पाय देऊ नका. उडी मारून या.’ कारण विचारल्यावर त्यानं जे सांगितलं ते अद्‌भुत होतं. या वेलीवर कुणाचा पाय पडला, तर त्या वेलीतून रासायनिक फवारे निघतात. त्यामुळं माणसाची अवस्था भ्रमिष्टासारखी होते. कुठून आलो, कुठं जायचं कळत नाही. ही अवस्था एक-दीड तास राहते. या वेलीला ‘भुलनवेल’ म्हणतात आणि या भ्रमिष्ट अवस्थेला ‘रानभूल’ म्हणतात. मग मला आठवलं, याला मराठवाड्यात ‘चकवा’ म्हणतात. माझ्या लहानपणी औरंगाबादहून आमच्या सावखेडला बैलगाडीनं जावं लागायचं. आधी बिडकीनला पोचायचं. तिथं संध्याकाळ व्हायची. दशम्या वगैरे खाऊन बैलांना थोडी विश्रांती दिल्यावर सावखेडच्या रस्त्यानं निघायचं. दाट काळोख. गाडीच्या चाकाचा आणि बैलाच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज ऐकत आम्हा मुलांना केव्हा झोप लागे कळायचं नाही. मध्येच केव्हातरी गाडी थांबल्याचं जाणवायचं. बैलांचे सुस्कारे ऐकू येत. सगळे गप्प. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. आईच्या मांडीवरून डोकं वर काढून मी हळूच विचारलं, ‘काय झालं गं आई?’ ‘गप. चकवा लागलाय.’ आई म्हणायची. तिच्या त्या कापऱ्या आवाजानं घाबरल्यासारखं व्हायचं. एक-दीड तास बैलगाडी एका जागी उभी असायची. आम्ही जीव मुठीत धरून अंधारात बघत राहायचो. मग केव्हातरी बैल आपोआप चालू लागायचे. म्हणजे ही भुलनवेल सगळीकडेच आहे. आपल्या आयुष्यातसुद्धा कितीतरी चकवे येतात. त्यांना ओलांडून पुढं जावं लागतं किंवा ती रानभूल संपेपर्यंत शांतपणे वाट बघावी लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com