नाट्य संमेलनाचा ‘सूत्र’पाठ

atul pethe
atul pethe

मराठी नाटक प्रगल्भ होण्याची गरज आहे. २०१८ मध्ये आपण जगतो आहोत. आपल्या प्रश्नांचे स्वरूप दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत आहे. अचानक उद्‌भवणाऱ्या आणि त्वरेने एका क्षणात माध्यमांद्वारे सर्वांपर्यंत पोचणाऱ्या माहितीने मानवी मन थकून जात आहे. तांत्रिक प्रगती अफाट असली, तरी मानसिक प्रगती गतिमान नाही. आपल्या मेंदूत ढवळून निघणाऱ्या विचारांवर मनात चर्चा करायला वेळच नाहीये. त्यामुळे डोक्‍यात वैचारिक कचऱ्याचे ढीग आहेत. या ढिगांमुळे गोंधळ वाढला आहे. वातावरणातील वैचारिक प्रदूषण आपले मनःस्वास्थ्य आणि समाजस्वास्थ्य अधिकाधिक खराब करत आहे. अशा परिस्थितीत कला किंचित आधार देऊ शकते. कलेतून काळाचे आकलन होते. मात्र हे आकलन करून देण्याकरिता साहित्यिक, नाटककार आणि कलाकार अत्यंत प्रगल्भ हवेत. आजच्या काळापुढील आव्हाने आम्हालाच उमगली नाहीत, तर दुसऱ्यांना काय सांगणार आणि दाखवणार?
आजच्या आणि पुढच्या काळातील नाटकापुढे खरा प्रश्न वैचारिक आकलनाचा आहे. प्रश्नांचे वरवरचे आकलन आणि हलकी अभिव्यक्ती नाटक या कलेला तारू शकणार नाही. सखोल वैचारिक जाणिवांची अनुपस्थिती हे आम्हा नाटकवाल्यांपुढील प्रखर आव्हान आहे. त्यातून दिवसेंदिवस भावुक, बेगडी आणि सीरियल छाप अभिव्यक्ती नाटकातून होऊ लागली आहे. प्रेक्षकांनाही तशीच सवय लागली आहे.

१९९०नंतरच्या प्रपाती विस्मयकारक काळाला माझी पिढी धीर धरून आणि नेट लावून सामोरी गेली. आमच्या काळाचा वेध घेण्याचा प्रयत्न आमच्या पिढीने केला हे मी आज नक्की सांगू शकतो. आधीच्या सर्व पिढ्यांपेक्षा ही नाटकेवेगळी होती. ती श्रेष्ठ होती की कनिष्ठ होती हा प्रश्नच माझ्या मते निरर्थक आहे. ‘ठोंब्या, गोळायुग, चौक, सूर्य पाहिलेला माणूस, ते पुढे गेले, सत्यशोधक, उजळल्या दिशा, अधांतर, काय डेंजर वारा सुटलाय, गांधी-आंबेडकर,जय जय रघुवीर समर्थ, साठेचं काय करायचं?, जातककथा, चाहूल, सेलिब्रेशन, कोण म्हणतो टक्का दिला?, ठष्ट, समाजस्वास्थ्य, राहिले दूर घर माझे, शोभायात्रा, गांधी आडवा येतो, पोपटपंची, एक माधवबाग’, ढोलताशे, कोपनहेगन इत्यादी नाटकांतून सामाजिक आणि राजकीय घुसमट नोंदवली गेली आहे. गेल्या २५ वर्षांतील या नाटकांचे मूल्यमापन करण्याची गरज आहे. नाट्य संमेलनाच्या निमित्ताने खरेतर ते करायला हवे. पण ते करणारे सक्षम समीक्षक तरी कुठे आहेत? दशावतार ही कोकणाची फक्त लोककला नसून, मराठी रंगभूमीचा तो चेहराच आहे! सर्व गोष्टींची कमतरता, अभाव आणि अनास्था हे मराठी रंगभूमीच्या त्या चेहऱ्यामागे लपलेले सत्य आहे.

साहित्यसंमेलने अथवा नाट्यसंमेलने व्हायला हरकत नाही; पण त्यातील दर्जाबाबत आपण कायमच निराश असतो. तेच तेच विषय आणि त्याच त्याच चर्चा आपण राणाभीमदेवी थाटात दरवर्षी कुटत बसतो. खरेतर संमेलनाला ‘सूत्र’ हवे. हे सूत्र त्या-त्या वर्षी बुद्धिमान आणि सर्जनशील नाटककार कलाकारांनी एकत्र येऊन ठरवायला हवे. प्रगल्भ नाट्यसंमेलनाध्यक्ष सर्वानुमते निवडला जावा आणि त्याचे ठरवलेल्या सूत्राला धरून परखड विवेचन करून केलेले मूल्यवान भाषण असायला हवे. अशाच विविध विषयांवरील चर्चा, मुलाखती, गप्पा आणि समीक्षा सूत्राला धरून व्हाव्यात. नाटकांची रेलचेल हवी. आपल्या आजूबाजूला आणि जगामध्ये नाटकात कुठले शोध लागत आहेत, याचे दर्शन संमेलनात सहजरीत्या झाले पाहिजे. या कामात तरुण रसरशीत रंगकर्मींचा तिथे भरणा हवा. केरळमधील आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सव मला याबाबत आदर्श वाटतो.

दुर्दैवाने आपल्याकडे अजूनही वयोमान आणि वर्षानुवर्षे केलेले काम हेच अध्यक्ष निवडीमागचे महत्त्वाचे निकष मानले जातात. अशा व्यक्तींचा योग्य तो सन्मान करायला हवाच; पण संमेलनाध्यक्षपद हे ज्या व्यक्तीने रंगभूमीला काही मूल्य प्रदान केले आहे, त्याला दिले जायला हवे की नको? त्या व्यक्तीने रंगभूमीला कोणती दिशा आणि परिमिती दिली याचा हिशेब हवा की नको? हे असे होत नसल्यामुळे संमेलने आणि जत्रा यात फरक राहत नाही. शंभर डेसिबलच्या पुढे वाजवलेले ढोल आणि कधीही न वाचलेल्या पुस्तकांच्या दिंड्या, नाटकाच्या विरलेल्या पताकाच आकाशात फडफडवत राहतात. पण असे असेल तरीही कधीतरी बरे होईल, अशी आशा धरायला काय हरकत आहे? कारण प्रत्येक प्रयोग उत्तम करायला नाट्यकलेत संधी असते!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com