जाति न पुछो साधू की...

जाति न पुछो साधू की...

प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांच्या ‘पाहिजे जातीचे’ या १९८२ साली लिहिलेल्या नाटकाच्या हिंदी रूपांतराचा ''जात ही पुछो साधू की'' तसेच आणि ''बेशर्ममेव जयते'' हे दोन प्रयोग मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथे बंद पाडण्याच्या कृत्याचा तीव्र विषाद वाटतो. बंदीचे कारण काय तर, या नाटकांमुळे हिंदू संस्कृती आणि धर्मावर यामुळे हल्ला होतोय. यावर रागवावे, ओरडावे की रडावे हे कळत नाही अशी स्थिती झाली आहे. या सगळ्या प्रकारात घासून गुळगुळीत झालेले काही शब्द पुन्हापुन्हा समोर येत आहेत. उदाहरणार्थ,  धर्मावरचा हल्ला, संस्कृतीवर आघात, दुखावलेल्या अस्मिता, देवादिकांची चेष्टा, इत्यादी. नाट्य रूपांतराच्या शीर्षकातील ज्या ‘साधू’ शब्दावरून गदारोळ होत आहे, ते शीर्षक कबीराच्या दोह्यावरून घेतलेले आहे. मूळ दोहा असा आहे - 
जाति न पुछो साधू की, 
पूछ लिजिए ज्ञान 
मोल करो तरवार का 
पडा रहेन दो म्यान ।।

इथे नाटकाच्या नावात डॉ. वसंत देवांनी रूपांतर करताना तो ''जात ही पुछो साधू की'' असे केले आहे. याला कारण नाटकाचा विषय तसा आहे. आपल्याकडे हे नाटक नाना पाटेकरांच्या अभिनयाने गाजले होते. शिक्षणव्यवस्था आणि भ्रष्टाचार यावर तिरकस भाष्य करणारे हे नाटक खूप मजेदार आहे. त्याचे हिंदीतही शेकडो प्रयोग या आधी झालेले आहेत. महाराष्ट्रात नाटक सेन्सॉरसंमत करावे लागते. त्यामुळे हा विषय आणि नाटकाचे नाव सरकारने मान्य केलेले होते. मग असे असताना आज २०२१ मध्ये ते अचानक हिंदू संस्कृतीविरोधी कसे झाले ? या प्रश्नावर एक उत्तर असे आहे की झुंडशाहीने काही लोकांवर दहशत बसवायची. ही काही लोक कलाकार आणि साहित्यिक असतील तर फारच सोपे जाते.  समाजातील हे घटक तसे दुर्बळ असतात. त्यांना कोणी वाली नाही. शिवाय त्यांच्यावर हल्ला केल्याने प्रसिद्धी भरपूर मिळते. थोडक्यात कोणीही यावे आणि टपली मारून जावे !

वस्तुतः केंद्र सरकार व मध्य प्रदेश सरकार या दोन्ही व्यवस्थांनी तिथल्या कलाकारांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते. पण तसे घडले नाही. खरेतर तिथेच काय पण तसे ते कुठेच घडत नाही. काळ कुठलाही असो घडते असेच ! आम्हा कलाकारांकडे अथवा साहित्यिकांकडे कोणत्याही अर्थाने राजकीय बळ नसते. बहुतांश वेळा आमचे म्हणणे वैचारिक आणि कलात्मक असते. जगताना जाणवलेले सत्य आणि रहस्ये कलेतून मांडणे हे काम कलाकार करू पाहतात. याकरता ते सहज, गंभीर, गंमतीदार, उपरोधी तर कधी क्रोधपूर्ण  शैली वापरतात. आपली कला लोकांनी पाहावी आणि त्यावर विचार करावा असे कलाकारांना वाटत असते. पण अनेकदा घडते उलटेच ! पाहणाऱ्यांचे अहंकार आणि आजच्या काळातील शब्द ''अस्मिता'' लगेच दुखावल्या जातात. मग असा दंगा घातला जातो. त्यातून राजकीय फायदा मिळतो. या विचित्र परिस्थितीला आम्ही कलाकार असहाय्य अवस्थेत कसेबसे तोंड देत उभे राहायचा प्रयत्न करतो.  नाट्य, साहित्य, चित्रपट अशा गोष्टींना वेठीस धरून मग छोट्या संघटना स्वतःचे ‘उपद्रव मूल्य’ वाढवतात. त्यातून त्यांची ''संस्कृती रक्षक दुकाने'' लागतात. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या काही काळात अस्मिता दुखावण्याचे वेगवेगळे आविष्कार आपण पाहात आहोत. त्यात जातपात, धर्म, सीमा आणि भाषा यांच्या अनाठायी अहंकाराने अक्षरशः उच्छाद मांडला आहे. वेष आणि आहार यावरूनही लोकांची मने दुखावली जाऊ लागली आहेत. आपल्याला संवादातील विनोदी वाक्ये, उपहासात्मक वाक्ये, वक्रोक्ती अशा गोष्टी कळेनाशा झाल्या आहेत. मने भडकावली जात आहेत, विचार करणे सोडून दिले आहे आणि विवेकाला तिलांजली दिली आहे. यातून दिसतो तो फक्त दिशाहीन  उन्माद !  हा मानसिक आजाराचाच एक प्रकार आहे. आपण सारे या आजाराचे बळी होत चाललो आहोत. 

जरा विचार करा की शब्दाशब्दावरून ''सेन्सॉरशिप'' लादली तर कबीर, तुकाराम, चोखामेळा, गालिब यांचे काय होईल ? तुकाराममहाराजांच्या धाकट्या भावाने कान्होबाने भावाच्या वियोगाने अभंग लिहिले. त्यात प्रत्यक्ष पांडुरंगाला खडसावले आहे. इतकेच काय पण ''धिंद धिंद तुझ्या करीन चिंधड्या'' हा दम दिला आहे. हे सारे अतिशय व्याकुळ आहे पण त्याचा अर्थ न उमगता फक्त इतक्याच वाक्यावरून पाहिले तर काय होईल ?   देवाला, धर्माला, समाजाला प्रश्न विचारायचे नाहीत तर काय करावे ? होत असलेला अन्याय सहन करत जगावे काय ? विचार करण्याची बुद्धी नष्ट करावी काय ? अभंग रचणे, नाटक करणे, कादंबरी लिहिणे, कविता म्हणणे अथवा चित्रपट बनवणे या सभ्यपणे प्रश्न करण्याच्या जागा नाहीत काय ? 

सेन्सॉरशिप कशाला?
कुठल्याही सेन्सॉरशिपमध्ये प्रश्न तर सुटत नाहीतच, पण ज्ञानप्रक्रिया बंद होते. वस्तुतः एखादी गोष्ट पटली नाही, तर त्याला विरोध करण्याचे सर्व मार्ग आपल्याला घटनेने दिलेले आहेत. साहित्य, नाट्य वा कलाकृती आवडली नाही तर त्यावर टीका करण्याचा,  त्रुटी दाखवून देण्याचा, प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहेच की !  (र.धों. कर्व्यांवर खटले नाही का भरले? ) थोडक्यात तुम्ही तुमचे म्हणणे कोणत्या ना कोणत्या मार्गाने मांडू शकता. मात्र दुसऱ्यावर बळाचा वापर करून तोंड बंद करणे ही कृती निषेधार्ह आहे. बोलू नका, ऐकू नका, वाचू नका, असे सांगणारी ही मधली दंगेबाज व्यवस्था नेमकी कोण असते ? त्यांच्या हातात हे  ''नायकत्वा''चे अधिकार कोण देते ? माझ्या खांद्यावर माझे डोके आणि त्या डोक्यात विचार करण्याची यंत्रणा शाबूत असताना, आपण न निवडलेली ही माणसे नसते उपद्व्याप का करीत असतात? 

जिथे मला विचार करण्याचा, त्यातून निर्माण झालेले प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, अशी समाजव्यवस्था खरे तर निरोगी असते. परंतु जेव्हा त्यालाच पायबंद घालण्याच्या रोगट अवस्थेकडे समाज जाऊ लागतो, तेव्हा ही घसरण रोखण्यासाठी सर्वांनीच चिंतन करण्याची गरज आहे, असे मला वाटते. आम्ही करीत असलेले नाटक एखाद्या समाजयंत्रणेसाठी भीतिदायक वाटावे, असे खरोखर असते का ? शेवटी नम्रपणे इतकेच म्हणतो की आम्हा कलाकारांचा सर्व रोख हा ‘विश्वाचे आर्त’ काय आहे, हे पाहण्याकडे असतो. हात जोडून विनंती की आपल्या हृदयातील प्रेम मरू देऊ नका !

(लेखक नाटककार आहेत.)

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com