एकच ध्येय ‘शून्य दुखापत’...

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने आजपासून (ता.४) सुरू होणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षितता दिनानिमित्ताने यावर्षी दिलेले घोषवाक्य आहे- आपले ध्येय- शून्य दुखापत! हे ध्येय जीवनात निरंतर आचरणात आणण्याची गरज आहे.
national security conference
national security conferencesakal
Summary

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने आजपासून (ता.४) सुरू होणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षितता दिनानिमित्ताने यावर्षी दिलेले घोषवाक्य आहे- आपले ध्येय- शून्य दुखापत! हे ध्येय जीवनात निरंतर आचरणात आणण्याची गरज आहे.

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने आजपासून (ता.४) सुरू होणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षितता दिनानिमित्ताने यावर्षी दिलेले घोषवाक्य आहे- आपले ध्येय- शून्य दुखापत! हे ध्येय जीवनात निरंतर आचरणात आणण्याची गरज आहे. तसे झाल्यास जीवित हानीसह विविध आघाड्यांवरील नुकसान टाळता येईल.

देशभर आजचा (ता. ४) दिवस राष्ट्रीय सुरक्षितता दिन म्हणून साजरा होतो. यानिमित्ताने विविध आस्थापनांमध्ये राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह पाळला जातो. राष्ट्रीय सुरक्षा परिषद उर्फ नॅशनल सेफ्टी कौन्सिलतर्फे, या निमित्ताने सुरक्षिततेसंबंधी दरवर्षी एक विषय जाहीर केला जातो. तो डोळ्यासमोर ठेऊन आस्थापने सुरक्षा सप्ताहात त्याला प्राधान्य देतात. या विषयाबाबत जनजागृतीसाठी कर्मचाऱ्यांमध्ये निबंध, घोषावाक्य, रॅपिड फायर प्रश्नमंजुषा, भित्तीपत्र उर्फ पोस्टर यांच्या स्पर्धा घेतात. याबरोबरच सुरक्षितता उपकरणे, सुरक्षितता पद्धती, त्याबाबतचे नियम, कायदेकानून यासंबंधी प्रदर्शन, चर्चासत्र, तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्यानेही घेतात.

यावर्षी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने दिलेले घोषवाक्य आहे- आपले ध्येय- शून्य दुखापत! याचा अर्थ आस्थापनेतील कोणालाही इजा होऊ न देणे, हेच सर्वांचे ध्येय आहे. त्याची कार्यवाही त्या आस्थापनांसह त्यांच्या गावात, मोठ्या आस्थापनांच्या परदेशातील शाखा अथवा सेवाकेंद्रे, कार्यालये, गोदामे इत्यादी ठिकाणी करता येते. जेथे कायमस्वरूपी अथवा हंगामी कर्मचारी काम करतात, काही हितसंबंधी व्यक्ती, कारणपरत्वे तिथे येत-जात असतात, त्या परिसरातील निसर्गातही त्याची कार्यवाही करता येईल. या सर्वांवर आस्थापनांच्या ध्येयधोरणांचा, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ‘आपले’ याचा अर्थ त्या आस्थापनांचा संपूर्ण विस्तार, त्यातील कर्मचारी आणि हितसंबंधी, याचबरोबर भवतालचा निसर्ग आणि पशुपक्षी असा घ्यावा.

ध्येयाबाबतही त्या आस्थापनांना आपण आणि आपले कर्मचारी यांची सुरक्षितताविषयक काळजी घेण्यासाठी ठरविलेली बाब अथवा गोष्ट इतकाच घेऊन उपयोग नाही, तर ते ध्येय आधी सांगितल्याप्रमाणे सर्वसमावेशक असावे. शून्याचा अर्थ अतिशय स्पष्ट असल्याने त्याचा विस्तार करण्याची आवश्यकता नाही. दुखापत ही अपघातामुळेच होते. अपघात म्हणजे एक अनियोजित घटना, जिच्यामुळे इजा अथवा दुखापत होते. इजेमध्ये कापणे, भाजणे, मोठी जखम होणे, स्नायू मुरगळणे, वस्तू अथवा मोठा बोजा अंगावर पडणे, तीक्ष्ण वस्तू शरीरात घुसणे याबरोबरच रस्त्यावरील वाहतूक विषयक अपघात असे अनेक प्रकार येतात. कोणताही अपघात टाळण्यासाठी सुरक्षितता आवश्यक असते.

सहसा सुरक्षितता या शब्दाचा अर्थ कोणतीही शारीरिक दुखापत न होणे असा घेतला जातो. परंतु ‘आपले ध्येय- शून्य दुखापत’ ही देशव्यापी संकल्पना आहे. त्यामुळे फक्त वैयक्तिक विचार न करता, सुरक्षिततेची व्याख्या उत्पादन आणि सेवा या दोन्हींचा अंतर्भाव असलेल्या औद्योगिक विश्वाशी संपूर्णपणे जोडून घेऊन थोडी विस्तृत करूया. सुरक्षितता म्हणजे, आपण स्वत: म्हणजे मानव, निसर्ग, वनस्पती, पशू-पक्षी, कारखान्यातील मशिन्स आणि संबंधित उपकरणे, सेवा आणि उत्पादन पद्धती, कच्चा माल, सर्व प्रकारचे फर्निचर, विद्युत पुरवठा यंत्रणा व उपकरणे, कारखान्याचा आराखडा किंवा लेआऊट, जमीन, मालवाहतूक यंत्रणा, रस्ते व वाहतूक आणि कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त आस्थापनांशी निरनिराळ्या कारणांनी संबंधित प्राणी, व्यक्ती आणि शेवटी निसर्ग या सर्वांचेच स्वास्थ्य होय.

आपल्याला जर शून्य अपघाताकडे जायचे असेल, तर यातील प्रत्येक गोष्टीचा गांभीर्याने विचार करून, त्या पूर्णपणे टाळण्यासाठी आदर्श सुरक्षितता संस्कृती उभारायला हवी. ती कशी उभारता येईल ते बघूया! प्रत्येक स्तरावरील कर्मचाऱ्याची मानसिकता सर्वसाधारणपणे, ‘मी बरा आणि माझं काम बरं’ अशी असल्यानं इतरांची सुरक्षितता आणि बाकीच्या सर्व गोष्टी, आस्थापनेची जबाबदारी आहे, असं त्याला वाटत असतं. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.

त्यासाठी सुरक्षितता ही वैयक्तिक संकल्पना नसून, सामुहिक किंबहुना देशव्यापी संकल्पना आहे, हे त्याला समुपदेशनानं पटवून द्यावं लागेल. ते केवळ मौखिक स्वरूपात मर्यादित न ठेवता त्याच्या आजूबाजूला सुरक्षितताविषयक भित्तीपत्रे लावणं, त्याला सुरक्षितता विषयक पद्धती, उपकरणे यांची माहिती देणे, व्हिडिओ किंवा क्लिप दाखवणं, त्याबाबत चर्चासत्रे घेणे, सुरक्षितताविषयक चांगली कामगिरी करणाऱ्यांचा गुणगौरव करणं, इतर आस्थापनांमध्ये चांगल्या गोष्टींची माहिती देणं वगैरे गोष्टींचा अंतर्भाव असावा.

सुरक्षितता संस्कृती टिकवण्यासाठी

१) सततची जागरूकता आणि सुधारणा : एखाद्या वर्षी सुरक्षिततेबाबत सरस कामगिरी केली तरी तेवढ्यापुरतेच न थांबता, ती निरंतर चालणारी प्रक्रिया असे स्पष्ट करून ती जीवनशैली होण्यासाठी प्रयत्नशील राहावं, त्यासाठी सतत जागरूकही राहावं. याबरोबरच दैनंदिन कार्यपद्धतीपेक्षा अधिक चांगली, सुरक्षित पद्धती, उपकरण व तंत्रज्ञानाचा विकास, डिझाईन, हाताळणी, उत्पादनास सहाय्यक पदार्थ अथवा यंत्रणा, वाहतूक पद्धती वगैरे कुठे अस्तित्वात आहे का? याचा मागोवा घेणे.

२) प्रचार आणि प्रसार : प्रत्येक आस्थापनांमध्ये जुने कर्मचारी निवृत्त होणं, नवीन भरती होणं, बदल्या वगैरे सतत चालू असतं. अशा वेळी नवोदितांना सुरक्षाविषयक पूर्ण माहिती देऊन त्यांचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी सुरक्षिततेचा प्रचार आणि प्रसार सतत चालू ठेवावा.

३) बदलांना सामोरे जाणे : औद्योगिक जगतात प्रत्येक बाबतीत सतत बदल होत असतात. याबरोबरच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही कायदेकानून, तंत्रज्ञान, मानके यात बदल होतात. अशावेळी त्यांचा त्वरीत मागोवा घेऊन आपल्या आस्थापनांना त्यानुकूल बनविणे आवश्यक असते. या सर्व गोष्टींचा अभ्यास आणि कृती करून आपण निश्‍चितच आदर्श सुरक्षितता संस्कृतीपर्यंत पोहोचू शकतो. मग शून्य दुखापत हे ध्येय गाठणे अशक्य नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com