Ambedkar Jayanti : भीमरावांच्या भेटीत सयाजीरावांनी ओळखलं आपण उद्याचा विद्वान समाजसुधारक घडवत आहोत

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रज्ञावंत समाजशिल्पशास्त्रज्ञ सयाजीराव गायकवाड यांचे नाते ऋणानुबंधाचे होते.
Sayajirao Gaikwad and Dr Babasaheb Ambedkar
Sayajirao Gaikwad and Dr Babasaheb AmbedkarSakal
Summary

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रज्ञावंत समाजशिल्पशास्त्रज्ञ सयाजीराव गायकवाड यांचे नाते ऋणानुबंधाचे होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रज्ञावंत समाजशिल्पशास्त्रज्ञ सयाजीराव गायकवाड यांचे नाते ऋणानुबंधाचे होते. या दोन्ही युगपुरुषांनी जनकल्याण आणि राजकर्तव्याच्या जबाबदारीने संकटांवर हिमतीने तोंड दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सयाजीराव यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधांविषयी...

गेल्या शतकात अनेक दूरदृष्टी समाजपुरुषांनी महाराष्ट्राची जडणघडण करण्यात मोलाचे काम केले. यात म. फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे. त्यासोबतच महाराष्ट्रच नव्हे, तर भारताच्या शिक्षण, सुप्रशासन, समाजसुधारणा, शेती-उद्योग, दातृत्व, सर्वधर्मसमभाव, साहित्य-कला-संस्कृतीचे आधारवड अन्‌ स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे असलेले सयाजीराव गायकवाड एक सार्वभौम राजा होते. हुशार, मेहनती राजाने शिक्षणाची ताकद ओळखली. शिक्षण हेच प्रगती, परिवर्तनाचा मार्ग आहे. ते रयतेचे देणे, राजकर्तव्य आहे, हे सयाजीरावांनी ओळखले. अठराव्या वर्षी राज्य कारभार हाती आला.

राज्यातील अस्पृश्य व आदिवासींची अवस्था बघून १८८२ मध्ये हुकूम काढला. या वर्गासाठी सरकारी खर्चाने शिक्षण सुरू केले. या देशातील हा महत्त्वाचा समाजक्रांतीचा निर्णय होता. काही वर्षांनी १८९२ मध्ये सर्वांसाठी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. महात्मा फुले वंचित समाजाला अगोदर शिकवा ही मागणी करत असताना, त्याच वर्षी सयाजीरावांनी कायदा करून समाजकर्तव्याची सुरुवात केली. समाजातील सर्वांसाठी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, समाजकार्यासाठी मदत, साहित्यिक, कलावंत, प्रशासक यांना मदतीचा हात महाराजांनी पुढे केला. ग्रंथप्रेमी प्रज्ञावंत राजाने उभ्या आयुष्यात सहा हजारांहून अधिक ग्रंथ प्रकाशनास मदत केली. यात एक बुद्धिवंत ग्रंथप्रेमी होते- ते म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर.

भीमराव या हुशार मुलाची ओळख केळूसकर गुरुजींशी झाली. बालपणापासून वेगळे काही करायचे हे स्वप्न भीमराव बघत होते. दामोदर यंदेंच्या मदतीने या मुलास गुरुजी सयाजीराव गायकवाड यांच्याकडे घेऊन गेले. भीमराव आंबेडकर यांना कॉलेज शिक्षणासाठी तीन वर्षे, पुढे अमेरिकेतील उच्चशिक्षणासाठी दोन वर्षे आणि लंडन येथील शिक्षणासाठी आणखी दोन वर्षे, अशी सात वर्षांची शिष्यवृत्ती टप्प्याटप्प्याने मिळत गेली.

भीमरावांच्या भेटीतून सयाजीरावांनी ओळखले, की आपण या विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती देत आहोत, त्यातून उद्याचा विद्वान, समाजसुधारक घडणार आहे. महाराजांचे हे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केले. कोलंबिया विद्यापीठातून एम.ए. आणि पीएच.डी. मिळवली. बडोदा नोकरीत त्यांना थोडा त्रास झाला. महाराजांनी कनिष्ठ वर्गाचा अधिकारी आपल्या डोक्यावर नेमला, ही काही मंडळींची तक्रार होती. तरीही महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना सल्ला दिला, मी अस्पृश्य निवारणासाठी कायदा केला; पण अशा सामाजिक सुधारणा स्वीकारायला, सगळ्यांकडून थोडा वेळ लागणार आहे.

ज्या काळात बाबासाहेब आंबेडकर बडोद्यात नोकरी करीत होते, त्याच काळात सयाजीरावही काही संकटांना तोंड देत होते. त्यांची प्रकृतीही साथ देत नव्हती. बाबासाहेब आंबेडकर यांना शिष्यवृत्ती देताना बडोदा करारात हमीपत्र नसताना सूट दिली. कालांतराने महाराजांनी आंबेडकरांना परदेश शिक्षणासाठी पाठवले.

बाबासाहेब करीत असलेल्या समाजकर्तव्याचे वृत्तांत सयाजीरावांना कळत होते. त्यामुळे महाराजांना समाधान वाटत होते. १९३१ मध्ये लंडन येथील गोलमेज परिषदेतील आंबेडकरांचे अभ्यासपूर्ण भाषण ऐकून सयाजीरावांना खूप आनंद झाला. एका हॉटेलमध्ये आंबेडकरांना पार्टी दिली. कौतुक केले. १५० पौंडांची पुन्हा मदत केली. आपण केलेल्या शिक्षण शिष्यवृत्तीतून शिकून बाबासाहेब आंबेडकर आज समाजासाठी नव्हे, तर या देशातील वंचित वर्गासाठी जे राष्ट्रकर्तव्य करत आहे, याबद्दल अनेक भाषणांतून सयाजीरावांनी पुढे वेळोवेळी उल्लेख केला.

१९३४ मध्ये शिकागो जागतिक सर्वधर्म परिषदेचे सयाजीराव अध्यक्ष होते. मागासवर्गीय लोकांना सर्वांसोबत स्थान मिळावे, हे मत त्यांनी आग्रहाने मांडले. १९३९ मध्ये महाराजा सयाजीराव यांचे निधन झाले. त्या वेळी बाबासाहेब आंबेडकर यांनी ११ फेब्रुवारी १९३० च्या ‘जनता’मध्ये लिहिले, ‘श्री. सयाजीराव महाराजांचे निधन ही माझी वैयक्तिक फार मोठी हानी झाली आहे. त्यांचे उपकार मी केव्हाही विसरणार नाही. मला त्यांनी जे शिक्षण दिले, त्यामुळेच आजची योग्यता मला प्राप्त झाली. अस्पृश्य जातींवर त्यांचे फार मोठे उपकार झाले आहेत.

त्यांच्याइतके अस्पृश्य जातीसाठी दुसऱ्या कोणीही कार्य केले नाही. ते मोठे समाजसुधारक होते व बडोदे संस्थानात सामाजिक सुधारणांविषयी जे कायदे करण्यात आले, ते युरोप व अमेरिकेतील कोणत्याही सुधारलेल्या राष्ट्राच्या तद्विषयक कायद्यापेक्षा पुढारलेले आहेत. ते राष्ट्रीय वृत्तीचे असून, देशभक्त होते. हा सद्‍गुण संस्थानिकांत क्वचितच दिसून येतो. सयाजीराव महाराजांच्या मृत्यूने हिंदुस्थानातील एक फार मोठा मनुष्य नाहीसा झाला व बडोदे संस्थान फार मोठ्या राजकर्त्याला मुकले. महाराष्ट्रातील एक विभूती नाहीशी झाली. सामाजिक सुधारणांचा पुढारी नाहीसा झाला. अस्पृश्यांचा एकमेव कैवारी गेला, संस्थानिकांतील द्रष्टा गमावला.’

सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीचे क्रांतिकारी योगदान भीमराव यांनी कबूल केले. पुढे काही वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराजांचे नातू प्रतापसिंह यांना १० ऑक्टोबर १९५० रोजी पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी सयाजीराव महाराजांचे चरित्र लिहिण्याची इच्छा व्यक्त केली, त्यात ते म्हणाले, ‘महाराज माझे आश्रयदाते आहेत.’

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा आणि प्रज्ञावंत समाजशिल्पशास्त्रज्ञ सयाजीराव या युगपुरुषांच्या संबंधाने हा अल्पसा इतिहास सांगावा वाटला. डॉ. आंबेडकर आणि महाराजा सयाजीराव यांच्या आयुष्यात अनेक संकटांनी त्यांची परीक्षाच पाहिली; पण या दोन्ही युगपुरुषांनी जनकल्याण आणि राजकर्तव्याच्या जबाबदारीने या संकटांवर हिमतीने तोंड दिले. या दोघांचे आपापल्या क्षेत्रातील कार्य हे समाजोन्नतीचाच ध्यास याच ध्येयाने भरलेले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com