मोसूलमधला संघर्ष

डॉ. अशोक मोडक
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

इराक देशात मोसूलनामक शहरात 17 ऑक्‍टोबरपासून भीषण धुमश्‍चक्री सुरू आहे. याच शहरात अबू बक्र अल्‌ बगदादी नामक जहाल मुस्लिम नेत्याने खिलाफत साम्राज्याची घोषणा केली. सव्वा दोन वर्षांपूर्वी जून 2014 मध्ये याच शहरात इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या संघटनेने विरोधकांना पळवून लावून शरीयतची स्थापना केली. आज तरी या संघटनेने जगाच्या वेगवेगळ्या विभागांतून दहशतवाद माजविण्यासाठी आपल्या शाखांचे जाळे विणले आहे व म्हणूनच जगातल्या विविध शक्ती एकत्र येऊन या दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या इस्लामिक स्टेटला नामोहरम करण्याच्या जिद्दीने कार्यरत झाल्या आहेत. विस्मयाची गोष्ट म्हणजे इस्लामिक स्टेट मात्र चिवटपणे सर्व आघात झेलून आपल्या कटकारस्थानांमधे मश्‍गूल आहे. या इस्लामिक स्टेटने मुख्यतः पर्शियन आखातापासून ते भूमध्य समुद्रापर्यंत जी सुन्नी मुस्लिम राष्ट्रे वसलेली आहेत, त्यांनाच वेठीस धरले आहे. या सुन्नी पंथीय मुस्लिम राष्ट्रांची खऱ्या अर्थाने कोंडी झाली आहे. सीरिया देशात शिया पंथाचा एक छोटा उपपंथ (अलावी नामक) बशर अल्‌ असद या अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली राज्यकारभार करीत आहे. इराणमध्ये तर शियापंथीयच वर्चस्व गाजवीत आहेत. इराकमध्येही शियापंथीय पुरेसे प्रभावी आहेत. इस्राईलमध्ये ज्यूंनी मजबूत गड उभा केला आहे. युनायटेड अरब एमिरेट्‌स नामक देशात सुन्नींचे शासन आहे हे खरे आहे; पण शियापंथीय इराणने या शासनाला पांथिक आव्हान दिले आहे, तर अमेरिकेनेही स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी देशोदेशी हस्तक्षेप करण्याचे धोरण संपुष्टात आणले आहे. तात्पर्य, युनायटेड अरब एमिरेट्‌स हा देशही निराधार झाला आहे.

या सुन्नी मुस्लिमांची व्यथा अशी, की इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया ही संघटनाच त्यांच्या मुळावर उठली आहे. "कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ' ही म्हण या संदर्भात सर्वार्थाने खरी ठरली आहे. ज्या मोसूल शहरात ख्रिश्‍चन बहुसंख्य आहेत, त्याच शहराच्या विध्वंसासाठी इस्लामिक स्टेट संघटना सिद्ध झाली आहे, तर या शहराच्या व शहरातल्या ख्रिश्‍चन पंथीयांच्या रक्षणासाठी सारे सुन्नी पंथीय देश एकवटलेले आहेत. इराणचे शिया पंथीय तर सौदी अरेबियासारख्या कट्टर सुन्नी पंथीयांशी प्रसंगी हातमिळवणी करण्यास आसुसले आहेत. अर्थात, इस्लामिक स्टेट हा समान शत्रू कसा गाडायचा, या चिंतेपोटीच शिया व सुन्नी एका राहुटीत एकत्र आले आहेत. सन 2003 मध्ये अमेरिकेकडून इराकमध्ये सैनिकी हस्तक्षेप झाला, तेव्हा ज्या सुन्नी पंथीय राष्ट्रांनी अमेरिकेच्या विरोधात रान पेटविले होते, तेच पंथोपपंथ व त्यांची राष्ट्रे वर्तमानात अमेरिकन सैन्याला पाचारण करीत आहेत... "या आणि इस्लामिक स्टेटला धूळ चारा!'
इस्लामिक स्टेटने इराक व सीरिया या देशांना जोडणाऱ्या क्षेत्रात तमाम काफीर मंडळींच्या कत्तली चालविल्या आहेत; मुख्यतः ख्रिश्‍चन पंथीयांचा सर्वतोपरी छळ आरंभिला आहे. या ख्रिश्‍चनांच्या कोवळ्या मुलामुलींनी मानवी साखळी उभी करून मोसूलचे रक्षण करावे, अशी व्यूहरचना या दहशतवादी संघटनेने राबवली आहे व अशा मानवी साखळीमुळे सुन्नी, शिया, तसेच अमेरिकी अडचणीत आले आहेत... मोसूल शहरात घुसून इस्लामिक स्टेटला धूळ चारायची असेल तर मानवी साखळीच्या दुव्यांना म्हणजेच निष्पाप ख्रिश्‍चनांना ठेचावे लागेल. या साखळीला धक्का लावायचा नाही असे ठरविले, तर इस्लामिक स्टेटला जीवदान मिळेल!
एक जिहादी संघटना सगळ्या जगाला भयभीत करू शकते, कारण "अल्लासाठी; शरीयतसाठी' खुदकशी करण्यास या संघटनेचे घटक सिद्ध आहेत. त्यांना कुठलाही विधिनिषेध नाही, कसलेच सोयरसुतक नाही. उलटपक्षी या संघटनेला पराभूत करून मोसूल मुक्त करायचे या जिद्दीने ज्या शक्ती एकवटल्या आहेत, त्यांना उभयापत्तीस तोंड द्यावे लागत आहे. "इसिस'ला पराभूत करण्यासाठी मोर्चेबांधणी तर झाली आहे; पण जवळपासचे एखादे खेडे जिंकून मोसूलच्या दिशेने काही मुसंडी मारण्यात यश आले, तर इस्लामिक स्टेटच्या चिवट प्रतिकारामुळे दुसऱ्या दिवशी ते खेडे सोडून द्यावे लागते, माघार घ्यावी लागते, अशी विचित्र अवस्था इस्लामिक स्टेटच्या विरोधकांना अनुभवावी लागते, ही शोकांतिका आहे.
इस्लामिक स्टेटच्या विरोधकांमध्ये स्थायी ऐक्‍य नाही व या परिस्थितीत अशा दहशतवादी संघटनेला कसे हरवायचे हा प्रश्‍न जटिल बनला आहे. शिया व सुन्नी यांच्यात मनोमिलन नाही, तुर्कस्तान इस्लामिक स्टेटच्या विरोधात आहे; पण दक्षिणेचे कुर्द लोक उद्या तुर्कस्तानची फाळणी करतील; कुर्दिस्तानची मागणी करतील, या भयाने तुर्कस्तान कासावीस आहे; दहशतवादी संघटनेच्या विरोधात तूर्त एकवटलेल्या साऱ्या मंडळींना, उद्या अमेरिकाच पुन्हा आपल्या शिरावर स्वार होईल ही काळजी छळत आहे. अशा फाटाफुटीचा फायदा इस्लामिक स्टेटला मिळतोय.
या अशा पृष्ठभूमीवर मध्य आशियात पूरगाणा------ खोऱ्यात वसलेल्या पाचही मुस्लिम राष्ट्रांनी स्वीकारलेले मॉडेल मोसूलच्या संघर्षात आकर्षक ठरले आहे. कोणत्याही पंथाने आपले रीतिरिवाज इतरांवर लादायचे नाहीत, जो कुणी त्याच्या मर्जीनुसार अल्लाची उपासना करीत असेल, त्याला त्या उपासनेचे स्वातंत्र्य भोगू द्यायचे, सर्वपंथ समभाव शिरोधार्य मानायचा... असा पारदर्शक सेक्‍युलॅरिझम हाच खरा तोडगा आहे. नजीकच्या भविष्यकाळात मोसूल मुक्त होईल, इस्लामिक स्टेटला तिथून माघार घ्यावी लागेल; पण त्या शहरातून परागंदा झालेल्या ख्रिश्‍चन निर्वासितांना पुन्हा त्या शहरात परतण्याची सुसंधी मिळेल का? आज शिया व सुन्नी एकत्र आले आहेत, उद्याही हे एकत्रीकरण आणखी बहरेल का? भूमध्य महासागरापासून पर्शियन आखातापर्यंत व थेट अफगाणिस्तान - पाकिस्तानपर्यंत खरा सेक्‍युलॅरिझम रुजेल का? हे कळीचे प्रश्‍न आहेत... भविष्यात या प्रश्‍नांचे समाधानकारक निराकरण झाले तरच संघर्ष संपला व उत्कर्ष सुरू झाला असे म्हणता येईल.

Web Title: battle in mosul

टॅग्स