महामार्गाचा महाप्रश्‍न! (मर्म)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

प्रदीर्घ काळ रखडलेली कोकण रेल्वे सुरू झाल्यानंतर या महामार्गावरील रहदारी काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अनेक कारणांमुळे ती फोल ठरली आणि या महामार्गावरील गर्दी वाढतच गेली.

मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मुंबईच्या विलेपार्ल्यातील सात तरुणांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे केवळ राज्यातच नव्हे, तर देशभरात लोकप्रिय असलेल्या या महामार्गाकडे सरकार किती वर्षे आणि कसे दुर्लक्ष करत आहे, यावर झगझगीत प्रकाश पडला आहे. गोवा हे देशभरातीलच नव्हे, तर परदेशी पर्यटकांसाठीही कमालीचे आकर्षक असलेले राज्य आहे. त्याशिवाय मुंबई-गोवा मार्गावर असलेल्या कोकणच्या नयनरम्य किनारपट्टीमुळे या महामार्गावर कमालीची रहदारी असते. तरीही हा महाराष्ट्रातील सर्वांत उपेक्षित असा महामार्ग आहे. प्रदीर्घ काळ रखडलेली कोकण रेल्वे सुरू झाल्यानंतर या महामार्गावरील रहदारी काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अनेक कारणांमुळे ती फोल ठरली आणि या महामार्गावरील गर्दी वाढतच गेली.

सुमारे सहाशे किलोमीटरच्या या मार्गावर असलेले खड्डे आणि नसलेला दुभाजक यामुळे बातम्यांची पानेच्या पाने अनेकवार भरून गेली आहेत. मुंबईलगतच्या कोकणपट्टीतील मनोहर जोशी आणि तळकोकणातील नारायण राणे असे दोन मुख्यमंत्री या प्रदेशाने महाराष्ट्राला दिले; मात्र तरीही या रस्त्याची उपेक्षा तशीच राहिली. "मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वे'मुळे देशभरात ख्यातकीर्त असलेले नितीन गडकरी यांचेही महाराष्ट्रात असताना या रस्त्याकडे दुर्लक्षच झाले. मात्र, केंद्रात मंत्री झाल्यावर मात्र त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाकडे जातीने लक्ष द्यायला सुरवात केली. अर्थात, या महामार्गावर होणारे अपघातच त्यास कारणीभूत होते. गडकरी यांनी या अपघातापूर्वीच पनवेल-इंदापूर पट्ट्याच्या रुंदीकरणासाठी 540 कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे सहा वर्षांनंतर हे काम अखेर सुरू झाले आहे. मात्र, अनेक कारणांमुळे या कामास अद्याप वेग येऊ शकलेला नाही. पनवेल-इंदापूर पट्ट्यापुढच्या सुमारे 480 किलोमीटरच्या रुंदीकरणाचे कामही आता सुरू होईल, अशी अपेक्षा असली तरी सध्या केवळ दुपदरी असलेल्या या मार्गाचे चौपदरीकरण होण्यास किमान चार ते पाच वर्षे लागतील, असे सांगितले जात आहे.

या महामार्गावर बुधवारी झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या या सात तरुणांनी वयाची तिशीही गाठलेली नव्हती आणि सामाजिक कार्यासाठी ते प्रसिद्ध होते. या अपघाताची बातमी येताच केवळ विलेपार्ल्यातीलच नव्हे, तर संपूर्ण मुंबईतील घर नि घर हळहळले. आता त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर तरी केंद्र तसेच राज्य सरकार या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम जोमाने हाती घेईल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: big problem of highway