बिहारी उलटफेर...

बिहारमधील राजकारणाने रविवार, ता. २८ जानेवारी रोजी आणखी एक वळण घेतले. नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा साथीदार बदलला आणि मुख्यमंत्रिपद स्वतःकडे राखले.
bihar politics update nitish kumar change political party politics
bihar politics update nitish kumar change political party politicssakal

विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीद्वारे देशपातळीवर नेतृत्वासाठी नितीशकुमार यांनी मोर्चेबांधणी चालवली होती. पण त्याला काँग्रेसकडून कुंपण घातले गेले. त्यांच्या या नाराजीला खतपाणी घालून आगामी लोकसभा निवडणुकीतील आपले ईप्सित साधण्यासाठी भाजपने बंद केलेले दरवाजे त्यांच्यासाठी खुले केले आहेत.

बिहारमधील राजकारणाने रविवार, ता. २८ जानेवारी रोजी आणखी एक वळण घेतले. नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा साथीदार बदलला आणि मुख्यमंत्रिपद स्वतःकडे राखले. गेल्या दोन दशकांतल्या राजकारणात त्यांनी तिसऱ्यांदा भाजपसोबत आघाडी करून राज्यात सरकार स्थापन केले.

१९९० मध्ये जगन्नाथ मिश्र काँग्रेसचे बिहारमधील शेवटचे मुख्यमंत्री. त्यानंतरच्या ३४ वर्षांत लालूप्रसाद (प्रारंभी जनता दल, नंतर राष्ट्रीय जनता दल-राजद) आणि नितीशकुमार (अत्यल्प काळ समता पक्ष, नंतर जनता दल संयुक्त-जदयू) या दोघांनी सत्ता स्वतःच्या ताब्यात ठेवली.

त्यातही २००५नंतरच्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत नवी युती, आघाडी आणि तडजोड करून नितीशकुमार मुख्यमंत्रिपदी राहिले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ-एनडीए) बाहेर पडून नितीशकुमार यांनी लालू प्रसाद यांच्या ‘राजद’सोबत आघाडी करून राष्ट्रीय राजकारणात प्रवेशाचा प्रयत्न केला.

तो अपयशी ठरल्यावर पक्षाच्या अपयशाची जबाबदारी घेत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्रिपदी बसवले. पुन्हा त्यांना हटवून स्वतः मुख्यमंत्री बनले. पुन्हा ‘रालोआ’शी घरोबा केला. अवघ्या ४३ आमदारांच्या बळावर मुख्यमंत्रीपदी टिकून राहिले. २०२२मध्ये नव्याने ‘राजद’शी समझोता केला आणि आज पुन्हा नव्याने ‘रालोआ’सोबत संसार थाटला.

जातीसमूहाचे राजकारण

नितीशकुमार यांचे दोन दशकांचे राजकारण सत्तेभोवती आहे. महत्वाकांक्षी नितीशकुमार यांना सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी कोणत्याही पक्षांचे, आघाड्यांचे वावडे नाही. त्यांनी वारंवार स्वतःच्या कृतीतूनच हे सिद्ध केले.

तरीही त्यांच्यासोबत जाण्यास आणि सत्ता त्यांच्या हाती सोपविण्यास भाजप व लालूप्रसाद का उत्सुक असतात, हा बिहारच्या सत्ताकारणाकडे बाहेरून पाहणाऱ्यांना पडणारा प्रश्न असतो. या प्रश्नाचे उत्तर बिहारच्या जातीसमूहांमधील राजकारणात आहे.

तेथील घट्ट जातव्यवस्थेत आहे. या जातव्यवस्था स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही ‘गठ्ठा मतदान’ म्हणून पाहिल्या गेल्या. परिणामी, त्या टिकून राहण्यात जातीसमूहांच्या नेत्यांचा आणि पक्षांचाही स्वार्थ आहे. नितीशकुमार आणि लालूप्रसाद यांचे सारे राजकारण बिहारच्या जातीसमूहांभोवती, जाती अस्मितांभोवती राहिले.

ही व्यवस्था सांभाळण्यासाठी सत्ता आणि सत्तेसाठी तडजोड अशी रचना १९९० पासून स्वयंचलित पद्धतीने अस्तित्वात आली. आज नितीशकुमार यांनी एका आघाडीतून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन दुसऱ्या आघाडीत प्रवेश करून मुख्यमंत्री बनणे ही या रचनेची परिणिती आहे.

गेल्या दोन दशकांत भारतीय जनता पक्ष नितीशकुमार यांचा सर्वाधिक काळ भागीदार राहिला. दोनदा ‘राओला’मधून बाहेर पडून आज पुन्हा ते आले आणि मुख्यमंत्रीही बनले, यामागे गेल्या पाच महिन्यांत भाजपने केलेली पेरणी कारणीभूत आहे.

२०२२ मध्ये नितीशकुमार यांनी भाजपबाहेर पडून ‘राजद’शी संबंध जोडले. भाजपचे बिहारमधील वाढते वर्चस्व २०२४च्या विधानसभा निवडणुकीत त्रासदायक ठरेल, याची स्पष्टता २०१९च्या विधानसभा निवडणुकीतच त्यांना आली होती.

महाराष्ट्रातील सत्तानाट्यापासून धडा घेत भाजपने २०१९ मध्ये घटक पक्षाकडेच मुख्यमंत्रिपद सोपविण्याचा निर्णय बिहारमध्ये घेतला. नितीशकुमार यांनी या संधीचा लाभ उठवला. त्याचवेळी भाजपला पर्यायांची चाचपणीही सुरू ठेवली.

राष्ट्रीय राजकारणाबाबत निराशा

केंद्र सरकारविरोधात जाणारे जनमत काँग्रेसकडे एकवटले जात असताना त्यांच्या सोबतीला नितीशकुमार आणि लालूप्रसादही आले. महाराष्ट्रातून शरद पवार, उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी आणि दिल्ली-पंजाबमधून अरविंद केजरीवाल अशी नवी आघाडी २०२३च्या मध्यानंतर अस्तित्वात यायला सुरूवात झाली.

या आघाडीचे ‘इंडिया’ असे नामकरण होण्यापूर्वीच नितीशकुमार यांनी या आघाडीसाठी बिहारमध्ये पुढाकारही घेतला. बिहारची सत्ता राखायची आणि देश पातळीवरही नेतृत्वाची चाचपणी करायची हा त्यांचा हेतू.

असे सांगतात, की ‘इंडिया’ आघाडीचे निमंत्रक म्हणून नितीशकुमार यांची नेमणूक करण्याची बोलणीही लालूप्रसाद यादव यांनी केली होती. तथापि, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावासाठी काँग्रेस ठाम राहिल्यानंतर नितीशकुमार यांचा आघाडीतील रस संपला.

त्यानंतर त्यांना निमंत्रकपदाची ‘ऑफर’ दिली गेली, तथापि सोबतच खर्गेंना आघाडीचे अध्यक्षही बनवण्याचे ठरवले गेले. राष्ट्रीय राजकारणात मध्यवर्ती भूमिका बजावण्याची फारशी संधी नितीशकुमार यांच्यासमोर राहिली नाही.

नेमक्या याच काळात त्यांच्याशी भाजपने संवाद सुरू केला. ‘राजद’ आणि ‘इंडिया’ आघाडीसोबत राहून काही साध्य झालेले नाही, हा ‘मेसेज’ नितीशकुमार यांच्यापर्यंत पुरेसा पोहोचवला गेला. राज्यातील ताकद घटूनही राखलेले मुख्यमंत्रिपद टिकवून ठेवायचे असेल आणि ‘राजद’च्या तेजस्वी यादव यांचा वाढता प्रभाव रोखायचा असेल, तर नितीशकुमार यांना भाजप हा पर्याय पुन्हा एकदा हाताशी आला. तो त्यांनी आज साधला.

बंद दरवाजे का केले खुले?

नितीशकुमार यांच्यासाठी भाजपचे दरवाजे बंद झाले आहेत, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी केली होती. मग, पुन्हा त्यांच्यासाठी दरवाजे कसे उघडले गेले, या प्रश्नाचे उत्तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे बिहारच्या जातीसमूहांच्या राजकारणात आहे.

नितीशकुमार यांच्या पक्षाला साधारण ५५ ते ६५ लाख मतदान आहे. बिहारमधील पिछडा (मागास) आणि अतिपिछडा (अतिमागास) वर्ग हा प्रामुख्याने नितीशकुमार यांच्या पाठीशी राहिला आहे.

या वर्गामध्ये भाजपने जाणीवपूर्वक आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भूपेंद्र यादव यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यावर सप्टेंबर २०२२ मध्ये भाजपने बिहारची जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मंत्री विनोद तावडे यांच्याकडे सोपवली.

गेल्या दीड वर्षांत तावडे यांनी बिहारमधील जातीसमूहांच्या राजकारणात भाजपचा परीघ विस्तारत नेला. कुशवाह या पिछडा समाजाचे नेते सम्राट चौधरी प्रदेशाध्यक्ष बनले. नितीशकुमार यांनीच तयार केलेल्या महादलित श्रेणीतील नेत्याकडे राज्यपालपदाची जबाबदारी सोपवली.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी हरी सहनी यांच्याकडे आली. ते मल्लाह या अतिपिछडा जातीचे प्रतिनिधित्व करतात. विजय सिन्हा यांच्याकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. सिन्हा अगडा किंवा खुल्या प्रवर्गातील भूमिहार जातीचे नेते आहेत.

जातीसमूहांची ही मोट बांधताना भाजपने लोकसभा निवडणूक हाच अजेंडा समोर ठेवल्याचे स्पष्ट दिसते. दरम्यानच्या वाटचालीत नितीशकुमार यांची ‘इंडिया’ आघाडीसोबतची नाराजी भाजपच्या पथ्यावर पडणारी होती. त्या नाराजीला खतपाणी घालण्यासाठी दरवाजे उघडण्यात भाजपच्या नेतृत्वाला काहीच हरकत असण्याचे कारण नव्हते.

ते दरवाजे आज उघडले गेले. बिहारमध्ये लोकसभेच्या चाळीस जागा आहेत. भाजपने लोकसभेसाठी बिहारची जबाबदारी पुन्हा तावडेंकडेच सोपवली आहे. सतत अस्वस्थ नितीशकुमार यांना बरोबर ठेवून लोकसभा निवडणूक पार पाडणे हे तावडेंसमोरचे प्रमुख आव्हान असेल. त्यानंतरच्या राजकारणाचा विचार भाजपने अथवा नितीशकुमार यांनी किमान आजतरी केला असावा, असे वाटत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com