प्रज्ञा की अवज्ञा?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्यास ‘देशभक्त’ म्हणण्याचा आततायीपणा भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा केला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्यास ‘देशभक्त’ म्हणण्याचा आततायीपणा भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा केला. हे त्यांनी पूर्वीही केले आहे. परंतु, आता त्यांनी हे काम लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असलेल्या लोकसभेच्या सभापटलावर केले आहे व म्हणून ते अधिक गंभीर व चिंताजनक आहे. लोकसभा अध्यक्षांनी तत्काळ त्यांचा शेरा नोंदीतून काढला खरा; पण तेवढ्याने भागणार आहे काय, हा खरा सवाल आहे. या शेऱ्याची निंदा करण्यासाठी लोकसभा व राज्यसभेत विरोधी पक्षांनी संधी मागितली होती. परंतु, दोन्हीकडे ती नाकारण्यात आली. भाजपच्या कार्याध्यक्षांनी त्यांच्या उद्‌गाराचा निषेध केला आणि त्यांना संसदेच्या संरक्षण मंत्रालय समितीतून काढून टाकले. एवढेच नव्हे, तर भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत सहभागी होण्यास प्रतिबंध केला. पण, प्रश्‍न आहे, की यामुळे साध्वी प्रज्ञा यांना लगाम बसणार आहे का? लोकसभा निवडणूक लढविताना त्यांनी हाच आगोचरपणा केला होता व पंतप्रधानांनी त्याचा निषेध करताना अतिशय वेदना व्यक्त करून त्यांना ते जन्मात माफ करू शकणार नाहीत, असे म्हटले होते. लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतानाच या साध्वींनी त्यांच्या धार्मिक गुरूंच्या नावे ती घेण्याचा प्रयत्न करून वाद निर्माण केला होता. त्यामुळे या साध्वींच्या आचरणात भविष्यातही सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अशा घटकांना केवळ धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून मते मिळविण्यासाठी उमेदवारी देऊन लोकसभेत प्रवेश करू देणारा पक्षही दोषी ठरतो. सार्वजनिक जीवनातील शिष्टसंमत सुसंस्कृतपणाला काळिमा फासणाऱ्या घटकांना पाठीशी घालण्याचे पाप सत्ताधारी पक्षाने केल्यास इतिहास त्यांनाही माफ करणार नाही. या साध्वींना लोकसभेत प्रवेश करू देणे आणि त्यांना संरक्षणासारख्या महत्त्वाच्या संसदीय समितीवर नेमणे यावरूनही सत्ताधाऱ्यांची मनोवृत्ती लक्षात येते. या साध्वींचा संरक्षणासारख्या विषयात असा कोणता अभ्यास किंवा तज्ज्ञता आहे, की ज्यामुळे त्यांना या समितीवर प्रवेश दिला गेला? की सेनादलांसारख्या अद्याप धर्मनिरपेक्ष असलेल्या संस्थेतही ध्रुवीकरणाचा प्रयोग सत्तापक्षाला करायचा आहे? भाजपच्या नेतृत्वाने मौन सोडले पाहिजे!

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MP Sadhvi Pragya Singh Thakur