फंदफितुरीचे डाव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक एक मित्र सोडून जात असताना, आता भारतीय जनता पक्षाने ज्या राज्यांत आपले बस्तान ठीक बसलेले नाही, तेथे फंदफितुरीचे राजकारण सुरू केले आहे. पश्‍चिम बंगालमध्ये अथक प्रयत्न करूनही वाट बिकटच असल्याचे दिसत असल्याने तेथील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांवर जाळे फेकण्याचे काम भाजपने सुरू केले आहे. त्या रणनीतीला फळ आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक एक मित्र सोडून जात असताना, आता भारतीय जनता पक्षाने ज्या राज्यांत आपले बस्तान ठीक बसलेले नाही, तेथे फंदफितुरीचे राजकारण सुरू केले आहे. पश्‍चिम बंगालमध्ये अथक प्रयत्न करूनही वाट बिकटच असल्याचे दिसत असल्याने तेथील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांवर जाळे फेकण्याचे काम भाजपने सुरू केले आहे. त्या रणनीतीला फळ आले आहे.

"तृणमृल'चे लोकसभा सदस्य सौमित्र खान हे त्यांच्या गळास लागले असून, आणखीही काही खासदार आपल्या वाटेवर असल्याचा भाजपचा दावा आहे. खान यांच्या पाठोपाठ अनुपम हजरा हेही भाजपच्या छावणीत दाखल होणार असल्याच्या बातम्या आल्यामुळे तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तातडीने त्या दोघांना पक्षातून निलंबित केले आहे. त्या दोघांना, ते करत असलेल्या "घरभेदी' कारवायांमुळे पक्ष उमेदवारी देण्याची शक्‍यता नव्हती. त्यामुळेच भाजपकडून उमेदवारीचे आश्‍वासन मिळताच सौमित्र खान यांनी "तृणमूल'ला सोडचिठ्ठी दिली असणार, हे उघड आहे. खरे तर "तृणमूल'मध्ये ममतादीदींनंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि राज्यसभा सदस्य मुकुल रॉय यांनी गेल्याच वर्षी ममतादीदींची साथ सोडून भाजप प्रवेश केला होता. याच रॉय यांच्याशी सौमित्र खान यांचे घनिष्ट संबंध असल्याचे सांगण्यात येते. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसने राज्यातील डावे पक्ष, कॉंग्रेस आणि भाजप यांना चारीमुंड्या चीत करत 42 पैकी 34 जागा जिंकल्या होत्या. तेव्हापासून या राज्यात बस्तान बसवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा हे वारंवार बंगालचे दौरे करत असून, हिंदी भाषिक राज्यांत कमी होणाऱ्या जागांची तूट भरून काढण्यासाठी भाजपने आपले सारे लक्ष बंगाल व ईशान्य भारतावर केंद्रित केले आहे. आता सौमित्र खान यांच्या रूपाने त्यांना एक तगडा गडी साथीस लाभला आहे आणि "तृणमूल'चे आणखी किमान सहा खासदार भाजपमध्ये येऊ घातल्याचे सांगण्यात येत आहे.

अर्थात, हे फंदफितुरीचे राजकारण भाजपने महाराष्ट्रातही 2014 मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी अमलात आणले होते आणि कॉंग्रेस व "राष्ट्रवादी' या दोन पक्षांतील असंतुष्टांना उमेदवारी बहाल केली होती. आता निवडणुका जशा जवळ येतील, तेव्हा अशा पक्षांतराला ऊत येणार, यात शंका नाही.

Web Title: BJP Plays Wrong Politics In West bengal