पुस्तक परिचय : भारतीय स्त्रीच्या संघर्षाची गाथा : अग्निदिव्य

टपाल कार्यालयात नोकरी करणाऱ्या आपल्या सहकारी मित्राच्या आईच्या संघर्षशील जीवनाची कहाणी ऐकून, एका अस्वस्थ मनाने घेतलेला तिच्या जीवनचरित्राचा हा वेध आहे.
marathi book agnidivya
marathi book agnidivyaesakal

आशिष निनगूरकर हे समकालीन महत्त्वाचे असे लेखक. नाट्य, चित्रपट आणि साहित्य अशा विविध विषयांवर ते सातत्याने आणि अभ्यासपूर्ण लेखन करीत असतात. कवी म्हणून त्यांनी यापूर्वीच साहित्य क्षेत्रात दमदार पदार्पण केले आहेच. त्यांच्या ‘कुलूपबंद’ या संग्रहास मानाचे पुरस्कारही मिळाले आहेत. भोवतालाबद्दलचे त्यांचे सजग लेखन खरोखरच लक्षवेधी आहे. अलीकडेच त्यांचे चपराक प्रकाशन संस्थेकडून ‘अग्निदिव्य’ हे विशेष चरित्र प्रसिद्ध झाले. हे चरित्र म्हणजे त्यांच्यातील माणूसपणाचे, संवेदनशील वृत्तीचे प्रतीक आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. (book review of marathi book agnidivya)

एका सामान्य स्त्रीच्या संघर्षाची गाथा या चरित्र ग्रंथातून त्यांनी साकारली. या चरित्राचा बाज वेगळा आहे. ही एका सामान्य स्त्रीच्या त्यागाची, तिच्या व्यथा-वेदनांची, तिच्या कौटुंबिक संघर्षाची पिळवटून टाकणारी कहाणी आहे. या चरित्र ग्रंथाच्या निर्मितीमागील कहाणीही तशी वेधक अशीच आहे.

टपाल कार्यालयात नोकरी करणाऱ्या आपल्या सहकारी मित्राच्या आईच्या संघर्षशील जीवनाची कहाणी ऐकून, एका अस्वस्थ मनाने घेतलेला तिच्या जीवनचरित्राचा हा वेध आहे. या चरित्रातून भारतीय स्त्रीच्या विविध अवस्थांचे दर्शन घडते. एक मुलगी, बहीण, पत्नी आणि आई म्हणून तिने केलेला संघर्ष म्हणजे हे अग्निदिव्य होय. स्त्रीची उपेक्षा, अवहेलना, शोषण, दमण, तिची सर्व बाजूंनी होणारी घुसमट या चरित्राची नायिका रमा कांबळे यांच्या जीवनगाथेतून येथे मांडली आहे.

विशेष म्हणजे या चरित्राकडे जेव्हा आपण पारंपरिक भारतीय स्त्रीच्या दृष्टीने पाहतो, तेव्हा हे चरित्र केवळ ‘रमा’चे राहत नाही, तर ते समष्टीचे व्यापकत्व धारण करते. या अर्थाने ही संघर्षगाथा भारतीय कुटुंब, लग्नसंस्थेत आपले मन मारून जगणाऱ्या तमाम भारतीय स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. रमा कांबळे ही अत्यंत गुणी, थोरली लेक. वडील पोलिस असल्याने तसे हे सुखी कुटुंब; पण अचानक लहान भावाला एका गंभीर आजाराने ग्रासले जाते आणि इथूनच सुरू होतो, तो रमाच्या मोठे होण्याचा प्रवास.

एकीकडे कोवळेपणातून फुलण्याकडे, तारुण्याकडे तिचा सुरू झालेला प्रवास आणि दुसरीकडे कुटुंबातील संकटाचा प्रवास अशा समांतर नियतीजन्य आणि नैसर्गिक प्रवासात तिचे मन अस्थिर होते. वडिलांची होणारी ओढाताण ती पाहत असते, तिला ती कळत असते. यातूनच तिच्यातील थोरल्या बहिणीचे, ताईचे मन जागरूक होते आणि ती आपल्या स्त्रीसुलभ भावनांना बाजूला सावरून, कुटुंबातील जबाबदारी स्वखुशीने स्वीकारते. (latest marathi news)

marathi book agnidivya
दृष्टिकोन : लोकसभा निकालाचा अन्वयार्थ

आई-वडिलांना घरकामात, भावाच्या आजारपणात मदत करते. तशी ती हुशार, पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारी. आपल्या जीवनाबद्दल काही स्वप्ने बाळगणारी; पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. आपल्या कुटुंबासाठी आपल्या अस्तित्वाचा विलोप करणाऱ्या बहिणींच्या त्यागाचे चित्रण मराठी नाटक, कथा-कादंबरीत ५०-६०च्या दशकात येऊन गेले.

विभावरी शिरूरकर यांच्या ‘कळ्यांचे निःश्वास’, कालेलकरांचे ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’सारख्या कलाकृतीतून ते आले आहे. रमाची ही नव्वदोतरी कहाणी वाचताना या पूर्वाश्रमीच्या साठोत्तरी कहाणीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, हे येथे मुद्दाम नोंदवावेसे वाटते. त्यामुळे भारतीय स्त्रीचे जीवनमान, तिचे स्वातंत्र्य, पुरुषसत्ताक व्यवस्थेकडून तिचे होणारे दमण, तिच्या अधिकाराची होणारी पायमल्ली, स्त्री जीवनातील करुण- भीषण वास्तवदर्शन या चरित्राने पुन्हा एकदा करून दिले आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या या आधुनिक युगात स्त्रीचे जीवनमान किती बदलले, यावर हे चरित्र खऱ्या अर्थाने दृष्टिक्षेप टाकते. कुटुंबात मदत करणाऱ्या तरुण रमाला मुंबईचे स्थळ येते आणि आपला कोणताही त्रास आई-वडिलांना नको म्हणून रमा चालून आलेला हा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारते. तिच्या लग्नाचा दिवस, सासरी जाणे आणि भावाचा आजार बळावणे हे एकच होते. तरीही ती मनावर दगड ठेवून सुखी संसाराची स्वप्ने रंगवत असते; पण तिच्या पदरात पडते ते विपरीत जीवन. काही दिवसांतच तिला नवऱ्याच्या संशयी स्वभावाचा फटका बसतो.

आणि ज्या संसारात कोणतीही अलवारता नाही, समजून घेणे व संवाद नाही असे निबर भीषण वास्तव तिच्यासमोर येते. यातच तिला सासरचे घर सोडून दुसरीकडे राहावे लागते. तेही ती स्वीकारते. तिच्या जीवनाची परवड दिसते ती इथेच. तिचे मातृत्व, त्याचा आनंदही तिला साजरा करता येत नाही. या काळातच अपघाताने आणि व्यसनांनी, संशयपिशाच्च व्याधीने ग्रस्त असलेल्या नवऱ्याची तिला गडकऱ्यांच्या सिंधूप्रमाणे सेवा करावी लागते.

marathi book agnidivya
राजवंश भारती : कामरूप राजवंश

तरीही ही सर्व जबाबदारी माहेरी आई-वडिलांना त्रास नको म्हणून ती स्वीकारतेही. पण, जेव्हा तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो, तेव्हा तिच्यातील दुर्गा जागृत होते. ती पुन्हा माहेरी येते. एका मुलाला जन्म देते. या काळात ती थांबत नाही. आपल्या अस्तित्वसिद्धीचा प्रयत्न करते. लहान बाळ पदरात घेऊन शिकते, नोकरी करते, झगडते. स्वतःच्या पायावर उभी राहते.

अशा रीतीने आपली व्यथा, वंचना, उपेक्षा, कोंडमारा, सर्व दुःख भूतकाळात विसर्जित करून आपल्या मुलाच्या भविष्यातच ती स्वतःचे भविष्य पाहते. त्या मुलालाही आयुष्यात उभे करते आणि आपले मातृत्वही सर्वार्थाने निभावते. अशी ही रमाबाई कांबळे यांची अग्निदिव्यरूपी गाथा म्हणजे हे चरित्र ! व्यापक अर्थाने हे चरित्र म्हणजे भारतीय स्त्रीच्या संघर्षाची वास्तव अशी कहाणी आहे. अभिषेक कांबळे या आपल्या सहकारी मित्राच्या आईची वास्तव कहाणी ऐकून या चरित्राची निर्मिती झाली.

हे चरित्र जसे रमाचे आहे, तसेच ते एका समंजस, जबाबदार उमद्या तरुणाचेही आहे. स्वतःची कसलीही चूक नसताना पितृवियोगाचे दुःख सोसणाऱ्या आणि आपल्या आईची तगमग पाहणाऱ्या एका संवेदनशील तरुणाचे चित्र हे चरित्र आपल्यासमोर रेखाटते. ते वाचून आपणही अस्वस्थ होतो. आपल्या जवळच्या मित्राच्या आईची ही धगधगती कहाणी मांडणे, हे एक दिव्यच होते. एका अर्थाने ही चरित्र लेखकाची अग्निपरीक्षाच होती; पण आपल्या संयमित मांडणीतून लेखकाने ही परीक्षा पार केली आहे.

marathi book agnidivya
सह्याद्रीचा माथा : शिक्षक मतदारसंघातही शिंदे विरुद्ध ठाकरे

ओघवती व प्रवाही भाषा, स्त्री जीवन, मैत्री, सद्यस्थितीवरील चिंतन या दृष्टीनेही हे चरित्र महत्त्वाचे आहे. व्यक्तिरेखा, निवेदन ही सर्व कथात्म अंगे लेखकाने सांभाळली आहेत. वास्तविकता, सत्यता हे कोणत्याही चरित्राच्या यशस्वीतेची पहिली कसोटी असते. या कसोटीस हे चरित्र उतरले आहे, असे असले तरी जे ज्ञात झाले.

त्यावर आधारित हे चरित्र असल्याने आणि काही गोष्टींचे कथन करण्यास एक स्त्री म्हणून चरित्र नायिकेस काही मर्यादा आल्या असतील. या काही मर्यादा सोडल्या, तर सद्यकाळातील एक महत्त्वाचे आणि वास्तवातील एका सामान्य स्त्रीची कहाणी अधोरेखित करणारे हे चरित्र म्हणून हे लेखन निश्चितच लक्षवेधी आहे.

आपल्या मुलाच्या सुखी संसारात, नातवंडांत रमणारी आजची एक आजी भूतकाळात आपण जगलेल्या, भोगलेल्या जीवनाची कहाणी धाडसाने सांगते, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. स्त्री जन्म म्हणोनि न व्हावे उदास, या संत जनाबाईंच्या उक्तीची सार्थ प्रचीती या नायिकेने सिद्ध केली आहे.

डॉ. अशोक लिंबेकर, ९८२२१०४८७३.

पुस्तक ः अग्निदिव्य

प्रकार ः चरित्र

लेखक : आशिष निनगूरकर,

प्रकाशक ः चपराक प्रकाशन, पुणे

पृष्ठे ः १२०

किंमत ः २०० रुपये

marathi book agnidivya
सह्याद्रीचा माथा : 'प्रत्येक दिवस व्हावा योग दिन'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com