Slaughter of Narakasura... traditional style painting.
Slaughter of Narakasura... traditional style painting.esakal

राजवंश भारती : कामरूप राजवंश

Latest Marathi Article : नरकासुराचा वध केल्यावर त्याचा मुलगा ‘भगदत्त’ कामरूपाचा राजा बनला. तो ‘महारथी’ होता. अत्यंत पराक्रमी होता आणि कृष्णाचा; पर्यायाने पांडवांचा वैरी होता.

लेखक : ॲड. सुशील अत्रे

सर्वसामान्यपणे आपण दिवाळी ‘नरक चतुर्दशी’पासून साजरी करतो. नरकासुराचा वध श्रीकृष्ण आणि सत्यभामा यांनी जोडीने केला होता, अशी कथा आहे. त्याने १६००० राजस्त्रियांना बळजबरीने आणून बंदिवासात ठेवले होते. ज्यांची सुटका श्रीकृष्णाने केली आणि त्यांना सन्मानाने आपले पत्नीपद दिले.

हा जो नरकासुर होता, तो ज्या प्रदेशाचा राजा होता, तिथे त्याने कामाख्या देवीचे मंदिर उभारले. त्यामुळे तो प्रदेश ‘कामरूप’ प्रदेश म्हणून ओळखला गेला. त्याला समान, सपाट नसलेला - म्हणून ‘असम’ असेही नाव होते. तो प्रदेश म्हणजे आजचा आसाम. (saptarang latest article on Kamrup Dynasty)

नरकासुराची राजधानी होती प्राग्ज्योतिषपूर. आजच्या गुवाहाटीजवळच ती असावी. नक्की संदर्भ मिळत नाही. नरकासुराचा वध केल्यावर त्याचा मुलगा ‘भगदत्त’ कामरूपाचा राजा बनला. तो ‘महारथी’ होता. अत्यंत पराक्रमी होता आणि कृष्णाचा; पर्यायाने पांडवांचा वैरी होता. तो कौरवांकडून लढत असताना महाभारत युद्धात अर्जुनाने त्याला मारले. त्याच्या नंतर त्याची मुले वज्रदत्त आणि पुष्पदत्त राजे झाले. इथून पुढे नरकासुराच्या वंशजांबद्दल काही उल्लेख सापडत नाहीत.

यानंतर कामरूप प्रदेशाबद्दल माहिती मिळते ती थेट इ.स. ३५० च्या आसपासची. सम्राट समुद्रगुप्ताचा समकालीन असलेला त्याचाच अंकित, कामरूपाचा राजा ‘पुष्यवर्मन’ हा होता. त्याने इ.स. ३५० च्या सुमारास आपले स्वतंत्र कामरूप राज्य घोषित केले. त्याचीही राजधानी प्राग्ज्योतिषपूर हीच होती.

त्याच्या वंशात पुढे समुद्रवर्मन, बलवर्मन, कल्याणवर्मन, गणपतीवर्मन, महेंद्रवर्मन, नारायणवर्मन, भूतिवर्मन, चंद्रमुखवर्मन, स्थितवर्मन, सुस्थितवर्मन, सुप्रतिष्ठितवर्मन आणि भास्करवर्मन असे राजे झाले. अर्थातच या वंशाला ‘वर्मन वंश’ म्हणूनही ओळखतात. प्राचीन काळातील या ‘वर्मन’ उपनामाचे पुढे आडनावात रूपांतर झाले.

बंगाल प्रदेशात ते ‘बर्मन’ झाले, तर उत्तर भारतात ‘वर्मा’ झाले. या वर्मन वंशातील नारायणवर्मनाने दोन वेळा अश्वमेध यज्ञ केला होता. भूतिवर्मनही अत्यंत महत्त्वाकांक्षी होता. त्याने कामरूप राज्याचा मोठा विस्तार केला. भास्करवर्मन हा सम्राट हर्षाचा समकालीन आणि मित्र होता.

भास्करवर्मनाचा एक ताम्रपट १९१२ मधे निधानपूर येथे सापडला. ते गाव आज बांगलादेशात आहे. हा निधानपूर ताम्रपट म्हणजे कामरूप राजवंशाच्या माहितीचा मुख्य स्रोत आहे. त्यात अगदी नरकासुरापासून उल्लेख आहे. या ताम्रपटावरील नोंद असे सांगते, की पुष्यवर्मन हा नरकासूर आणि भगदत्ताचाच वंशज आहे आणि त्यांच्यामध्ये तीन हजार वर्षांचे अंतर आहे.

त्या ताम्रपटातच पुढे पुष्यवर्मनाची वंशावळ, थेट भास्करवर्मनापर्यंत दिली आहे. याशिवाय बाणाच्या हर्षचरित्रातही भास्करवर्मनाचा उल्लेख आहेच. तो हर्षाचा ‘मांडलिक’ कधीच बनला नाही, पण त्याने हर्षाला एका ज्येष्ठ, आदरणीय मित्राचे स्थान दिले. हर्षही तसाच वागला ! (latest marathi news)

Slaughter of Narakasura... traditional style painting.
हुसेन, एक पर्व!

भास्कर वर्मनाने हर्षाकडे मैत्रीचा हात मागण्यासाठी आपला दूत ‘हंसवेग’ याला पाठवले होते. त्याच्या भेटीचे, संभाषणाचे अगदी सविस्तर वर्णन बाणाने हर्षचरित्रात केले आहे. हर्षाचा उदार स्वभाव लक्षात घेऊन भास्कराने त्याच्याशी युद्ध किंवा मांडलिकत्व, दोन्ही मोठ्या चतुराईने टाळले.

गौड शशांकावरील स्वारीत भास्करवर्मन न.हर्षाचा सहकारी होता. त्याने गौड राजधानी ‘कर्णसुवर्ण’ आपल्या ताब्यात घेतली होती. चिनी प्रवासी युवान श्वांगने हर्षाप्रमाणेच भास्करवर्मनाच्या निमंत्रणावरून त्याच्या दरबारालाही भेट दिली होती.

नालंदा विद्यापीठात श्वांग मुक्कामी असताना हे निमंत्रण दिले गेले. नालंदा येथील उत्खननात हर्षाप्रमाणेच भास्करवर्मनाचे सुद्धा मातीचे ‘सील’ सापडले आहे. युवान श्वांगने आपल्या इतिवृत्तात कामरूप राज्याचे आणि प्राग्ज्योतिषपूर या राजधानीचे भरपूर वर्णन केले आहे.

स्वतः भगवान शिवाचा उपासक असूनही बौद्ध धर्माला उदार आश्रय देणारा राजा असे गौरवोद्‍गार श्वांगने भास्करवर्मनाविषयी काढले आहेत. त्याने कामरूपच्या राजधानीचा विस्तार ३० ‘ली’ असल्याचे म्हटले आहे - म्हणजे सुमारे १५ किलोमीटर्स इतका. हर्षाच्या मृत्यूनंतर काही काळ भास्करवर्मन राज्य करीत होता.

त्याचा मृत्यू कधी आणि कसा झाला, याची नक्की माहिती उपलब्ध नाही. पण इ.स. ६५० च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. हर्षाप्रमाणे त्यालाही कोणी वंशज नव्हता. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर कामरूपचे वर्मन घराणे संपले. त्यांची जागा म्लेंच्छ वंशाने घेतली. त्यांच्याहीनंतर कामरूपचे ‘पाल’ घराणे सत्तेवर आले, ते थेट इ.स. ११०० पर्यंत होते. (वंग प्रदेशातील ‘पाल’ घराणे पूर्णपणे वेगळे; पण, म्लेंच्छ अथवा पाल या दोन्ही वंशांमधे एकही राजा विशेष उल्लेख करण्याजोगा झालेला नाही.

Slaughter of Narakasura... traditional style painting.
छोटा दढीयल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com