Entrepreneurship : उद्योजकतेचा ‘ब्रेन ड्रेन’

उद्योजकांसाठी असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न कागदोपत्री चालू आहे
Entrepreneurship
Entrepreneurshipsakal

- ललितागौरी कुलकर्णी

अनिवासी भारतीय म्हटलं की, डोळ्यासमोर प्रामुख्याने सॉफ्टवेअर तज्ज्ञ, डॉक्टर इत्यादी व्यावसायिक येतात. खरे तर त्यांच्यात उद्योजकांचे प्रमाणही मोठे आहे. ‘नॅशनल फाऊंडेशन फॉर अमेरिकन पॉलिसी’च्या अहवालानुसार, अमेरिकेतील बहुतेक स्थलांतरित उद्योजक आशियामधून आले आहेत, ज्यामध्ये भारत आणि चीन या देशातील उद्योजकांचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, न्यूजर्सी अशासारख्या ठिकाणी विविध क्षेत्रातल्या तब्बल १५५हून जास्त भारतीय कंपन्यांनी २२ अब्ज डॉलर गुंतवले आहेत आणि अमेरिकेत दीड लाखांहून जास्त नोकऱ्या या कंपन्या निर्माण करत आहेत.

यात बऱ्याच मोठमोठ्या सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. परंतु याचबरोबर सूक्ष्म आणि उद्योगक्षेत्रातही भारतीय अग्रणी आहेत. अमेरिकेतील ‘नॅशनल फौंडेशन फॉर अमेरिकन पॉलिसी’ या संस्थेच्या अहवालानुसार स्थलांतरित उद्योजकांनी काही वर्षांपूर्वी लघुउद्योग क्षेत्रात सुरु केलेल्या ३१२ कंपन्यांची किंमत आज १.२ ट्रिलियन डॉलर आहे.

या स्टार्टअप्सपैकी सगळ्यात जास्त म्हणजे ६६ हे भारतीय उद्योजकांनी सुरु केलेले आहेत. अमेरिकेतील तरुण म्हणजे गुगल किंवा ॲमेझॉनसाठी सॉफ्टवेअर नोकरी हे गणित या नवउद्योजकांनी चुकीचे ठरवले आहे.

म्हणूनच की काय, अमेरिकेत स्थलांतरित लोक स्वतःचा व्यवसाय का सुरु करतात, यावर एक प्रख्यात मॅसॅच्युसेट्स विद्यापीठाने संशोधन केले आहे. त्यानुसार अमेरिकी व्यक्तीच्या मानाने स्थलांतरित व्यक्ती स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची शक्यता ८०टक्क्यांहून जास्त असते. काही वर्षांपूर्वी यामागे असे कारण होते की अमेरिकेत आल्यावर आपल्या शिक्षणाप्रमाणे योग्य अशी नोकरी न मिळाल्याने स्वतःचा व्यवसाय सुरु केला जाई.

म्हणजेच चांगल्या नोकरीला पर्याय म्हणून लघु व्यवसायाकडे बघितले जात असे. परंतु आज या स्टार्ट अप्समध्ये मोठ्या प्रमाणावर असे चित्र दिसते की, संगणक विज्ञानाची पदवी घेतलेले तरुण एखादी नवीन कल्पना घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करत आहेत.

यात अनेक प्रसिद्ध नावे आहेत. उदा. रॉबिनहूड ही शेअरबाजार गुंतवणूक कंपनी, क्लबहाउस ही समाजिक माध्यमांवर आधारित कंपनी, इंस्टाकार्ट ही घरपोच किराणा देणारी ई-कॉमर्स कंपनी अशा अनेक कंपन्या आहेत. रोहन सेठ य तरुण उद्योजकाने २०२०मध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठातून पदवी घेऊन क्लबहाउस ऑडिओ ही कंपनी सुरु केली.

आज हा इंटरनेटवरील श्राव्य स्टुडिओ इतका प्रसिद्ध झाला आहे की, एलोन मस्क, मार्क झुकरबर्गसारखे उद्योजकही त्यावर मुलाखती देण्यासाठी उत्सुक असतात. तीच कथा इंस्टाकार्टच्या अपूर्व मेहतांची. कॅनडामधून पदवी घेतल्यानंतर त्याने ॲमेझॉन आदी ठिकाणी काही वर्षे नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर स्वतःची कंपनी सुरु केली.

काही वर्षांपूर्वी जेव्हा भारतीय उच्चशिक्षित तरुण नोकरीसाठी परदेशांत स्थायिक होऊ लागले होते, तेव्हा ‘ब्रेन ड्रेन’ ही संकल्पना चर्चेत होती. आता अनेक तरुण भारतीय उद्योजक परदेशातच स्वतःचा व्यवसाय उभारत आहेत.

अनेक अहवालांनुसार असे दिसते की, अमेरिकेत व्यवसाय सुरु करण्यासाठी आणि तो यशस्वी करण्यासाठी केवळ अमेरिकी उद्योजकांसाठीच नव्हे, तर भारतीय व्यवसायिकांसाठीही पोषक वातावरण आहे. जागतिक बँक दरवर्षी उद्योजकतेसाठी सुकर आणि सुलभ असलेल्या देशांची क्रमवारी लावते.

यात १९० देशांमध्ये अमेरिका सहाव्या क्रमांकावर आहे, तर भारत पन्नासात येण्यासाठी धडपडत आहे. उद्योजकांसाठी असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न कागदोपत्री चालू आहे. परंतु आज तरी परदेशी पदवी घेऊन हे तरुण उद्योजक परदेशांतच व्यवसाय स्थापणे पसंत करतात, हे वास्तव एकप्रकारे उद्योजकतेचा ‘ब्रेन ड्रेन’ दर्शविते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com