esakal | ढिंग टांग : मरणचित्रे!

बोलून बातमी शोधा

dhing tang

ढिंग टांग : मरणचित्रे!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

ठकठक करते दारावरती

अज्ञाताची निगूढ मूठ

जो येतो, तो परतचि जातो,

हेच खरे, अन बाकी झूठ

क्षणार्ध आहे, क्षणैक होते,

क्षणभंगुर हे क्षणभर जगणे

कशास त्या आयुष्य म्हणावे

कशास त्याचे गावे गाणे

देहामधुनि सुटला प्राण

दग्ध विषारी युक्त हवा

विळख्यावरती विळखे दोन

मरण पवित्रा रोज नवा

अज्ञाताच्या तारेवर

तलवारीच्या धारेवर

चक्राच्या त्या आरेवर

कुणी लोंबते, कुणी चिरफळते,

कुणि गरगर ते अव्याहत

अमंगळाचा मुहुरत आहे,

चेटकिणींची ही पंगत

घुबड पोचले नदिकाठावर

तेथ उगाळत बसे दगड

खंगुनि सत्वर मरेल जग हे,

म्हणे मनाशी, यश रगड!

विषार भरला वातावरणी

श्वास कोंडतो खालीवर

बघता बघता विझू लागले

हेच दिव्यांचे भव्य नगर

माणुसकीच्या माळावर

वणवा फिरतो वाऱ्यावर

राख उसळते खडकावर

अस्तित्त्वाच्या आकांताला

सैराटाची ठिणगीजोड

मरतानाही जिभल्या चाटे

हीच जित्याची आहे खोड

मरण कांडते नियती येथे

नश्वरतेची शुष्क कुडी

मृतदेहांच्या वस्तीमध्ये

जितेजागते देशधडी

पळे निघाली, घटका जाती

तास वाजतो ठणाठणा

क्षणाक्षणाला जीव निघाले

प्रस्थानाला दणादणा

मरणगावच्या वेशीवर

जथे थांबले घटकाभर

एका श्वासाचे अंतर

अरे, अनंता, वेशीवरती

तुझ्या अब्रूचे धिंडवडे

तुझ्याच लटिक्या महतीचा हा

खास पुरावा दृष्टी पडे

ठकठक करते दारावरती

अज्ञाताची निगूढ मूठ

जो येतो, तो परतचि जातो,

हेच खरे, अन बाकी झूठ